Friday, June 26, 2015

कुठल्या क्षणी डसलीस गझले


आपला जन्म कुठे व्हावा;गरीबाच्या झोपडीत की श्रीमंत राजवाड्यात?ह्या जातीत व्हावा की त्या धर्मात व्हावा ?देशात व्हावा की परदेशात व्हावा?ह्या ग्रहावर व्हावा की दुस-या आकाशगंगेत व्हावा?यातलं काही म्हणजे काहीच आपल्या हातात नसतं.आणि आयुष्यभर आपलं दुःख एकच असतं की सालं आपण मिसप्लेस झालो आहोत.नाही तर आपण यँव झालो असतो अन् त्यँव केलं असतं.ह्या चक्रव्युहातून बाहेर पडण्याचा मार्ग सदानंद बेन्दे यांच्या शेरातून जातो-

अर्ज मी केला कधी कुठल्या घरी जन्मास यावे
मी जसा आलो तसा, आहे तिथे, नाराज नाही

हे ज्याला जमलं,ज्याला साधलं त्याचं मन मुक्त पाखरू होतं.त्याला मनसोक्त उडता येतं.त्याच्या पंखातलं बळ दिगंताचा शोध घेऊ शकतं.कुठल्याच सीमा,कुठलीच कुंपणं,कुठलीच सरहद्द त्याच्या भरारीला अडवू शकत नाही.परमतत्त्वाशी एकरूप होऊ बघणारं  त्याचं अस्तित्त्व विश्वात्मक होऊन जातं.त्याच्या जातिवंत आनंदाला कोणतंच ग्रहण ग्रासू शकत नाही तो आनंद सदा शाश्वत राहतो-

पाखरांना कोणतीही जात नाही
कुंपणाची हद्द आकाशात नाही

पण प्रत्येकवेळी पाखराला त्याच्या मनासारखी झेप घेता येत नाही.जीव जगवण्यासाठी स्थलांतरापासून सुटका नसते.प्रवासात थकायला होतं.कुठल्याशा झाडावर हिरव्यागार फांदीच्या आडोशाला रात्रभर विसावंसं वाटतं.ह्या फडफडण्याला,
उडण्याला,धावपळीला खरोखरच काही अर्थ आहे का?असा विचार मनाला चाटून जातो.अशावेळी दुष्यंतकुमार ह्यांचा फारसा लोकप्रिय नसलेला एक शेर माझ्या मनाला चोच मारून जखमी करतो.काळजात खोलवर कळ आणत राहतो...ठणकत राहतो-


ऐसा लगता है कि उड़कर भी कहाँ पहुँचेंगे
हाथ में जब कोई टूटा हुआ पर होता है

मूळ कराडचे असलेले सदानंद बेन्द्रे उत्तम ललित गद्य लिहितात.इंग्रजीवर त्यांची ब-यापैकी हुकुमत आहे.तीनेक वर्षांपूर्वी 'गझलरंग'ने त्यांना झपाटलं...ते काॅमर्सचे पदवीधर म्हणून फायदेशीर गुंतवणुकीचा सल्ला इतरांना देत असले तरी कवी म्हणून त्यांना जाणवलं की नफा-नुकसानीचा विचार करण्याचा हा क्षण नाही.जीवनाचा अर्थ आपल्या फिक्स डिपाॅझिट मध्ये टाकणारा हा क्षण आहे.आणि त्यावर दादलेवा अनमोल परतावा मिळणार असेल तर कुठलेच कॅल्क्युलेशन्स,कुठलीच आकडेमोड करण्याची ही वेळ नाही.मागचा पुढचा कुठलाच विचार न करता द्या झोकून स्वतःला-

या क्षणासाठीच जगलो आजवर मी
हातचे राखायची ही वेळ नाही

आणि हाच तर तो देखणा क्षण असतो...ज्याच्या सौंदर्यानं भान हरपून जातं...कुठल्याशा अज्ञात चंदनबनातून सळसळत एक नागीण येते...कडकडून दंश करते...अंगभर अंगार लावणा-या गझलच्या शेराचे जहर शब्दाशब्दात चढत जाते...ज्याला उतारा नसतो-

नेमकी कुठल्या क्षणी डसलीस गझले
दृष्ट मी काढेन म्हणतो त्या क्षणाची
______________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि.२७ जून, २o१५◆
_______________________________________________

No comments:

Post a Comment