Friday, November 6, 2015

एकदा गालाहून फिरव ना हात आई




आज गोवत्स वसु बारस.खरं तर हाच आपल्या दिवाळी सणाचा पहिला दिवस.कृषी संस्कृतीत पोळ्यापासून सुरू होणारा प्रत्येक सण हा  कृतज्ञता दिन.वर्षभर शेतीत राबराब राबणा-या बैलांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करावयाचा सण म्हणजे पोळा.'दिन दिन दिवाळी गाईम्हशी ओवाळी'अशी ओळ दिवाळीच्या लोकगीतात येते तीही याच अर्थानं.आमच्या लहानपणी गोवत्स वसु बारस गोठाणावर साजरी व्हायची.पहाटेपासूनच गाईवासरांना तिथं कडबा-हिरवेगवत असा चारा वाढलेला असायचा.भल्या पहाटे उठून माय गाई-वासरांसाठी भाकरी करायची.भात टाकायची.तो नैवेद्य घेऊन शेजारच्या पोरांसोबत आम्ही गोठाणावर हुंदडायचो.आयाबाया गाई-वासरांची पूजा करायच्या.त्यांना चारा-भाकर चारायच्या.नमस्कार करायच्या.एका विलक्षण समाधानानं मायलेकरं घरी परतायची.मनात उचंबळणा-या आनंदानं दिवाळीचा शुभारंभ व्हायचा...
काळानं कूस फेरली अन् सगळंच बदललं.शिक्षणासाठी गाव सुटलं.उरलीसुरली गावकी नोकरीनं तुटली.वर्ष-सहा महिन्यातून केव्हातरी घरी जाणं व्हायचं.प्रत्येकवेळी गाव अधिकाधिक भकास वाटायचं.गजबजलेलं गोठाण...'हम्बाsss'ची साद घालणारे...अंतर्बाह्य व्याकुळ करणारे हंबर...नदीच्या पाण्यासोबत आटून गेले.मायची भेट घेताना...आपले खरबडीत कष्टाळू दोन्ही हात कपाळावरून... गालावरून... हनुवटीपर्यंत मायेनं कुरवाळत ती गोंजारायची...दिवाळी असो की नसो... आपली दिवाळी साजरी व्हायची...आज हे सगळं मनात ताजं झालं...ते गणेश शिंदेचा शेर वाचून-

एकदा गालाहून फिरव ना हात आई
कैक दिवसापासून घरी सणवार नाही!

हे सगळं आत आत कुठंतरी धरून ठेवावसं वाटतं.शब्दात बांधून ठेवावसं वाटतं.चित्रात पकडून ठेवावसं वाटतं.पण कालचक्र धरू पाहणारे हात दरवेळी जखमी होतात...मन घायाळ होतं...हृदय रक्तबंबाळ होतं...बुद्धी बिचारी काय करणार?कालाय तस्मै नमः म्हणत तिला शरण जाणं भाग पडतं...दुःखाचा वैशाखवणवा असो की श्रावणसुखाची रिमझिम...आत्ता होती...आत्ता नाही...मुक्कामी काहीच थांबत नाही...गणेशच्या शेरात हे यथार्थ किती अल्लद उतरलं-

हृदयावरुनी किती मोसमी वारे आलेे-गेले
एक सुखाची सर मुक्कामी कधी थांबली नाही.

अव्याहतपणे चालणा-या जीवनाच्या ह्या धडपडीला खरोखर काही अर्थ आहे का? ह्या रोजमर्राच्या मुसलसल आपाधापीला खरंच काही मतलब आहे का? की पृथ्वीच्या जन्मापासून तर महाप्रलयात होणा-या तिच्या अंतापर्यंत हे सगळंच निरर्थक,बेमतलब चालत आलंय...पुढेही सुरूच राहणार आहे...असे प्रश्न जगभरच्या तत्त्ववेत्यांना हजारो वर्षे सतावत आलेत.पूर्वेकडच्या उपनिषदीय 'तत्वमसि' पासून पाश्चिमात्य पोस्ट माॅडर्न इझममधील 'नथिंगनेस' पर्यंतची सर्व उत्तरे शोधून झाली.पारखून झाली.तरी मूळ प्रश्न कायमच आहे.गणेशने नितांत साधेपणाने त्याच्या शेरात एक उत्तर शोधले-

नव्याने तुला वाचले जीवना तर 
जुनी ओळ देखिल नवा अर्थ देते.

गणेश शिंदेंचं मूळ गाव दुसरबीड. देऊळगाव राजाला ग्रामीण रुग्णालयात फार्मासिस्टची नोकरी करताना हल्ली ते आजारी माणसाला गोळ्या-औषध देतात.जमिनीवरील आपल्या 'पाया'ची दखल न घेता आभाळाची उंची डोळ्यात खुपणा-या माणसाच्या क्राॅनिक आजाराचे ते गझलच्या शेरात निदान करतात.त्यावर इलाज म्हणून गोळीऐवजी शेरच्या ओळी देतात.ह्याला म्हणतात-एकही टुक मे आराम-

उंच किती जावे कळसाने
हे त्याच्या पायावर ठरते!
_____________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि.७ नोव्हेंबर,२o१५◆
______________________________________________

No comments:

Post a Comment