Friday, May 1, 2015

गर्दीच श्वापदांची झाली सभोवताली


दहा बारा वर्षांपूर्वी एका पुस्तक प्रकाशनासाठी बुलडाणा जिल्ह्यातल्या धामणगाव बढेला गेलो होतो.परतीच्या प्रवासात  चहापाण्यासाठी वंदना पाटीलच्या पान्हेरा खेडीला थांबलो.दीड-दोनशे घरांचं लहानसं खेडं.कुडा-मातीच्या भिंतीवर गवती छत.अशा झोपडीपुढे आम्ही सर्व  मित्रमंडळी बाजांवर बसलो होतो.सडा-सारवणाने लखलखित केलेल्या ह्या झोपड्यातली बाई शेती-मातीत राबता राबता मराठीत गझल लिहित असेल ह्यावर कुणाचा विश्वासच बसणार नाही,असं सारखं मनात येत होतं.शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत.घरादारात लेखनाचा कुठेही वारसा नाही.वाचनासाठी पुस्तकं नाहीत.ह्या सर्व पार्श्वभूमीवर वंदनाचं खूपच कौतुक वाटलं.आणि तिचा शेर सरळ काळजाला भिडला-

ना कुणाचा हात पाठी ना घराणे गाजलेले;
माझियापासून झाला हा सुरू इतिहास माझा.

शेतीतली काम करता करता अर्धीअधिक जिंदगी कधी आणि कशी संपली हे आठवून पहायलाही सवड नाही.जगण्याचा रेटा असा जबरदस्त की मरायलाही फुरसत नाही.आयुष्याचा पारा हातातून बेमालुम निसटून जातो.ह्याबद्दल तक्रार नाही, तर फिर्याद करण्याचा प्रश्न येतोच कुठे-

सांग मी फिर्याद आता घेउनी जाऊ कुठे?
सांडले आयुष्य हे पार्‍यापरी हातातुनी.

अवतीभवती  सिमेंटचं जंगल वाढत चाललेलं. आधार शोधायला जावं तर दूर दूर माणुसकीचा पत्ता नाही. भोवताली पाहिलं तर पाशवी प्रवृत्तींची गर्दीच गर्दी.ह्यातून पुढे जायचंही आहे.आणि ह्याची नोंदही ठेवायची आहे-

गर्दीच श्वापदांची झाली सभोवताली;
शोधून सापडेना आधार माणसांचा.

जीवन हे अतिशय गतिमान असते.चालताना त्याचा पाय जमिनीला चालत नाही.त्याचं चालणं हे चालणं नसतंच मुळी.ते असतं धावणं.अन् धावण्याचा वेगही असा की घोंगावणारा वाराच नुसता.आपल्याकडून त्याची काय बरोबरी होते?आपल्या पायात हे असे जमान्याभरचे लोढणे.तेव्हा त्याला म्हणावं,जा रे बाबा जा!जरा दुस-या वाटेनं जा-

वेग वार्‍याचा तुझा;तू शोध वाटा वेगळ्या;
मी असा हा पांगळा बघ सारखा ठेचाळतो.

वा-याच्या वाहण्याचा वेग  कधी कधी इतका वाढतो की त्याचं वादळ व्हायला वेळ लागत नाही.लढाई हातघाईवर येते.वादळाची झुंज अंगावर घेण्यासाठी मग आपल्यालाही आपली तयारी ठेवावी लागते.मेणाहून मऊ असलेलं आपलं हृदय  वज्रासी भेदण्या एवढं कठीण बनवावं लागतं.आणि वादळाचं आव्हान स्वीकारताना म्हणावं लागतं-

काळजाला बनवले मी आज वज्रासारखे;
रोजच्या ह्या वादळांना मी कुठे कंटाळतो!

'दुख भरे दिन बिते रे भैया अब सुख आयो रे' असं गाणं गात गात काळानं कूस बदलली.आज वंदनाचा मुलगा इंजिनिअर आहे. मागच्यावर्षी अहमदनगरला त्यांची सहकुटुंब भेट झाली.मुलगा-सून-नातू-वंदना आणि तिचे घरधनी नाना पाटील.  कविसंमेलनाला वंदनासोबत येणा-या नाना पाटलांच्या डोळ्यात कौतुकाची फुलं असतात.उन्हातानात गाळलेल्या घामाच्या सिंचनातून उमललेली-

कालचा पाऊस माझ्या अंगणी आला कुठे?
शिंपली मी बाग माझी माझिया घामातुनी.

-श्रीकृष्ण राऊत
______________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि.२ मे, २o१५◆
---------------------------------------------------------------------



No comments:

Post a Comment