Friday, October 23, 2015

आयुष्याचा तो तितका क्षण सुंदर असतो




काल मित्रासोबत  सुखदुःखाच्या अशाच गोष्टी निघाल्या.वाढत्या वयाबरोबर कोण एवढं नियमितपणे डाॅक्टरांकडे जाऊन शरीराच्या तपासण्या वगैरे करून घेतं?बहुतांश लोकांचं काम तुझ्या-माझ्यासारखंच असतं.जोपर्यंत आपली गाडी प्रवासात बंद पडत नाही तोपर्यंत आपण काही तिला गॅरेजमध्ये नेत नाही.दोन पायावर चालणारं-फिरणारं-धावणारं आपलं शरीर म्हणजे अशीच टू व्हिलर गाडी आहे.नादुरुस्त झाली की कधी कधी तिचे स्पेअरपार्टस् मिळत नाहीत.दुकानदार म्हणतो,साहेब,तुमच्या गाडीचं माॅडेल खूप जुनं झालं.बदलून टाका.नवीन गाडी घ्या. शरीर हे आत्म्याचं वस्त्र आहे असं उपनिषदांमध्ये म्हटलं आहे.शरीराचं वस्त्रं जीर्ण झालं की आत्मा ते टाकून देतो.नवीन वस्त्र परिधान करतो.आधुनिक युगामध्ये वस्त्राच्या ह्या प्रतिमेची जागा गाडीच्या प्रतिमेनं घेतली.राजीव मासरुळकरच्या शेरात ही नाजुक 'गाडी' आली तीच मुळी एका वेगळ्याच प्रकारचं पेट्रोल पोटात टाकून...एका अनोख्या धर्तीचं इंधन हृदयात जाळत-

देह असे श्वासांची गाडी
तुझी आठवण इंधन असते.

मानवी संस्कृतीच्या प्रारंभापासून स्थलांतर आणि त्यासाठी करावा लागणारा प्रवास हा माणसाच्या पाचवीला पूजलेला आहे.किती तरी वाटा,किती तरी वळणं, किती तरी दुस्तर घाट सही सलामत पार करत वाटचाल चाललेली असते. वेग कितीही नियंत्रित ठेवला तरी अपघाताच्या शक्यता कमी होत नाहीत.काही हिरवीगार वळणं थांबायला मजबूर करतात.'जरा विसावू या वळणावर' म्हणत आपण जरासं का होइना थांबतोही.'येडे झालो आम्ही द्यावी एखादीच रात' असं एखाद्या रात्री पुरतं  'येडं' व्हायचं आणि दिवस निघाला की शहाणं होऊन तिथून हलायचं.ते पुढच्या मुक्कामासाठी.फार पुढे गेल्यावर कधी तरी जे जे मागं सुटलं त्याची याद येत राहते.जीव जाळत राहते.आपण विचार करत राहतो.मागे पडलेलं हरेक स्थळ अधिकच सुंदर वाटायला लागतं.ते गाव ....ते मित्र...ती शेतं....ते डोंगर... ती झाडं...त्या वेली...ती फुलं....ती थट्टामस्करी...एक ना दोन शंभर गोष्टी...आणि ह्या सर्वांच्या केन्द्रस्थानी असणारी...'ती' ह्यातलं खरोखर काय काय सुंदर होतं?राजीव मासरूळकराच्या शेरानं  त्याला तेवढंच देखणं उत्तर दिलं-

सुंदर नसते कोणी,नसते सुंदर काही
आयुष्याचा तो तितका क्षण सुंदर असतो.

ही सगळी धावपळ चाललेली असते दीड वीत पोटाच्या मागे.देवानं माणसाला भूक दिली.त्या भुकेनं माणसाला गती दिली.त्या गतीनंच माणसाला प्रगती दिली.जमिनीच्या पोटात महा स्फोट करून ब्रम्हांडाच्या उत्पत्तीचा शोध लावण्यापासून  मंगळावर वस्ती करण्याची स्वप्नं पाहणा-या संशोधनाच्या मुळाशी माणसाची ही भूक आहे.तीच ह्या सर्वांचं उर्जाकेन्द्र आहे.माणसाच्या ह्या विराट भुकेचं मासरुळकरांच्या  शेरात पडलेलं हे प्रतिबिंब-

ईश्वराहातून थोडी चूक झाली
पोट छोटे, फार मोठी भूक झाली.367

बुलडाणा जिल्ह्यातल्या मासरुळचे असलेले राजीव मासरुळकर सध्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव येथे शिक्षण विस्तार अधिकारी आहेत.स्थलांतर त्यांनाही चुकलेलं नाही.विद्यार्थ्यांच्या  अनेक पिढ्या घडविण्याची,संस्कारित  करण्याची,माणसात माणुसकी निर्माण करण्याची क्षमता शिक्षकांमध्ये असते.म्हणून शिक्षक हा मनाने खरा असला पाहिजे.तरच तो प्रसन्नतेचा झरा होइल आणि अनेक नात्यानं दु:खात आसराही होइल-

माता,बंधू, बाप,मित्र,दिग्दर्शक,प्रेरक
दुःखातहि आसरा असावा माझा शिक्षक
______________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि.  २४ ऑक्टोबर,२o१५◆
_______________________________________________

No comments:

Post a Comment