Friday, August 21, 2015

मोकळे रडता न आले बाप होतो.




भाषा कोणतीही असो...जगभरातल्या कवितेत आईचे स्थान अढळ आहे.त्या मानाने 'बाप' उपेक्षितच राहिलेला दिसतो.आईवरच्या कविता बहुतांशी पुरुषांनी लिहिलेल्या.अपवादाने काही कवयत्रींच्या कविता आईसबंधी आढळतात.तशाच काही कवींच्या कवितेत बाप उतरलेला आहे.

असं म्हणतात...सात समुद्र ओलांडणारा पुरुष स्त्रीच्या दोन अश्रूत बुडतो.पण हे शंभर टक्के खरं नाही.ते अर्धसत्य आहे.जशी स्त्री भावनाप्रधान असतानाच व्यवहारी असते तसाच पुरुषही व्यवहारी असताना भावनाप्रधान असतो.कर्त्या पुरुषाला आपले अश्रू दाखवता येत नसतात.चार भिंतीचं घर छतासह सांभाळायाचं असल्यानं त्याला मोकळेपणाने रडून कसं चालेल?हा शाप भोगतच त्याला जगायचं असतं...इतरांना जगवायचं असतं.मसूद पटेल यांच्या शेरात  उपस्थित होणारा बाप म्हणून तर आपल्या काळजात घर करतो.

जीवनाला लागलेला शाप होतो
मोकळे रडता न आले बाप होतो.

जगण्याच्या उट्यारेट्यात माणसाला शंभर तडजोडी कराव्या लागतात.तडजोडीचे दुसरे नावच आयुष्य आहे.पण काही तडजोडी करताना आपण आतवर कुठेतरी खोल खोल तुटत जातो.स्वाभिमान,अस्मिता ही आपल्या जगण्याची अधिष्ठाने असतात. ह्या अधिष्ठानाचं सूत्र तडजोडीच्या उंदिराला आपण आपल्या डोळ्यादेखत कुरतडू देतो; ते केवळ आपलं अस्तित्व टिकावं म्हणून.त्याची तकलीफ होते.आपण आतल्या आत चरफडतो. ह्या वेदनांना जगाच्या पाठीवर काहीच इलाज नसतो.आपली आपल्यालाच 'गुपचुपची गोळी' घ्यावी लागते.पण हे करत असताना आपण काय मिळवलं आणि काय गमावलं, ह्याचा लेखाजोखा आपलं संवेदनशील मन मांडतं-

सोडल्यावर तत्व सारे जिंकलो मी
पण खरे तर तीच माझी हार होती.

आमचे अध्यात्म गुरू नाथबाबा नेहमी म्हणायचे,संतमहात्मे झाडासारखे असतात.पुंडलिकावानी मायबापाची इमाने इतबारे सेवा करणारा,एखादा थकला-भागला जीव आस-याला आला तर   झाड आपली सावली तर त्याला देतंच.पण एखाद्यावेळी विश्रांतीला चोर आला, बेवडा आला,दरोडेखोर आला,खुनी आला तर त्यालाही झाड दूर लोटत नाही.तेवढ्याच कारुण्याने झाड आपली शीतल छाया सगळयांना वाटत असतं. झाडाच्या खांद्यावर पाखरं कधी आपली घरटी बांधतात,कधी शीटतातही.पण झाड कधीही तक्रार करीत नाहीत.आनंद आणि दुःखाच्या पल्याड असलेलं हिरवेपण झाडाच्या पानापानातल्या शिरातून अखंड वाहत असतं.पण कधी तरी कु-हाडीचा दांडा गोतास काळ ठरतो.आणि झाड माणसाला अनुसरतं-

पक्षपाती धोरणाने झाड वागू लागल्यावर
कोणत्या न्यायालयी मग पाखरे तक्रार करतिल.

मातृभाषा मराठी नसतानाही मराठीत कविता लिहिणा-यांची फार मोठी परंपरा आहे, ती थेट संताच्या मांदियाळीतल्या शेख महंमदापासून.विदर्भातल्या दिग्रसचे असलेले मसूद पटेल हे त्याच परंपरेतले आहेत.महाराष्ट्र वीज वितरण कंपनीतून ते नुकतेच निवृत्त झालेत.निवृत्तीनंतर काय करावं हा प्रश्न त्यांच्यापुढे आधी नव्हता.आताही नाही.मसूद ह्या शब्दाचा एक अर्थ आहे भाग्यवान.'खुदी से बने खुदा मित्रा' म्हणत, निवृत्तीच्या पहाडावर  आकाश कवेत घेणा-या त्यांच्या अंतरात्म्याने मागितलेली दुआ  कुबुल झाली...

पीर,संत ना इश्वर झालो
भुक्या जिवांची भाकर झालो.
_____________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि. २२ ऑगस्ट, २o१५◆
_____________________________________________

No comments:

Post a Comment