Friday, January 8, 2016

आखरी सांसो तलक लडती रही





कन्यारत्न जन्माला येतं.पहायला आलेले नातेवाईक  एकमेकांना विचारतात?कुणासारखी दिसते? आत्या म्हणते,बापाच्या वाणावर गेली.मावशी म्हणते,अगदी हुबेहूब आईसारखी!मुलगी उपवर झाली की माय-लेकी बहिणी-बहिणी दिसतात.लग्न होईपर्यंत मुलगी तिच्या पित्याच्या नावानं ओळखली जाते.सौभाग्यवती झाल्यावर तिच्या नावामागे पतीचं आडनाव लागतं.आई झाल्यावर तिचा परिचय तिच्या मुलाची-मुलीची आई म्हणून होतो."ती बघ ती अथर्वची आई चालली!" "हिरव्या साडीत आहेना ती आपल्या स्वराची मम्मी."हे शब्द कानावर पडल्यावर स्त्रीजन्माला जे संपूर्ण समाधान लाभते.त्याची सर दुस-या कशालाच नाही.मातृत्वाच्या ह्या नितांत सुंदर भावनेचे संस्कार करणारा इरावती कर्व्यांचा एक धडा आमच्या अभ्यासक्रमात होता-'परिपूर्ती'.मोनिका सिंग यांचा शेर वाचला आणि त्याची तीव्रतेने आठवण झाली -

यही काफ़ी नही कि देख तुझको याद आऊँ मैं
तमन्ना है मुझे कोई पुकारे नाम से तेरे.

सोसण्याचा सूर लागला की वेदनेचा वेद होतो म्हणतात.माणूस जसजसा वयानं-पदानं-मानानं मोठा होत जातो तसतशा त्याच्या यातना अधिक कठीण होत जातात.दु:ख-व्यथा-वेदनांचं प्रगटीकरण त्याला शोभणारं नसतं.आतून येणारे अनावर कढ त्याला रोखून धरावे लागतात.पण त्यांना दाबून ठेवायचं तरी किती?समुद्र झाला म्हणून काय झालं,अंगाखांद्यावर तुफान वागवणं काही तोंडाचा खेळ नाही.किना-यावर  येऊन लाटा आदळतातच.एखादी त्सुनामी अशी कळ घेऊन येते की ती
 किना-यालाही जुमानत नाही.आणि.....मान वळवून...चष्म्याआड काहोइना पण एखादा उष्ण थेंब ओघळतो...तो थेट मोनिका सिंग यांच्या शेरातल्या शब्दांत...आणि वाचणा-याला जाळत सुटतो-

कब तलक ठहरूँ कि कर आज़ाद अब
रूठा हुआ सा एक आँसू कह रहा 

कायद्याचा बडगा असपृश्यतेचे अस्तित्व स्थूलरूपाने नष्ट करतो.अत्याधुनिक तंत्रज्ञानावर हुकुमत गाजवणारी माणसं शिकून सवरून कितीही शहाणी झाली तरी  उच्च-नीचतेच्या उतरंडी माणसांच्या मनातून काही केल्या जात नाहीत.पाखंडी माणसांच्या समाजात सूक्ष्मरूपाने  वावरणा-या अस्पृश्यतेपुढे कायदा हतबल होताना पाहिला की ह्या कवयित्रीचं संवेदनशील मन कळवळतं-

सिर्फ कागज पे रहा कानून ये है बेबसी 
गाँव के बाहर अछूते से मकाँ,इन्सान सब

बीड जिल्ह्यातील माजलगावच्या मूळ रहिवासी असलेल्या मोनिका सिंग यांनी कायद्याच्या पदवीसह कला शाखेची पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.मराठी-हिन्दी-उर्दू अशा हिन्दुस्थानी भाषांसोबतच  इंग्रजी आणि जर्मन ह्या परदेशी भाषाही त्या उत्तम जाणतात. सध्या कोल्हापुरला उप जिल्हाधिकारी  म्हणून त्या प्रशासकीय सेवेत आहेत.नुकताच त्यांचा 'लम्स' हा गझलसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यांची शायरी २०१४ च्या परविन शाक़िर पुरस्काराने सन्मानित झाली.

दररोज आपल्या अवतीभवती इतकं सगळं नकारात्मक घडताना  पाहिलं की क्षणोक्षणी नाउमेद व्हायला होतं.पण खडकावर उगवणा-या पिंपळाची जिद्द पाहिली की माणसाच्या आशेला प्राणवायु मिळतो.'वो सुबह जरूर आयेगी सुबहा का इंतजार कर' म्हणत आपण काळ्याकुट्ट अमावस्येच्या रात्रीची कळ सोसतो.एकमेकांचा हात पुन्हा प्रेमानं हातात घेतो.परस्परांना धीर देतो.परत एकदा संघर्षाचा सामना करायला तयार होतो.कारण 'उम्मीद पे दुनिया कायम है' अशी ग्वाही देणारा मोनिका सिंग यांचा शेर आपल्या सोबत असतो-

आखरी सांसो तलक लडती रही
उम्मीद से हूँ जिन्दगी कहती रही

_____________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि. ९ जानेवारी,२o१६◆
_____________________________________________

No comments:

Post a Comment