Sunday, May 17, 2015

त्याच्या पत्नीलासुध्दा 'शृंगार' वगैरे असतो का ?



दिसतो आहे उभा भिकारी गजरे विकणा-यासोबत
त्याच्या पत्नीलासुध्दा 'शृंगार' वगैरे असतो का ?

सुशांत खुरसाळे.वय वीस वर्षे.पुण्यात सेकंड इयर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी.जालना ते बीड मार्गावरच्या अंबड गावचा.त्याच्या गझलचा हा शेर.ऐकला तेव्हापासून माझा पिच्छा पुरवतो आहे.हा शेर म्हणजे प्रखर सामाजिक जाणीवेच्या अभिव्यक्तीचा उत्तम नमुना होय.सुशांतचं पोरसवदा मन हे अजब-गजब रसायन आहे.मानवी जीवनव्यवहाराचं पोस्टमार्टम करताना त्याची अभिव्यक्ती तिरकस छेद देणारी आहे. माणसाचं जगणं केवळ आडवं-उभं पाहतो म्हटलं तर त्याचे ढोबळ निष्कर्ष हाती लागण्याची शक्यता असते.मुळात जगणं इतकं बहुपदरी असतं की त्याच्या आडव्या-उभ्या ताण्याबाण्यांचा पीळ कधी ढिल्ला-फुसका पडला हे ज्याचं त्यालाही जाणवू नये.आणि तोच धागा नेमका सुशांतच्या शेरातून उकलत जातो-

खंबीर कुणी ठरवावे, मी भरीव नाही इतका;
फुंकून सूर उमटावे इतका मी पोकळ नाही.

प्रत्येक मोठ्या माणसाच्या मनात एक लहान मूल दडलेलं असतं. जगात ज्याला ज्याला म्हणून हात पुरेल ते,आणि ज्याच्यापर्यंत हात पोचणार नाही तेही,असं  सर्व काही त्याला हवं असतं.आपल्या हातात कितीही सुंदर खेळणं असलं तरी प्रत्येक वेळी दुस-याच्या हातातलं खेळणं त्याला अधिक आकर्षक वाटतं. निदा फाजलींनी त्यांच्या प्रसिद्ध गझलेच्या मतल्यात ही गोष्ट फार सुंदर पद्धतीनं मांडली-

दुनिया जिसे कहते हैं बच्चे का खिलौना है
मिल जाये तो मिटटी है, खो जाये तो सोना है

गाताना 'बच्चे' नादमधुर वाटत नाही म्हणून ह्या मतल्यात 'बच्चे' काढून 'जादू' घातली म्हणतात.आणि अर्थसौंदर्यावर मेकपची पुटं चढवली.सतत काहीतरी मिळवण्याचा मानवी मनाचा हा हव्यास आणि त्यानंतरचा असंतोष सुशांतनं नेमकेपणानं प्रश्नांकित केला-

जे मिळावे असे वाटते नेहमी
ते मिळाल्यावरी वाटते का कमी?

'माझिया जातीचा मज भेटो कोणी' हा आपला शोध शेवटच्या श्वासापर्यंत संपत नाही.जिंदगीची महफिल शेवटची घटका मोजू लागते.भैरवी सुरू होते.आणि एकलेपणाचे स्वर उ.रा.गिरींचा  मतला गात गात संवेदनेला जहरी दंश करतात-

या एकलेपणाचा छेडीत मी पियानो
ओठास भैरवीच्या दंशून जा स्वरांनो!

असाच  एक जानलेवा सवाल सुशांतचा शेर  तिरप्या रीतीने विचारतो.आणि उत्तरासाठी आपण आपल्याच हृदयाला चहुबाजुंनी चाचपडून पाहू लागतो-

रोज नव्याने गर्दीसोबत उत्सव कर अन् झिजून जा
एकांताला कधी,कुठे सणवार वगैरे असतो का ?

आणि आपण कायम निरुत्तर होऊन जातो.
____________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि.९ मे, २o१५◆
------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment