सोलापूरची लेकबाळ असलेली सुप्रिया जोशी.नाशिकला आली ती जाधवांच्या घरची लक्ष्मी होऊन...पुणेकर होता होता तिच्या सोबत गझल आली.जीवनानुभवाच्या वाटा-वळणांनी तावून सुलाखून निघालेली.त्या सुप्रिया मिलिंद जाधव यांचा हा शेर वास्तवाची धग घेऊन आलेला -
काटे-कुटे नि निव्वळ कचरा उरला मागे
घरटयामधले पिल्लू जेव्हा उडते झाले.
हा शेर वाचला अन् माझ्या डोळ्यापुढे ओस पडलेली घरं आली.म्हाता-या आईवडिलांसाठी महिन्याकाठी पाच-दहा हजार रुपये कोरडेपणानं पाठवणारी परदेशी मुलं आली.काट्यांचा सल आणि आयुष्याचा कचरा नगरा-महानगरात उलंडणारं जागतिकीकरण आलं.भौतिक सुखाच्या आकाशात स्वैर उडणारी पाखरं आली.हिन्दी सिनेमाचं गाणं आलं...चिठ्ठी आयी है... आयी है चिठ्ठी आयी...
दुस-याला फसवणं सोपं असते म्हणतात,पण माणूस जेव्हा स्वतःलाच फसवण्याचा प्रयत्न करतो.तेव्हा त्याने आखलेले डावपेच लई भारी असतात.मांडलेले चक्रव्यूह कमालीचे जटील असतात.ह्या जगात आपल्याहून मोठा आपला शत्रू दुसरा कुणीही नाही.दर्पणाचा आपल्याला वारंवार राग येतो तो आपल्यातल्या त्या शत्रूचे दर्शन तो दिवसातून सतरा वेळा करवतो म्हणून.बाहेरच्या दुश्मनांशी तुम्ही लाख निपटून घ्याल हो,पण आतला गनीम तुम्हाला मात दिल्याशिवाय राहत नाही.ही लढाई सुप्रियाच्या शेरात बाअदब कैद झाली आहे-
काल शेवटी शत्रुंची यादीच बनवली
नाव स्वतःचे लिहीत गेले पूर्ण पानभर!
पानं वाढताना डावीकडे अमुक असावं,उजवीकडे तमुक असावं असं आई आपल्या पोरीला,आणि सासू तिच्या सुनेला शिकवत असते.पुरुषांच्या हृदयाकडे जाणारा रस्ता त्यांच्या पोटातून जातो म्हणतात.म्हणून त्याच्या आवडीचे पदार्थ शिकून घ्यावे.सुगरणपणात निपूण व्हावे.त्याला आग्रहाने वाढावे.दोन-चार पेग पोटात गेल्यावर टेबलावर जशी महत्वाच्या डिलिंगची प्रस्तावना होते.अगदी तसंच अर्ध्या जेवणात आग्रहाने वाढता वाढता आपलं मन मोकळं करायचं.गळ टाकायचा.इच्छापूर्तीचा एखादा मासा गावतो का याचा अदमास घ्यायचा.आपण कितीही नाकारलं तरी स्त्री-पुरुषांच्या नात्यातलं हे वास्तव आहे.भूक कोणतीही असो...शरीराची की मनाची...आवडीचे पंच पक्वान्न तिला लागतातच.कितीही आवडीची असली तरी रोज एकच एक चव जिभेला चालत नाही.तिला रुचीपालट हवा असतो.ह्या अलटापलटीच्या आयुष्यात आपलं स्थान काय?ह्या प्रश्नाचा ठसका कधीतरी लागतोच लागतो.आणि मग जिंदगानीच्या भरल्या ताटात आपण केवळ तोंडी लावण्यापुरतेच उरलो ही भावना मनाला खाऊन टाकते ,मग ते मन पुरुषाचं असो की स्त्रीचं-
डावीकडे,उजवीकडे ताटात नक्की मी कुठे?
पक्वान्न आवडते तुझे की फक्त तोंडीलावणे!
भौतिकशास्त्राच्या नियमाला प्रतिमेत परावर्तीत करणारा सुप्रियाचा एक शेर आहे. कवितेची थोडीफार जाण असणा-या कुणालाही तो आवडेल.नुसताच आवडणार नाही तर सूर्यकिरणातल्या सात रंगाचे इंद्रधनुष्य घेऊन येणा-या आशयाचा एक सुंदर कवडसा आपल्या मनोभूमीवर उमटवेल-
प्रकाशाला तुझ्या आधार माझा
जरी मी क्षुद्र आहे कण धुळीचा.
सृष्टीतला हरेक लहान-मोठा जीव पार्थीव आहे.मातीचे अब्जावधी कण मिळून जन्माला आलेला.हवेच्या निर्वात पोकळीत परमात्म्याचा परमप्रकाश प्रकट होतो तोच मुळी मातीच्या सूक्ष्मातिसूक्ष्म कणांनी अडवल्यामुळे.सगुण मातीच्या क्षूद्र कणाचा आधार घेतल्याबिगर त्या विराट निर्गुणाला साकार होता येत नाही.ह्या परमतत्वाच्या कवडशानं अज्ञानाचा अंधार उजळला की पिकल्या फळासारखा अहंकार गळून पडतो.मग जे उरते...ते विराट नसते आणि क्षुद्रही नसते.ते केवळ असते.त्याचेच नाव कैवल्य.
______________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि. २९ऑगस्ट, २o१५◆
____________________________________________
No comments:
Post a Comment