Friday, October 30, 2015

शाळेत न्याल का हो ? की द्याल फक्त नाणे ?




अवती भवतीच्या वास्तवात संवेदनशील मन घेऊन जगत असताना कवीला सतराशे साठ समस्या सतावत असतात.कवीच्या अंतर्मनाला अनंत प्रश्न पडत असतात.कविमन म्हणजे जणुकाही प्रश्नचिन्हाचं एक भलंथोरलं कटआउटच असतं.वाचनाच्या रहदारीत ते येताजाता आपलं लक्ष वेधून घेत राहतं.आपल्या डोळ्यावर आदळत राहतं.आपल्या नजरेत खुपत राहतं.हे सगळं प्रकरण असह्य होत जातं.मग  आपल्याच नकळत आपण त्या प्रश्नचिन्हाकडे कानाडोळा करू बघतो. चौकातल्या रहदारी नियंत्रक लाल दिव्याला नजरेचा सलाम ठोकत पुढच्या चौकाकडे निघतो.तर तिथे आधीच्याहून मोठ्या प्रश्नचिन्हाचं कटआउट आपलीच वाट पाहत उभं असतं.ते म्हणतं...राजा,फार काही नकोरे तुझ्याकडून...हवाय फक्त तुझा एक कटाक्ष...विश्वजीत दीपक गुडधेचा हा शेर आपल्याला अशाच एका रहदारीच्या चौकात भेटतो...एक साधा प्रश्न विचारतो...आपल्याला कमालीचं अस्वस्थ करतो...आणि आपलं घर येईपर्यंत आपला पिच्छा पुरवतो-

चौकात मागणारा, मुलगा मला म्हणाला : 
"शाळेत न्याल का हो ? की द्याल फक्त नाणे ?"

औपचारिक शिक्षणावर नको तेवढा भरवसा करणारे आपण कधीतरी हा  विचार करतो...शाळा न शिकणारी मुलं खरंच पुढे कशी वाढत असतील?काय कमावत असतील?काय खातपीत असतील?कुठे राहत असतील?कसं जगत असतील?...की
'धूप मे निकलो,घटाओ मे नहाकर देखो /जिन्दगी क्या है किताबो को हटाकर देखो' म्हणणा-या शायराला फालो करत असतील?
म्हणजे पुन्हा एक प्रश्नचिन्ह!
शाळा-पुस्तकं म्हटली की निदान आमच्या पिढीला तरी साने गुरुजी आठवतात.त्यांची 'श्यामची आई' आठवते.तिने मनावर खोल खोल केलेले संस्कार आठवतात.आणि मनाचा आरसा अधून मधून चुन्यानं पुसायची वेळ आली की साहीरसाहेबांचं मनाचं अजरामर भजन आठवतं...'इस उजले दर्पण पर प्राणी धूल ना जमने पाए' विश्वजीतच्या पिढीलाही हे सगळं आठवत असणारंच...कारण पिढी कोणतीही असो...माणसाचं मन कधीही म्हातारं होत नाही...आणि त्या मनाच्या चिरंजीव जखमा...अश्वत्थाम्याच्या जखमेसारख्या...हजारो वर्षे झाली...तेल मागत फिरत असतात...विश्वजीतच्या शेरात...अलगद उतरत असतात-

घासून-पुसून जाहले शरीर स्वच्छ पण
केवळ मन तेवढे पुसायचेच राहिले.

मातृसत्ताक पद्धतीपासून सुरू झालेला मानवीसंस्कृतीचा प्रवास आज पितृसत्ताक पद्धतीपर्यंत येऊन पोचला.माणसांच्या दुतोंडी वागण्याचा काहीच अंत घेता येत नाही.एकीकडे स्त्रीला देवी म्हणून पूजनीय मानणारे, दुसरीकडे स्त्रीला दासी बनवतात.जी माणसं एकीकडे मातृशक्तीचे गोडवे गातात,तीच माणसं दुसरीकडे गर्भलिंग परीक्षणानंतर स्त्री-भृण हत्या करतात...ह्या वृत्तीचं पोस्टमार्टम करणारा हा विश्वजीतचा शेर-

एकदाचे स्पष्ट झाले : "पाळणा हलणार नाही"
मग गळ्याचा फास झाली, पाळण्याची तीच दोरी.

अमरावती जिल्ह्यातले खार तळेगाव हे मूळ गाव असलेला विश्वजीत सध्या अमरावतीला इंजिनिअरिंगच्या दुस-या वर्षात शिकतोय.कविता,अभंग,गझल असे विविध प्रकार तो सहज हाताळतो.एवढेच नव्हे तर एका डाक्युमेंट्रीसाठी त्याने गीतेही लिहिली आहेत.लेखनाच्या क्षेत्रात अजून फार मोठा पल्ला  गाठायचा आहे.याची जाणीवही त्याला आहे.मुक्त आकाशाच्या दिशेनं उंच झेपावणा-या त्याच्या पंखात आताशा कुठं बळ येऊ लागलं असलं तरी त्याचा हौसला मात्र अतिशय बुलंद आहे.तो गझलच्या विश्वाला नक्की जिंकेल-

हवी अशी बुलंद झेप जीवनात 'विश्वजित' 
तुझ्यापुढे झुकेल आसमान एकदा तरी!
_______________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि.  ३१ ऑक्टोबर,२o१५◆
_______________________________________________

No comments:

Post a Comment