Friday, July 10, 2015

वागते आयुष्य हे सावत्र आईसारखे



आपण एकीकडे एकविसाव्या शतकाची दवंडी पिटतो.स्त्री-पुरुष समानतेचा ढोल बडवतो.सभ्यतेच्या आणि संस्कृतीच्या बड्या बड्या बाता करतो.स्त्रीवादी साहित्याचा दंभ मिरवतो.स्त्री-पुरुष समानतेची लंबीचवडी भाषणं ठोकतो.पण नोकरी करणारी  बायको संध्याकाळी थकूनभागून घरी आल्यावर तिच्यापुढे आपण स्वतः केलेल्या गरम चहाचा कप ठेवतो का? ऑफिस-घर-मुलं-नवरा-नातेवाईक-पाहुणेरावणे अशा सहा फ्रंटवर रात्रंदिवस भरडणा-या स्त्रीकडे पाहिलं की मला नेहमी उसाचा रस काढणारा चरक आठवतो.एकीकडून उसाला गिळणारा.दुसरीकडून चिपाड बाहेर फेकणारा.आपल्या जगण्याच्या शैलीत फक्त आधुनिकता आली.बाकी आपली मानसिकता मध्ययुगीनच राहिली. ह्या दुतोंडी जगाच्या जात्यात भरडल्या जाणा-या जगभरातल्या कोणत्याही बाईला- मुलीला तिच्या मनासारखं खरोखर किती जगता येतं? अनवाॅन्टेड चाइल्ड  म्हणून मुलीचा जन्म घेतल्यापासून कपाळावर वैधव्याचा दुखरा डाग उमटेपर्यंत तिला हजारदा मनमारून जगावं लागतं.स्त्री-जन्माची ही अस्वस्थ चरफड स्वाती शुक्ल ह्यांनी नेमकेपणाने त्यांच्या शेरात मांडली-

मी लाख ठरवले तरीही मज उंबरठ्याचे बंधन
अन् चंद्र असा निर्मोही,धरतीवर उतरत नाही!

पुरुष कधी पूर्ण पुरुष नसतो तसेच स्त्री कधी पूर्ण स्त्री नसते.पुरुषात एक स्त्री आणि स्त्री मध्ये एक पुरुष अंतर्भूत असतो.प्रत्येकाचा जन्म स्त्री-पुरुषाच्या युगुलापासून झालेला असल्याने हे निसर्गतःच घडत असते. आपल्याकडची अर्धनारी नटेश्वराची मूर्ती हे त्याच द्वैताचे प्रतीक आहे.स्त्री असो की पुरुष त्या व्यक्तीच्या वाट्याला येणा-या दुःखाची प्रत सारखीच असते.थोडं डावं उजवं एवढाच काय तो तपशीलाचा फरक.
मनात अनेक गोष्टी असतात त्या बोलता येत नाहीत.पेनात अनेक कविता असतात त्या लिहिता येत नाहीत.ओठांच्या पाटीवर उमटू पाहणारे कितीतरी उच्चार मोडावे लागतात.कागदावर उतरू बघणारे कितीतरी शब्द खोडावे लागतात.किती जणांना,किती जणींना आपली घुसमट जसीच्या तसी अभिव्यक्त करता येते-

खोडून टाकलेल्या ओळी ब-याच होत्या
लिहिता कधी न आली माझी कथा मलाही

मुलीच्या जातीनं असं असं वागू नये.तसं तसं बोलू नये.घास कसा घ्यावा.पाणी कसं प्यावं.कसं हसावं.कसं बसावं.कसं दिसावं.असे एक ना दोन शंभर धडे आई देत असते.बाप मुलाचा ज्येष्ठ मित्र होण्याच्या कितीतरी अगोदर आई मुलीची थोरली मैत्रीण झालेली असते.ह्या नात्याची परिभाषा स्वातीच्या शेरात अगदी नेमकेपणानं  उतरली-

मी माझ्या स्त्री असण्याचे पाठांतर इतके केले
आईही आता काही, नेमाने शिकवत नाही

मूळ तळकोकणातल्या मालवणच्या असलेल्या स्वातीच्या दुस-या  शेरात आणखी एक  'आई' येते.पण इथे ती व्यक्तिमत्व म्हणून येत नाही तर एक प्रतिमा म्हणून येते.खरं तर आईचं आईपण हे तिच्या गर्भाशयात असतं.ती बाळाला जन्म देते म्हणून ती आई होते.गर्भाशय भाड्यानं घेऊन 'सरोगेट मदर' ह्या आधुनिक संकल्पनेपर्यंतचा विकास प्रगत मेडिकल सायन्सनं गाठला.जिच्या पोटी जन्म घेतला तिचं वात्सल्य टेस्ट ट्युबप्रमाणं तकलादू काचाचं निघतं.अशा आयुष्याचा स्वर,व्यवसायाने साउंड रेकाॅर्डिस्ट असलेल्या स्वातीला,त्यातील बारकाव्यासहीत टिपता येतो-

जन्मदात्री अन् तरीही वांझ बाईसारखे
वागते आयुष्य हे सावत्र आईसारखे
__________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि.११ जुलै, २o१५◆
__________________________________________

No comments:

Post a Comment