Friday, November 13, 2015

का वाटते ही कोर चंद्राची विळीगत ?



गुन्हेगाराला फाशी देताना त्याची अंतिम इच्छा विचारली जाते.तेव्हा इच्छांच्या ह्या अनंत जंजाळातून एकच इच्छा तो कशी निवडत असेल?शेवटच्या घटका मोजताना माणूस इच्छांचा प्राधान्यक्रम कसा ठरवत असेल?एकीला निवडताना बाकीच्या इच्छा कोणत्या निकषांवर बाद करत असेल?ह्याविषयी मला अपार  कुतुहल आहे.काही क्षणांनी नष्ट होणा-या शरीराच्या नाक,कान,जीभ,त्वचा ह्या चारही संवेदना आपसुक दुय्यम होत असतील.आपल्या प्रियजनांना डोळेभरून पाहण्याची इच्छा प्रबळ होत असेल.आपल्या आवडत्या व्यक्तींच्या दर्शनाची इच्छा लार्जर दॅन लाइफ आहे म्हणून तर 'कागा सब तन खाइयो,चुन चुन खाइयो मास/दो नयना मत खाइयो मोहे पिया मीलन की आस' अशा काव्याचा जन्म झाला.आकाशगंगेतले ग्रहतारे आपल्या बांधील कक्षेत फिरता फिरता कधीकाळी घटकाभर  एकमेकांच्या अगदी निकट येतात.आणि नंतर आपापल्या नियत दिशेनं चालू लागतात ते पुन्हा कधीच न भेटण्यासाठी.माणसांचंही तसंच आहे.'हजारो ख्वाहिशे'असणारा गालिब म्हणतोचना- 'ये न थी हमारी किस्मत के विसाले यार होता' जन्मभर माणसाच्या अशा कितीतरी इच्छा मरतात.त्यांना तिथेच गाडावे लागते जिथे त्यांचा जन्म होतो.आणि त्याच जागेवर उगवतो स्वप्नील शेवडेंचा शेर-

इथे करतात इच्छांना दफन 
तसे जागेस ह्या म्हणतात मन

आकाशात उगवलेला पोर्णिमेच्या चंद्रात कधीकाळी कवींना प्रियेचे मुखदर्शन व्हायचे. ह्या पूर्णचंद्रात कधी भुकेल्या कवीला भाकर दिसायची.कधी हा चंद्रगोल कवीला प्रियेच्या कपाळावरची बिंदी वाटायचा.कधी चंद्रकोर कवीला सागरातल्या नावेसारखी भासायची.तर कधी ह्या चंद्रकोरीच्या आकाराने कवीला तरुणीने काढलेल्या बोटाच्या नखाची आठवण व्हायची. अशा अनेक चंद्रकला कवितेत आल्या.पण स्वप्नीलला झालेले चंद्रदर्शन मात्र विलक्षण आहे.प्रियेच्या विरहात जळताना त्याला चंद्रकोर चक्क भाजी चिरणा-या विळीसारखी वाटते-

का वाटते ही कोर चंद्राची विळीगत ? 
रात्री अजुन विरहात मी चिरल्यात कोठे ?

कधीकधी औपचारिकपणे सहानुभूती दाखवणा-या माणसांचाही आपल्या जीवाला फार ताप होतो.घडून गेलेली घटना आपण विसरायचा प्रयत्न करतो.आठवणींच्या जाचातून सुटण्याची कोशीश करतो.आणि सांत्वनासाठी आलेल्या दोस्त-मित्र-नातेवाइक-शेजारी-परिचितांसमोर आपल्याला तीच घटना पुनःपुन्हा उगाळत बसावी लागते. वारंवार कराव्या लागणा-या ह्या प्रयोगात 'कॅथर्सिस'च्या सिद्धांताने मूळ दुखःची तीव्रता कमी होतही असेल कदाचित.ते सर्व ठीक आहे हो,पण हा उपचार  रोगापेक्षाही भयंकरच म्हटला पाहिजे-

ठीक आहे पण करू मी काय त्याचे ?
लोणचे घालायचे का सांत्वनाचे ?

माणसाला एकवेळ खायला काही नसलं तरी तो जगू शकेल पण त्याच्याजवळून त्याची स्वप्ने हिरावून घेतली तर मात्र तो वाचू  शकणार नाही.स्वप्नांचं लोहचुंबक त्याला सारखं पुढे पुढे ओढत राहतं.तर संसाराचे साखळदंड त्याला सतत मागे मागे खेचत राहतात.एकीकडे उपाशी स्वप्नं आ वासून एका घासात माणसाला खाऊ बघतात तर दुसरीकडे संसाराचा प्रेशर कुकर माणसाला पकवत राहतो.इथे तर ह्या कवीचं नावच स्वप्नील. मूळ पुण्याचे असलेले स्वप्नील शेवडे याच पुण्यनगरीत साॅफ्टवेअर कंपनीत नोकरी करतात.कम्प्युटर अप्लिकेशन मधली मास्टर डिग्री धारण केलेला हा कवी गझलमधून माणसाच्या अनुभुतीची हार्डडिस्क वाचतो-

स्वप्न अन् संसार दोघेही भुकेले 
मी तयांची भाकरी आहे कदाचित
_________________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि.१४ नोव्हेंबर,२o१५◆
_________________________________________________

No comments:

Post a Comment