Friday, August 7, 2015

अंकुराला दगड सुद्धा चालतो



काही माणसं केवळ डोक्यानं जगतात.जी केवळ आल्या-गेल्या श्वासाची गणितं सोडवत राहतात.प्रत्येक गोष्टीत फायदा-तोटा बघत बसतात.आयुष्य म्हणजे त्यांच्यासाठी एक भली मोठी आकडेमोड असते.
काही महाभाग केवळ पोटावर आणि पोटासाठीच जगत असतात.दीडवितीच्या पोटाची दुनिया हेच त्यांचं सर्वस्व असतं.'खाण्यासाठी जन्म आपला' हेच त्याचं ब्रीद असतं. त्यांची राक्षसी भूक पाहिली की वाटतं,देवानं त्यांच्या शरीरात केवळ पोट हाच अवयव घातला असावा.
तिस-या प्रकारची माणसं जगतात हृदयानं.जी एकमेकांना आपल्या जीवाची शपथ घालतात.प्राण गेला तरी चालेल पण दिलेलं वचन मोडत नाहीत.प्रेम आणि निष्ठा हे त्यांच्यासाठी केवळ शब्दकोशातले कोरडे शब्द नसतात.ते त्यांच्या जगण्याचं अधिष्ठान असतं.काळजांची स्पंदनं जिवंत नसणा-यांच्या मुर्दाड मैफलीत त्यांचं मन रमत नाही.आलेला दिवस कसातरी ढकलनं त्यांना मंजूर नसतं.वाट्याला आलेला हरेक क्षण त्यांना जिन्दादिलीनं समरसून  जगायचा-भोगायचा असतो.अशांचं हृदय त्यांच्या मुठीएवढं कसं असेल? ते सुपाहूनही मोठं असतं.काळ आणि अवकाश ह्या दोन्हीच्या पलीकडे ते आपलं जगणं पाखडत असतात.धोक्याचं असलं तरी त्यांना कायम सोळावं वरीसच लागलेलं असतं-

देहाचे वय किती असो, पण-
हृदयाचे वय असते सोळा.

कमलाकर देसलेंचा ह्या चिरतरुण शेरात जगणं सुंदर करणारा महामंत्र आहे.जो आपला कायाकल्प करतो.त्वचेवर पडल्या तरी तो अंतःकरणावर  कधीच सुरकुत्या पडू देत नाही.'काळाचा घास जरासा' ह्या गझलसंग्रहाचे कवी असलेले देसले आबा धुळ्याजवळ असलेल्या झोडगे गावात  शिक्षक आहेत.पुस्तकातल्या कविता ते विद्यार्थ्यांना शिकवतात.प्रश्नांची उत्तरे पाठ करून घेतात.दिलेला गृहपाठ तपासतात.मुलं उत्तीर्ण होतात.वरच्या वर्गात जातात.पण शिक्षक म्हणून देसले सरांचं मन असमाधानीच राहतं.त्यांना वाटतं,एक महत्वाचा धडा अजून बाकी आहे.जो मुलांना शिकवायला पाहिजे होता.जगण्याची खरी गुरुकिल्ली तर त्यातच आहे-

खूप झाली अरे पुस्तके वाचुनी ;
जीवनाला जरा चाळले पाहिजे.

जीवनाला पुस्तकासारखं चाळलं तरच आपलं आणि इतरांचंही जगणं थोडंफार का होईना आपल्याला कळेल.सहजीवन ह्या शब्दाचा अर्थ आपण अत्यंत मर्यादित करून टाकला आहे.केवळ पत्नीसोबतच नव्हे तर जे जे म्हणून सजीव आपल्यासंगतीनं ह्या पृथ्वीतलावर जगतात त्या सर्वांचं मिळून जे असते  त्याला म्हणायचं सहजीवन.हजारो वर्षांपासून जगात आपण शोध घेत आहोत; पण सर्वसुखी असलेला जीव आपल्याला अद्याप   सापडला नाही.सापडणार नाही.दुःखाच्या चटक्यांनी पोळून निघाल्याशिवाय सुखाची गार फुंकर अनुभवता येत नाही.मनावरच्या वळ्या मिटत नाहीत-

इस्त्री फिरली दु:खाची दिनरात अशी, की -
आयुष्याचा कपडा अवघा सुंदर झाला.

हत्तीच्या मस्तकासारखी काळीशार चिकण मातीची जमीन प्रत्येकाच्याच वाट्याला येत नाही.कुठे मुरमाळ असते.कुठे गोटाळीची असते.पण म्हणून हाडाचा शेतकरी पेरणी थांबवत नाही.जमीनीचा पोत आणि हवामानाचा अंदाज घेऊन आपलं बियाणं आपण निवडायचं.ढोरमेहनत करायची.ज्यानं चोच दिली तो दाणाही देतो.आपल्या हिस्स्याचं उगवल्याबिगर राहत नाही.अट फक्त एकच-मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे-

अंकुराला दगड सुद्धा चालतो ;
जीवनाला फक्त संधी पाहिजे.
_____________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि. ८ ऑगस्ट, २o१५◆
_____________________________________________

No comments:

Post a Comment