Friday, December 4, 2015

सावली झाडास सोडुन जायची नाही कुठे



एक जग आहे बाहेरचं.उंबरठा ओलांडल्यावर सुरू होणारं.चार भिंतीपलीकडचं.कंपाउंड वाॅलच्या पुढे आरंभ होणारं.त्यात बरं-वाईट,काळं-बेरं,खरं-खोटं,डावं-उजवं,निष्ठा-गद्दारी, नीती-अनीती,शांती-कोलाहल अशी सगळी विरोधी शिखरं आपल्या पोटात पचवून ढेकरही न देणारं.सकाळी एकमेकांना जीव लावणारी माणसं सायंकाळी एकमेकांच्या जीवावर उठतात.स्वतःला विसरून दुस-यावर अपार प्रेम करणारी तीच माणसं परस्परांना पाण्यात पाहतात.टोकाचा द्वेष करतात.अशा  बहुरंगी-बहुढंगी-बहुरुपी दुनियेचा थांगपत्ता ना तत्ववेत्त्यांना लागला,ना संतमहंतांना.ना वैज्ञानिकांना गावला,ना कवी-लेखकांना सापडला.अंतर्मुख होऊन पाहिलं तर आपल्या आतलं जग ह्याहून वेगळं नाही.आपल्या आत आपणच आपले नायक.आपणच आपले खलनायक.आपलाच अभिनय.आपणच प्रेक्षक.बाहेरची दुनिया आणि आतलं जग म्हणजे बिंब-प्रतिबिंब.ह्या अंतर्बाह्य विश्वाला जेव्हा शब्दसृष्टीचे इश्वर  चिमटीत धरू पाहतात.तेव्हा मनोज दसुरीचा शेर त्यांचं प्रतिनिधीत्व करतो-

बाहेरसुद्धा फार काही वेगळी नाही
दुनिया मनाच्या आतलीही चांगली नाही 

जगभरातल्या माणसांच्या जीवनमानाचा दर्जा खरोखर सुधारला की नाही माहीत नाही.पण जागतिकीकरण कागदोपत्री झालं म्हणतात.माणूस आपल्या गल्लीपुरता लोकल होऊ शकला नसला तरी तो न्यूज चॅनेल्सच्या छोट्या पडद्यावर मात्र ग्लोबल वगैरे झाला म्हणतात.ह्या ग्लोबल व्हिलेजच्या एखाद्या काना-कोप-यात कुठेही जरासं काही 'खुट्ट'वाजलं की कामच झालं.लगेच आभाळ कोसळू लागल्याच्या अफवा एका क्षणात जगभर पसरतात.मग माणसाला मनासारखं जगता येत नाही.नितळ नजरेनं शेजा-याकडे बघता येत नाही.ठरवलेल्या दिशेनं चार पावलं बिनधास्त चालता येत नाही की सुखदु:खाच्या दोन गोष्टी आपल्या माणसांशी मनमोकळेपणानं बोलता येत नाहीत.आपुलकीच्या दुष्काळात माणसाच्या मनाचा कोंडमारा होतो.मोकळ्या श्वासाला मोताद झालेल्या त्याच्या उपाशी मनाचा जीव जातो.ह्या मेलेल्या मनाची हेड लाईन ना पेप्रात येत.ना टीव्हीवर त्याची 'ब्रेकिंग न्यूज' दिसत-

आतल्या कोलाहलाची बातमी आहे कुठे?
मी मनाला मारल्याची बातमी आहे कुठे? 

अवतीभवतीची सगळीच माणसं थोड्याफार फरकानं मन मारून जगणारी.तपशीलात जरासा बदल असेल,पात्र वेगवेगळी होत असतील,बाकी पडदा पडेपर्यंत एकच महानाट्य चाललेलं.खोट्या-खोट्या जगण्याचं.मनमोकळं करायला जाए तो जाए कहाँ. नाटकातली सर्वच पात्र परिस्थितीची गुलाम.इथूनतिथून सगळेच दुष्टचक्रात फसलेले.कोण धीर देईल?

मी झिजवल्या उंबऱ्यांनी घातली पदरी निराशा
धीर देणारी कधी ना पावले दारात आली.

मूळचे राजापूरचे असलेले मनोज दसुरी नोकरीसाठी मुंबईत आले. ते कोकणातल्या फुलवेलींची,फळझाडांची  हिरवळ मनात घेऊन. कुठेतरी वाचल्याचं आठवतं...झाडाच्या फांद्या म्हणजे आकाशात पसरलेली मूळं...आणि मूळं म्हणजे जमिनीत पसरलेल्या झाडाच्या फांद्या.झाड स्वतःला जमिनीशी बांधून घेतं म्हणून ते आकाशात उंच जाऊ शकतं.वर वर झेपावणा-या फांद्यांचे शेंडे उंच आकाशात झेंड्यासारखा आपला पर्णसंभार फडकवतात.त्या फांद्यांना जीवनरस पुरविणारी मूळं ओलीच्या ओढीनं खडक भेदून पाताळ गाठतात.एका अर्थानं झाडासाठीच फांद्या आणि मूळं झाडाच्या आत्म्यापासून दूर दूर जातात.कुठेतरी अंतर वाढत जातं...मुलींची लग्न झाली.त्या आपल्या संसारात रमल्या.मुलं पोटामागे धावत थेट परदेशात गेली.आताच तर खरी गरज आहे  एकमेकांच्या आधाराची.आजोबाला एकटं सोडून जायला आजीचा पाय निघणार तरी कसा?

जाउदे स्वर्गात शेंडा अन मुळे पाताळ गाठो
सावली झाडास सोडुन जायची नाही कुठे.
_____________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि. ५ डिसेंबर,२o१५◆
_____________________________________________

No comments:

Post a Comment