Friday, August 14, 2015

समजून घे अगोदर बाराखडी भुकेची




आज 15 ऑगस्ट.आपल्या देशाचा एकोणसत्तरावा स्वातंत्र्य दिन.आपला राष्ट्रीय सण.आजच्या दिवसाला केवळ एक सुटीचा दिवस म्हणून आपण एन्जॉय करणार असू तर आपल्यासारखे करंटे आपणच.देश स्वतंत्र झाल्यानंतर जन्माला आलेली पिढी आज सत्तरीच्या घरात पोचली आहे.जीवनमूल्यांवर काळाचा परिणाम होणं अपरिहार्य असतं.सात दशकापूर्वीच्या प्रजेची मानसिकता आज अपेक्षित नाही.छोट्या-मोठ्या समुहांनी आपापली अस्मिता जरूर जपावी.पण प्रखर राष्ट्रनिष्ठेच्या बाबतीत कुठल्याच प्रकारची तडजोड संभवत नाही.ज्या देशाची राष्ट्रीयता अबाधित असते तेच देश आपला विकास वेगाने करू शकतात.हे अलीकडच्या जागतिक इतिहासापासून शिकण्यासारखे आहे.ह्या पार्श्वभूमीवर दास पाटील यांच्या शेरातला सवाल आपल्याला अस्वस्थ करतो. आपल्यात सच्च्या देशभक्तीचे आत्मभान जागवतो-

वेगळे झेंडे किती देशात पाहू?
मी तिरंगा कोणत्या हातात पाहू?

साधनशुचिता ह्या तत्वाला आज काहीच अर्थ उरला नाही.माणुसकीचं मूल्य घसरणे आणि चलनी नोटांची किंमत वधारणे हेच आजचे अनर्थशास्त्र.कमावलेला पैसा एक नंबरचा आहे  की दोन नंबरचा ? हा प्रश्न आपल्या प्रश्नावलीतून गायब झाला आहे.टेबलाखालून की टेबलावरून ?असा साधा सवालही आपण कुठल्याच खुर्चीला विचारू नये.धन काळे की गोरे हे विचारणे म्हणजे तर शुद्ध अडाणीपणा.आपले पूर्वज सांगूनच गेले की,आंबे खा राव, झाडं कशाला मोजता? त्याच पूर्वजात   छातीवर गोळी झेलणारा एक गांधी बाबाही होता.ह्याचा पद्धतशीर विसर आजकालच्या अर्थशास्त्राला पडला असावा-

कशी बिथरली आज माकडे तुमची बापू?
जो तो पैशामध्ये गांधी मोजत असतो.

शास्त्र कोणतंही असो, त्याच्या केन्द्रस्थानी माणूस असतो.माणसाचं जगणं-भोगणं,हासणं-सोसणं हेच कोणत्याही शास्त्रचर्चेच्या बैठकीचं अधिष्ठान असलं पाहिजे.जे साहित्य कारुण्य ह्या सर्वश्रेष्ठ मूल्याला अधोरेखित करतं तेच साहित्य अभिजात.बाकी काळाचं भातकं होणारी रद्दी.मृत शब्दांचे अंबार लावणा-या पुस्तकांची लिखापढी करण्यापेक्षा एक जिवंत माणूस आजमावणं केव्हाही चांगलं-

चर्चा नको अवांतर, पुन्हा बोलू ,
माणूस वाच अगोदर, पुन्हा बोलू.

दास पाटील तसे वाणिज्य विषयाचे विद्यार्थी. एम. कॉम.पर्यंत शिकलेले.अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील मिरी हे त्यांचं मूळ गाव.वडिलांच्या नोकरी निमित्तानं मराठवाड्यातल्या बारा गावचं पाणी त्यांनी पचवलं.हल्ली भर उन्हाळ्यात देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरला आलेल्या भक्तांना ते आइस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स पेश करतात.चरितार्थाकरिता सध्या तोच त्यांचा पेशा. 'रंग माझा वेगळा' ह्या कवितासंग्रहात सुरेश भटांनी दिलेली गझललेखनाची बाराखडी त्यांनी एवढी गिरवली; की त्यांच्या शेरात ती प्रतिमा होऊन सहजपणे उतरली... थेट चंद्र-तारकांचा झिलमिल 'सपनो का महल' सोडून-

त्या चंद्र तारकांच्या कवितेस वाच नंतर,
समजून घे अगोदर बाराखडीभुकेची.
_____________________________________________

◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि. १५ ऑगस्ट, २o१५◆
_____________________________________________

No comments:

Post a Comment