ना नात्याचा ना गोताचा. पण का कोणजाणे एखाद्याचं जाणं आपल्याला जिव्हारी लागून जातं.आयुष्यात कधी गाठभेट झालेली नसते.चार -दोन सुखदुखाःच्या गोष्टी झालेल्या नसतात.एकमेकांचे हात हातामध्ये घेतलेले नसतात.संगमंगं दोन घास-चार घोट असं काही काही नसतं.तरी अचानक एक अनामिक पोकळी उरात का जाणवते.काही कळत नाही.त्या दिवशी असंच झालं...सतीशनं फेसबुकवर पोस्ट टाकली...'मित्रहो, आपला नाना गेला'...नाना बेरगुडे...आपण त्याचे एक दोन फोटो फेसबुकवर पाहिले होते...त्याची व्हीलचेअर मनात रुतून बसली होती.तरूण गझलकार म्हणून त्याचे काही शेर जाणीवेत अटकून बसले होते.आत आत शोध घेतला तर काही गोष्टी हाती लागतात.नातं नाही कसं म्हणता? सगळ्या नात्याहून मोठं असलेलं शाईचं नातं होतंच की त्याच्याशी आपलं.आणि त्याच्या व्हीलचेअरशी असलेला 'दर्द का रिश्ता'...अपंगत्वाशी असलेलं दुःखाचं गोत्र...हृदयाला डागण्या देणारं...कुठल्याशा गूढ तहानेने कंठ कोरडा पडत जातो...'किती खोल किती गूढ/ होती अघोर पिपासा /मृत्यू येण्या अगोदर /माझे शरीर तपासा' नानाच्या ह्या ओळी आज अंगावर चालून येतात.ह्या अनामिक तहानेच्या ओढीनं त्याला दिलेला शेर वाचल्यावर मनात कायम 'बुडबुड' ध्वनीनं नादावत राहतो-
हे तिच्या बारीक तोंडाला विचारा,
का अधाशी वागते पाण्यात घागर?
तुम्ही किती जगले? ह्यापेक्षा कसं जगले?हेच अधिक खरं. उणंपुरं एकोणतीस वर्षाचं आयुष्य नानाला लाभलं. पण जगलेल्या-भोगलेल्या प्रत्येक क्षणाचं सोनं करणारा गझलचा परीस त्याला गावला होता.भावला होता.त्याचं भावजीवन समृद्ध करीत होता.
फुलांची ओळख पटत चालली होती.पाकळ्यांची पहचान होऊ लागली होती.आणि उरलेल्या खुळखुळ्यांची जाण येऊ लागली होती-
ना फुलांवर,ना फुलांच्या पाकळ्यावर
नाचले आयुष्य साध्या खुळखुळ्यावर
'सोसवेना ज्याला संसाराचा ताप /त्याने मायबाप होऊ नये.'संसाराची ही आग मायबाप आपल्या अंगावर घेतात.आपल्या चिल्या-पिल्यांना त्याची आच लागू नये म्हणून आपल्या अस्तित्वाचा आडोसा मधे धरतात.लेकरं वयानं लहान आहेत म्हणून त्यांना मायबापाचं जळणं कळत नाही.असा आपला समज.पण अखेर तो गैरसमज असतो.मायबापांची होरपळ लेकरांना कळते.आगेची धग त्यांना जाणवते.बापाची मान विवंचनेच्या विळ्यावर असताना त्याचा डोळा लागला नाही.तर लेकरांच्या पापण्यात झोप मुक्कामाला येईल तरी कशी -
लेकरे वेड्या कशी जातील झोपी ?
जर गळा ठेवून तू निजतो विळ्यावर
नाना परभणीचा.शिक्षकाच्या घरात जन्मलेला.जेमतेम शिकलेला.'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' अशा शारीर संघर्षाशी हत्तीबळानं झुंजणारा.हातघाईच्या- खरं तर पायघाईच्या लढाईत त्याचं आत्मभान प्रखर होत गेलं...नेणीवेच्या पार जाता जाता त्याला कळलं... सोन्याचा झाला म्हणून काय झालं?पिंजरा अखेर पिंजराच!कोंडमारा शेवटी कोंडमाराच!माणसाच्या मनाची शोकान्तिका अशी की मुक्त असताना त्याला कुठेतरी गुंतून पडावसं वाटतं आणि गुंता वाढत गेला की त्याचा नाजुक रेशमीबंध त्याला काचू लागतो.आपण कैद झाल्याची भावना बळावत जाते.मनपाखरू गुदमरू लागतं.सुटकेचा मार्ग शोधू बघतं.पण त्या बिचा-याला काय माहीत?आणि एका पाखराला दुस-या पाखरानं सांगून उपयोग तरी काय?-
पाखरा हे योग्य नाही पाखराने सांगणे
पिंजरा विरघळत नसतो पंख फडफडल्यामुळे
_____________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि. २८ नोव्हेंबर,२o१५◆
_____________________________________________
No comments:
Post a Comment