Friday, June 12, 2015

तू काळजाचे एकदा 'लोणार' कर!


मी तुला भेटायचेही टाळते पण
तू विचारासारखा येऊन जातो.

मनीषा नाईक यांचा हा शेर माझ्या मनात रुतून बसला.सहजच तुम्ही मला प्रश्न विचाराल 'पण का ?'
आणि मी म्हणेन,त्यात प्रतिमेचं नावीन्य आहे म्हणून.कवितेत नवेपणा येतो तो केवळ आणि केवळ प्रतिमांच्या नावीन्यामुळेच.भाषेच्या पातळीवर काहीशी आधुनिकता येऊ शकते.वृत्त-यमकांच्या बाबतीत थोडी फार विविधता संभवू शकते.कवितेच्या ह्या उपांगांनी नावीन्याचा आभास निर्माण होऊ शकेलही कदाचित.पण तो शेवटी आभासच असणार.ह्या विश्लेषणात मी  कविता असा शब्द उपयोगात आणला असला तरी  गझल,अभंग,लावणी,गीत,मुक्तछंद ह्या सर्व काव्यप्रकाराला हे सारखेच लागू पडावे.गझलेतला शेर ही दोन ओळींची स्वतंत्र कविताच असल्यामुळे अर्थात त्यालाही हे लागू पडेलच.
मनीषाच्या वरील शेरात पहिल्या ओळीत नवीन असं काहीच नाही.परंतु दुस-या ओळीत  'विचारासारखा' हा जो शब्द आलेला आहे त्या शब्दाने दोन ओळीच्या शेराला काव्यमूल्य प्रदान केले.मनाच्या रस्त्यावर विचारांची रहदारी निरंतर सुरू असते.ह्या रहदारीला नियंत्रित करणे शक्य नसते.ती अटळ असते.ह्या मनोव्यापाराला वरील शेरात प्रतिमारूप मिळाले आहे.
कोकणातल्या अलिबागजवळच्या गरूडपाड्याची मनीषा जेव्हा तिच्या शेरात 'लोणार' घेऊन येते.तेव्हा ते कौतुकास्पद असतं. नवी प्रतिमा लेऊन येणारा तिचा तो शेर मला मनोमन भावला-

उल्केपरी चल सोडते आकाश मी;
तू काळजाचे एकदा 'लोणार' कर!

आमच्या व-हाडातल्या बुलडाणा जिल्ह्यात मेहेकरजवळ हजारो वर्षापूर्वी प्रचंड मोठा उल्कापात झाला.आणि जगप्रसिद्ध लोणार सरोवराची निर्मिती झाली.खगोल-भूगोलाच्या ह्या घटनेला प्रतिमारूप देऊन आपला प्रेमानुभव मनीषाने व्यक्त केला.प्रत्यक्ष डोळ्यांनी आपण लोणार पाहिले असेल तर त्याचा विराट आकार आपल्या डोळ्यात मावत नाही.सरोवराच्या पाण्यात पडलेले आकाशाचे प्रतिबिंब वरच्या टेकड्यावरून न्याहाळताना आपल्या पापण्यात कायम कैद करून ठेवावेसे वाटते.हा अनुभव ज्यांनी घेतला असेल त्यांना काळजाचे 'लोणार' करणे म्हणजे काय हे प्रतीत व्हावे.लोणारच्या दैत्यसुदन मंदिरावर कोरलेली मैथुनशिल्पे आपल्याला थेट खजुराहोला घेऊन जातात.म्हणून तर मी लोणारला व-हाडचा खजुराहो म्हणतो.
मनीषाचा मनसमजावणीचा एक शेर खूपच उंचीचा आहे-

नको उंच घेवू भरारी मना तू
जिथे टोक येते कडेलोट होतो.

माणसाच्या मनाला उंचीचं विलक्षण आकर्षण असतं.म्हणून तर त्यानं स्वर्गाची कल्पना करताना उंचच उंच अशा आकाशात केली आहे.पण महाकवी गालिब आपल्या शेरातून माणसाचे पाय जमिनीवर आणून ठेवतो-

हमको मालूम है जन्नत की हकी़क़त लेकिन
दिल को बहलाने के लिए 'ग़ालिब', ये खयाल अच्छा है

उंच सुळक्याच्या टोकावरून होणारा कडेलोट यापेक्षा वेगळा काय असणार ?कधी शिक्षा म्हणून झालेला कडेलोट  तर कधी आपण स्वतःहून गंगार्पण केलेली उडी.काहीही असो,पवित्रतेचे पाणी निवळायला जरासा  वेळ तर लागणारच-

आत्ताच मारली बघ गंगेत मी उडी;
लागेल वेळ पाणी निवळायला जरा.
_____________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि.१३ जून, २o१५◆
-----------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment