सुरेश भटांनी पहिल्यांदा मराठी गझलेला मराठीपण दिलं. त्यापूर्वी मराठीत ज्या गझला लिहिल्या गेल्या त्या म्हणजे उर्दू गझलांची नक्कल होती. प्रतिमा -भाषेच्या अंगाने मराठी गझल-तरूणीला घातलेला तो सलवार - कुर्ता होता. सुरेश भटांनी तिला मराठमोळी पैठणी नेसवली. अमरावतीहून निघालेल्या मराठी गझल दिंडीला त्यांनी पैठण - देहू - आळंदी - पंढरपूर - अशा मराठी संस्कृतीच्या चारी धामाचे महाराष्ट्र- दर्शन घडविले.ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी, तुकोबारायांचे विमान, मठोमठी मंबाजींनी केलेली दांभिक कीर्तने, चंद्रभागेचा प्रिय किनारा, जिथे विठू दिसला तिथे झेंडा रोवणारे भाविक अशा बावनकशी अस्सल मराठी प्रतिमांनी त्यांनी मराठी गझल- पंढरी अक्षरशःदुमदुमून टाकली.
सुरेश भटानंतर आज लिहिल्या जाणाऱ्या तिसऱ्या पिढीच्या मराठी गझलेला आपल्या परंपरेचे उत्कट भान आहे. आणि मराठी संस्कृती- भाषा-प्रतिमांची उत्तम जाणही आहे.
डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे;
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे!
श्रावणात आमच्या घरी पोथी लागायची.पोथीवाचक येण्याआधी माय अन् तिच्या सोबतीणी भजनं म्हणायच्या.त्यातलं हे भजन. कायम आठवणीत राहिलेलं.डाॅ.सुनील अहिरराव यांचा शेर वाचताना त्याची प्रकर्षानं आठवण झाली-
देहभर पाण्यात तरला जन्म देवा;
तू खरा निष्णात नावाडी विठोबा!
भवसागर ही आर्षप्रतिमा आहे.संसारातल्या सुखदुःखाला भवसागर म्हटलं जातं.'बेडा पार लगाना'असं हिन्दीत येतं तेही याच अर्थानं.
डाॅ.सुनील अहिरराव ह्यांचे मूळ गाव एरंडोल.भुसावळ तालुक्यातील वरणगावला त्यांची डाॅक्टरकीची प्रॅक्टीस. त्यांच्या स्वभावातील एका वैशिष्ट्यामुळे ते माझ्या लक्षात राहिलेत.
सिद्धी मूठभर अन् प्रसिद्धी हातभर ही आजकालच्या कवींची टॅग लाइन आहे. कवितेहून अधिक आपला फोटो रसिकांना आवडावा ह्यासाठी विशेष काळजी घेण्याचा हा फेसबुकी कालखंड.दरवर्षी दस-याच्या दिवशी 'गझलकार'हा सीमोल्लंघन विशेषांक आम्ही नेटवर प्रकाशित करतो.मागच्या वर्षीच्या अंकात अहिररावांच्या गझलांसोबत त्यांचा फोटो टाकण्यासाठी मी त्यांच्या फेसबुक टाइम लाइनचा धांडोळा घेतला.तिथे त्यांचा स्वतःचा एकही फोटो मिळाला नाही. विनंती केल्यावर फोटो पाठवताना त्यांनी मला लिहिले,'सर,फोटो आवश्यकच आहे का?'एवढ्या अनासक्त उदासीनतेशिवाय का असा मतला येतो-
टीचभर ही भूक सांभाळी,विठोबा;
जन्मभर होतीच आषाढी,विठोबा!
जागतिकीकरणाच्या प्रचंड रेट्यात मैत्री,प्रेम,वात्सल्य,भक्ती अशा उदात्त मानवी भावनांचं झपाट्यानं व्यावसायीकरण होत चाललंय. म्हणून अहिरराव प्रत्यक्ष देवालाच सावधानतेचा इशारा देतात-
पारखोनी घे जरा तू भक्त आता;
हे तुला विकतील व्यापारी,विठोबा.
सगळी माणसं काही सारखी नसतात रे बापराजा! 'देते है भगवान को धोका इन्साँ को क्या छोडेंगे'अशीही काही निपजतात. जी देवबाप्पालाही गोत्यात आणतात-
शेवटी आलास ना गोत्यात तूही...
माणसे असतात थापाडी,विठोबा!
____________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि.१ ८ जुलै, २o१५◆
____________________________________________
No comments:
Post a Comment