Friday, November 20, 2015

भुकेजल्यांची भणंग दिंडी उभी दिसे ती तुझ्याच दारी




मराठमोळ्या संस्कृतीचा अंतरात्मा म्हणजे पंढरपुरची वारी.शिकलेले-अडाणी,गरीब-श्रीमंत असे अठरापगड जाती-धर्माचे लोक वारीत आपला आगापीछा सर्व समर्पित करून विठ्ठलमय होतात.मानवी समतेचे अधिष्ठान असलेला विठ्ठलधर्म हा त्यांचा एकमेव धर्म असतो.खरीपाची पेरणी करण्यापूर्वी एक आणि  पिकाच्या राशीने घर भरू लागल्यावर  दुसरा असे दोन कुणब्यांचे महासण. एक आषाढातली देवशयनी एकादशी. दुसरी कार्तिकातली प्रबोधिनी एकादशी.शयनावस्थेपासून प्रबोधनापर्यंत प्रवास करणारी पंढरपुरची वारी महाराष्ट्राला किमान हजार वर्षांपासून समतेच्या संस्काराचे पसायदान वाटत आली आहे.  
  
उद्या कार्तिकी एकादशी.पंढरपूरची यात्रा.महाराष्ट्राच्या कान्याकोप-यातून आलेली लाखो भाविकांची मांदियाळी विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर होते.वैष्णवांच्या या महासणाला अलोट गर्दी लोटते.मराठी संस्कृतीचे ऐश्वर्यवान वैभव असलेल्या वारीत भक्तांच्या संगतीने विठुमाउली चालत असते.महाराष्ट्रातल्या नगर-महानगरातून,शहरातून-गावातून,खेड्या-पाड्यातून लाखो पावलं पंढरपूरच्या दिशेने  निघतात.
सहज काव्यस्फुरणे हा योगमार्गातील एक शुभसंकेत मानला जातो.श्याम पारसकर ह्या कविमनाला विठ्ठलाच्या  गझला स्फुरल्या. त्यांचा आस्वाद घेताना आपले एकादशीचे पारणे काही अंशी फिटावे. 
कुणबी पिकावर शहाणा होतो म्हणतात.पेरणी साधण्यासाठी प्रसंगी त्याला घरातला मुडदा तसाच झाकून ठेवावा लागतो.अनेक वर्षानंतर ह्या वर्षी मृग ओला झाला होता.काही पेरण्या झाल्या होत्या.काही व्हायच्या होत्या...आणि पावसाने दडी मारली.वारीतल्या कुणब्यांचा जीव दुथडी झाला.एकीकडे पांडुरंगाच्या भेटीची ओढ पावलांना खेचत होती.दुसरीकडे डोळ्यांची चिंता नजरेच्या वाटेने आकाशात  जाऊन रुतत होती...

भुकेजल्यांची भणंग दिंडी उभी दिसे ती तुझ्याच दारी,
अशा घडीला जरी न तारी ,म्हणू कसा आपला विठोबा?

मनाचा असा आर्त  धावा चालला होता.
मन काही केल्या संसारातून निघता निघत नाही.बायको-पोरांचं,गुरा-ढोरांचं कसं होईल ही चिंता मनाला खात राहते.ओला दुष्काळ तरी परवडला एकदाचा.कमीतकमी गाई-म्हशींना,बैल-वासरांना,शेळ्या-मेंढ्यांना चारा-पाणी तरी मिळते.पण कोरड्या  दुष्काळात ना अन्न,ना पाणी.जीव जगतील तरी कसे देवा?

जमीन भेगाळली अशी की जसे चिरे काळजा पडावे,
कशी अचानक  उभी ठाकली अवर्षणाची बला विठोबा.

पारसकरांच्या  गझलेत कधी असे दुष्काळाच्या दुर्दशेचे दशावतार अवतरतात.कधी  वारीचे तपशीलवार दर्शन घडते. तर कधी अंतरीच्या आर्ततेने काळीज कोंदाटून येते- 

मला एकदा लाव उराशी म्हणून केल्या लाख प्रार्थना; 
अखेर पटले दगडाचा तू,हृदय तुझे पाघळले नाही!

अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील हातरुण गावचे मूळ रहिवासी असलेले श्यामनाथ पारसकर हे सध्या मुर्तिजापूरला सरकारी दवाखान्यात एक्स रे टेक्निशियन म्हणून कार्यरत आहेत. यादवनाथ-महादेवनाथ-श्यामनाथ अशी ही नाथपंथाची तिसरी पिढी पंचक्रोशीतल्या जनमानसावर अध्यात्म-संस्कार करत आली आहे.'कसे करावे जगणे सुंदर हेच शिकविले ज्ञान' हे जीवनसूत्र असलेल्या पारसकरांचे जिव्हाळयाचे विषय आहेत फलज्योतिष आणि वास्तुशास्त्र .माणसाच्या जगण्याशी सुसंगत असलेल्या प्रॅक्टिकल अध्यात्मावर त्यांची अपार श्रद्धा आहे.त्याचा दाखला देणारा हा शेर-

विठू हृदयात बसवोनी निघू गावाकडे आता,
खिरापत प्रेम वाटाया तुम्हासंगे मिळालो रे.

शब्दाशब्दातून अशी 'प्रेमाची खिरापत' वाटण्यासारखे दुसरे संतत्व   काय असणार? 
_________________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि. २१ नोव्हेंबर,२o१५◆
__________________________________________________

No comments:

Post a Comment