जरासे स्वच्छ, हलके वाटले
मनाची ओसरी मी झाडली
क्रांति साडेकर यांचा हा शेर मला भावला तो त्यातील 'मनाची ओसरी' ह्या प्रतिमेच्या उपयोजनामुळे. राहत्या घरातला बैठकीचा हाॅल म्हणजे आपलं मन आणि त्याच घराच्या अंधा-या कोप-यातली अडगळीची खोली म्हणजे आपलं अंतर्मन.हे मी बरेचदा वाचलं-ऐकलं होतं.परंतु 'मनाची ओसरी' मला पहिल्यांदाच दिसली ती ह्या शेरात.आणि ती नुसतीच दिसली नाही तर पांढ-या मातीच्या सारवणानंतर आरशासारखी लख्ख दिसली.आल्या गेल्या विचारांच्या पावलांना लागून आलेला कचरा- धूळ झाडून काढल्या नंतरचे डोळ्यांना सुखावणारे ते दृश्य होते. हवेत गिरक्या घेणा-या सावरीच्या कापसासारखे मन कसे हलके हलके जाणवत होते... ह्या स्वच्छता अभियानानंतर.
माणसाचं मन माणसाला काय काय नाही करायला लावत.ते बेटं माणसाला कधी नाटक करायला लावतं तर कधी नौटंकी.सूर्याच्या पहिल्यावहिल्या किरणाच्या गुड माॅर्निंगने सुरू होणा-या नाना भूमिकांची सोंगं त्याला वठवावी लागतात...ती बांगडीबंद रात्रीला स्वीट ड्रिम्स अॅन्ड गुड नाइट म्हणेपर्यंत.आणि ह्या अभिनयपटुत्वाची 'अंदर की बात' मात्र ज्याची त्यालाच माहीत असते.उपर से टामटुम अंदर की राम जाने असा एकुण सगळा मामला. म्हणूनच तर 'आप अंदर से कुछ और बाहर से कुछ और नजर आते है' असं आपलंच स्टेज आपल्यालाला खडीखडी सुनावत असते.आपण भलेही मनमोकळं, सातमजली वगैरे म्हणतात तसं हासत असलो तरी ते आच्छादन असतं,आतआत खोलवर सलणारं... काहीतरी झाकण्यासाठी.शब्दांच्या सांडशीत ही झाकपाक क्रांतिनं नेमकी घट्ट पकडली-
जरी मोकळे हास्य सांगे खुशाली,
छुपे मौन बोले निराळेच काही
मूळ सोलापूरच्या असलेल्या क्रांति साडेकर ह्यांचा 'अग्निसखा' हा एक कवितासंग्रह आणि 'असेही तसेही' 'अजून बाकी' असे दोन मराठी गझलसंग्रह प्रसिद्ध आहेत.त्यांच्या 'असेही तसेही'ह्या गझलसंग्रहाला विदर्भ साहित्य संघाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.हिन्दी-उर्दूतही त्यांनी 'रूह' ह्या टोपण नावाने लिहिलेल्या गझला रसिकांना आवडतात.आजकाल माॅर्निंग वाॅकला जाताना त्यांच्यासोबत असलेला कॅमे-याचा-मोबाइलचा तिसरा डोळा पाना-फुलांना,खारूताईला,त-हेत-हेच्या पाखरांना,फुलपाखरांना टिपत असतो.त्यांच्या ह्या क्रिएटीव्ह क्लीक्स सकाळी सकाळी फेसबुकवर हजर होतात... तेव्हा त्यांना मनापासून दाद देणा-या जगभरातल्या मित्र-मैत्रीणींची प्रभात प्रसन्न झालेली असते.फेसबुकच्या जगात सध्या 'फोटोवाली बाई' म्हणून त्यांची जानपहचान आहे.
त्यांचं कलासक्त मन मराठी-हिन्दी गझल,फोटोग्राफी अशा त्रिविध आयामांनी व्यक्त होत राहतं... त्यांच्या सृजनशील व्यक्तिमत्वाचे अनेक कंगोरे आपल्यापुढे उलगडत राहतं.पडझडीच्या प्रवासातही त्या आपल्या मनाला हळवं होऊ देत नाहीत.त्याला त्या लगेच बजावतात... आत्मभानावर आणतात-
वाळूत कोरलेली नावे जशी मिटावी,
गेले मिटून जितके हळवे विचार होते
गझल ह्या काव्यप्रकाराची भानामतीच अशी आहे की कविता लिहिणारा एकदा तिच्या आखलेल्या घटात सापडला की त्याची नजरबंदी झालीच म्हणून समजा.ह्या इलमाने झपाटलेलं क्रांति नावाचं 'झाड' म्हणून तर गाते -
हे गझलवेड माझे माझा परीघ आहे
आरंभ हाच होता, येथेच अंत आता
_____________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि.४ जुलै, २o१५◆
__________________________________________
No comments:
Post a Comment