Saturday, June 20, 2015

माझ्यात एक तान्हे, माझ्यात एक आई




समोर इच्छित स्थळी पोचण्याचे  अनेक पर्याय आहेत.त्यातला एक मार्ग निवडायचा आहे.हरेकाचे आपले काही फायदे-तोटे आहेत. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात हरघडी असा निर्णयाचा क्षण असतो.निवडलेला मार्ग चुकीचा निघाला तर भरकटण्याची भीती असते.आणि आपल्याला तर सगळं कसं सुनिश्चित-सुरक्षित हवं असतं.जोखीम कोण स्वीकारेल?असं आपलं मन आपल्याला बजावत असतं.जोखीम नाही तर लाभही नाही.हे तत्त्व पचनी पडायला अजून वेळ असतो.रिस्क मॅनेजमेंट,चेंज मॅनेजमेंट वगैरे गोष्टी तर आपल्या गावीही नसतात.भरकटल्याशिवाय अज्ञात प्रदेशातल्या नव्या जगाशी आपला परिचयही होत नाही.शिवाय भरकटण्याची म्हणून आपली एक मौज असते,एक थ्रील असतं. पुस्तकं वाचून,सिनेमे पाहून ते अनुभवता येत नाही.ह्या भावस्थितीला समीर चव्हाण ह्यांनी शब्दांच्या चिमटीत अचूक पकडलं-

भरकटलो तर भरकटलो भरकटून पाहू
जोवर गंमत येते आहे चालत राहू

ज्याला आयुष्याची लढाई जिंकायची आहे;त्यानं मदतीला येणा-यांची किती आणि कुठवर वाट पहायची?'तुम्ही आले तर तुमच्यासोबत;नाही आले तर तुमच्याशिवाय' अशी तयारी ठेवावी लागते.तरच मोहिमेकरिता आगेकुच करणं शक्य असतं.हा निर्धारही समीरनं तेवढ्याच थेटपणे मांडलाय-

आले तर आले नाही तर नाही
आयुष्य थांबते का कोणासाठी

तारुण्यात आपल्या देहावर माणसाचं असीम प्रेम असतं आणि त्याच्या मेंदूवर त्याचा अती विश्वास असतो.पण अव्याहत फिरणा-या कालचक्रामध्ये काय आणि किती शाश्वत राहतं?ना देह आपला सोबती ,ना बुद्धी आपली सखी;हे तुला कधी उमजेल सवंगड्या-

कुठवर देइल साथ देह हा, मेंदू हा
कधीतरी परवड मित्रा होणारच की

मूळ पुण्याचे  असलेले समीर चव्हाण सध्या कानपूरच्या आय आय टी मध्ये गणिताचे प्राध्यापक आहेत.गणित हा त्यांच्या आवडीचा प्रांत आहे.गणितातल्या आचार्य पदवीचे ते धनी आहेत.गणिताच्या आंतरराष्ट्रीय परिषदांतील त्यांचा सहभाग हा मराठी माणसाकरिता अभिमानाचा विषय आहे.लक्ष्मी आणि सरस्वतीचं भांडण असतं.गणित आणि कवितेचं वाकडं आहे.अशा परंपरागत गृहितकांची समीकरणं पार खोडून काढणारं हे व्यक्तिमत्व आहे.आपल्या गझलांच्या शेरात नव्या प्रतिमांची समीकरणं मांडण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच दाद देण्यासारखा आहे.
काव्यातील नावीन्य म्हणजे नव्या प्रतिमांची समीकरणं हे खरं असलं तरी बीजगणित म्हणजे कविता नव्हे हा मर्ढेकरांनी दिलेला इशाराही तेवढाच महत्वाचा आहे.हे कळत-नकळत जेव्हा
घडतं तेव्हा साहित्याला केवळ साहित्याचा वास न येता प्रत्यक्ष जीवनाचा गंध येतो.आणि तो सुगंध होऊन एखाद्या शेरातून दरवळतो.मेंदू विसरायला लावणारी त्याची हलकी हलकी झिंग काळाच्या लांबरुंद तुकड्यात मनावर अंमल गाजवते.अशा काही मोजक्या क्षणांसाठीच तर कवीचं जगणं असतं.अशाच एखाद्या निर्मितीच्या क्षणी सुंदर शेराचा जन्म होतो-

आधार जीवनाचा, आधार जीवनाला
माझ्यात एक तान्हे, माझ्यात एक आई.

__________________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि.२० जून, २o१५◆
-----------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment