'

◆दर शनिवारी दै.सामनाच्या 'फुलोरा'पुरवणीत प्रसिद्ध झालेले सदर ◆

Friday, January 29, 2016

ठेव भरोसा जगणे आहे छान अजुनहीमित्रांनो,गेले वर्षभर 'गझलाई'त आपण भेटलो. मी लिहिले.तुम्हाला आवडले.मेल,काॅल,मॅसेज,फेसबुक,प्रत्यक्ष भेटी अशा सर्व संपर्क माध्यमांनी तुमचा भरभरून प्रतिसाद मिळाला.लिहिणा-याला आणखी काय पाहिजे? ह्या सदराच्या निमित्ताने नव्या पिढीची प्रातिनिधिक मराठी गझल मला वाचता आली.सदरात समाविष्ट न झालेले... 'है और भी दुनिया मे सुखनवर बहोत अच्छे'!
चांगलं कुठेही वाचायला मिळालं की त्याचा आनंद काही औरच असतो.तो तुम्हाला समृद्ध करतो.जीवनाच्या अनेक छुप्या पैलूंशी तुमची जान-पहचान करून देतो.प्रत्येक वेळी तुम्हाला स्वतःकडे पाहण्याची नवी दृष्टी देतो.विविध आयामांनी तुम्हाला वारंवार अंतर्मुख करतो.काव्यकलेची तुमची समज अधिक परिपक्व करतो.
परंपरेच्या संदर्भात नवतेचे अनावरित उन्मेष तुमच्यासमोर प्रकट करतो.नावीन्य- ओरिजिनॅलिटी ही अमरवेलीप्रमाणे बिनामुळाची नसते, ह्याची तीव्र जाणीव वारंवार करून देतो.
चार-दोन वर्षे अपघातानं चांगलं लिहून होणं ही गोष्ट वेगळी आणि पाच-सहा दशकं निष्ठेनं स्वतःला पारखत-जोखत-चुकत-दुरुस्त करत-शिकत-घडत जाणं ही साधना निराळी.'मोठं' होण्याची घाई झालेल्या फास्ट फुडच्या जमान्यात खरं तर अशी अपेक्षा ठेवणं हा तद्दन वेडेपणाच ठरावा.पण कवितेचा-गझलचा अगदी अलीकडचा इतिहास सुद्धा याची साक्ष देईल.
लिहिता आल्यावर शेरांची...गझलांची...पुस्तकांची...संख्या वाढवणं सहजसाध्य असतं,पण पंचवीस वर्षानंतर तुमचे पाच शेर जरी वाचकांना आठवले तरी तुमच्या हातून खरोखर काही चांगलं लिहून झालं होतं,असं समजावं.आगे आपकी मर्जी!
ह्या सदरातला आजचा हा एकोण पन्नासावा लेख.हिन्दीचे माझे आवडते गझलकार दुष्यंत कुमार आणि समकालीन उर्दूच्या शायरा मोनिका सिंग यांच्या शेरांवरील दोन लेखांचा अपवाद वगळता बाकी सर्व लेख मी मराठी गझलातील शेरांनी गुंफलेत.त्या शेरांनी माझ्या मनात उमटवलेली आशय-तरंगांची वर्तुळे पांगत जाताना  शब्दांत बांधण्याची कोशीश केली.अर्थात स्थल-काल-व्यक्ती-मनस्थिती-अनुभूती सापेक्ष वेगळ्या आशयाची संभावना नेहमीच असते.अभिव्यक्तीशी एकजीव झालेल्या प्रतिमांची अनेकार्थ सूचनक्षमता हे उत्कृष्ट काव्याचे लक्षण मानले जाते.त्यामुळे माझ्या विश्लेषणाशिवाय शेरांचा आणखी वेगळा अर्थ वाचकांना मनात  प्रवाहित झाला तर त्यासारखी आनंदाची दुसरी गोष्ट नाही.
ह्या सदरातले शेर जसे सुशांत खुरसाळे,इंद्रजीत उगले यांच्यासारख्या अगदी विशीतल्या गझलकारांचे  जसे आहेत तसेच कविवर्य सुरेश भटांचे समकालीन असलेले स्व.उ.रा.गिरींचेही आहेत.
ममता सपकाळ,राधा भावे,मनीषा नाईक,क्रांती साडेकर,वंदना पाटील,सुप्रिया जाधव,योगिता पाटील,स्वाती शुक्ल,पूजा फाटे ह्या सारख्या महिला गझलकारांनी त्यांच्या शेरातून केलेला स्त्रीसुलभ भावनांचा  असांकेतिक आविष्कारही मला मनापासून भावला.
दरम्यान काळाच्या पडद्याआड गेलेले पुसदचे खराटे काका आणि परभणीचा नाना बेरगुडे यांच्या शेरावरील लेख त्यांना वाचता आले नाहीत याची खंत मला कायम राहील.
नव्या शायरांच्या शेर-परिचयासाठी सुरेश भट गझलमंचचे सर्वेसर्वा शाहीर सुरेशकुमार वैराळकरांचा मी फोनवरून वेळी-अवेळी चांगलाच पिच्छा पुरवला.त्यांचे औपचारिक आभार मानणे हे चाळीस वर्षाच्या आमच्या वफादार दोस्तीला शोभणार नाही.
'गझलाई' शीर्षकाने तयार केलेले फेसबुक पेज आणि gazalaee.blogspot.in ह्या ब्लाॅगवर ह्या सदरातील सर्व लेख अभ्यासक -रसिकांना चोवीसतास एकत्र उपलब्ध आहेत.लवकरच पुस्तकरूपानेही 'गझलाई' प्रसिद्ध करण्याचा मानस आहे.
तूर्तास 'जय महाराष्ट्र'म्हणून तुमचा निरोप घेताना मुंबईचे संतोष कसवणकर,पुण्याचे ऋषिकेश ढवळे आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबचे शेखर गिरी यांचे तीन शेर समारोपाची 'भेट' म्हणून तुमच्यासमोर ठेवतो.शब्दमर्यादेमुळे त्यांच्यावरील भाष्य करता आले नाही.हे 'न्यून' आपण 'पुरते' करून घ्यावे ही विनंती-

उभ्या जन्मात  कोणाचे बुरे मी चिंतिले नाही
तुझ्यासाठी गुन्हा मजला करावा लागला होता.

- संतोष कसवणकर 

पुन्हा परतून श्रावण येत आहे वाटते आहे
पुन्हा फुलपाखरू येऊन बसले आज हातावर

- ऋषिकेश ढवळे 

कशास घेतो मित्रा इतका ताण अजुनही 
ठेव भरोसा जगणे आहे छान अजुनही 

- शेखर गिरी
______________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि. ३o जानेवारी,२o१६◆
______________________________________________