Friday, April 24, 2015

आयुष्याची तिसरी मिती...


थेट  लोटांगण  अताशा  घेत  नाही  मी,
खरवडूनी  पाहतो  शेंदूर  थोडासा.

मागच्या वर्षी पुण्याच्या मुशाय-यात ज्ञानेश पाटीलचा हा शेर मी ऐकला.मराठी गझलची नवी पिढी मानवी जीवनाला किती विविध त-हेने व्यक्त करू बघते याचा प्रत्यय आला.साहित्यापासून राजकारणापर्यंत आणि समाजकारणापासून अध्यात्मापर्यंत अनेक दगडांना शेंदूर फासून भक्तांनी देवत्व बहाल केलेलं असतं.अशा देवांपुढे नवी पिढी सपशेल लोटांगण घालणार नाही.बुद्धीच्या निकषांवर देवत्व तपासून पाहील.नव्या पिढीचं नवेपणच त्यात असतं.
2012 च्या गझल उन्मेष पुरस्काराने गौरविलेला ज्ञानेश पाटील खानदेशातल्या धरणगावचा.सध्या जळगावला राहतो. पेशाने डाॅक्टर आहे.अनेक विकृतींनी बिघडलेली माणसांची प्रकृती तो तपासतो.रोगाचं निदान करतो.औषधोपचार करतो.गझलकार-कवी म्हणून  अवती भवतीच्या समाजाचा एक्स रे काढतो.आणि आपला रिपोर्ट शेरातून पेश करतो-

स्वच्छ हसणे कधीचे विसरलाय तो
लेक नाही सुखी सासरी वाटते

कालपर्यंत खळखळून हासणा-या माणसाला असं काय झालं की तो हसणेच विसरलाय.स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात तसं मुलीचा बाप झाल्याशिवाय पोटच्या लेकीसाठी त्याचं कळवळणारं मन कळणार नाही.पोरीच्या बापाचं मन एकच दुवा मांगते-'उस द्वार से भी दुख दूर रहे...जिस द्वार से तेरा द्वार मिले'!
काव्यात्म जीवनमूल्यांचा आदर्श एकीकडे आणि प्रत्यक्षातलं ज्वलंत वास्तव दुसरीकडे.ह्या दोघात पडलेलं अंतर म्हणजे पाठीच्या कण्यातील दोन मणक्यात पडलेला कायम ठणकणारा गॅप असतो.माणसाच्या  हृदयाकडून त्याच्या जिभेकडे जाणारी रक्तवाहिनी प्रलोभनांनी दूषित केली की त्याच्या बोलण्याचा त्याच्या वागण्याशी संबंध रहात नाही.आणि मग 'कसमे,वादे प्यार,वफा सब बाते है बातो का क्या?' अशा पोकळ गोष्टी सुरू राहतात.शब्दांचे अर्थ म्हणजे माणसांचं स्वप्नातलं असंबद्ध बरळणं होऊन बसतं.ह्या क्राॅनिक डिसिजच्या नाडीवर ज्ञानेश पाटीलने नेमकं बोटं ठेवलं आहे-

दिलासा, सांत्वने, अश्रू, जिव्हाळा, प्रेम  नी  माया...
किती  हे  शब्द  लेकाचे,  मला  फसवून  गेलेले!

'लफ्ज माने भी छुपाने लगे ये तो हद है' असं  एका मिस-यात दुष्यंतकुमार सांगतात.कमी अधिक फरकानं प्रत्येक गझलकार-कवीचा तो अनुभव असतो.
पूर्वग्रहांचे काही आडाखे बांधून सभोवतालचं माणसांचं जगणं-वागणं त्या वर्तुळात आपण आजमावत राहतो.ह्या कॅलिडिओस्कोपला फिरवता फिरवता एखाद्यावेळी फटकन आपल्या आयुष्याची तिसरी बाजू समोर येते.ह्या थर्ड डायमेन्शनचा वज्राघात एवढा प्रचंड असतो की आपल्या पूर्वग्रहाच्या भिंती धडाधड कोसळतात-

दिसू लागली आहे आयुष्याची तिसरी मिती
पुर्वग्रहांची भिंत उभी कोसळत राहते जणू.
_______________________________________________
 ◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि.२५ एप्रिल, २o१५◆
-----------------------------------------------------------------------



No comments:

Post a Comment