काल एक जबरदस्त टॅग लाईन वाचली-'सबसे बडा रोग...क्या कहेंगे लोग'... लोक काय म्हणतील? हा माणसाच्या मनाला लागलेला कॅन्सरपेक्षाही भयानक रोग आहे.हा रोग आधी संपूर्ण मनाचा ताबा घेतो...मग सबंध देहाचा मालक होतो आणि शेवटी आपल्या अख्ख्या व्यक्तिमत्वाला गुलाम करतो.तुम्ही अपयशी झाले की जे लोक तुमची निंदा करतात तेच लोक तुम्ही पराक्रमाचे झेंडे लावले की तुमची आरती ओवाळायला सगळ्यात पुढे असतात.'हो' च्या पुढे आणि 'नाही' च्या मागे जी राहते त्या मुत्सद्दी टोळीचे नाव समाज. हे 'समाजशास्त्र' शिकण्यात आपण जितक्या लवकर पारंगत होऊ तेवढं चांगलं.'कुछ तो लोग कहेंगे'...म्हणून 'लोक' ह्या अदृश्य भुताच्या कचाट्यातून जितक्या लवकर आपली सुटका होईल तेवढा इहलोकाचा आपला मुक्काम सुखी होईल.आणि परलोक हा शेवटी पर म्हणजे परकाच असतो आपल्यासाठी.अशा घोस्ट इमेजने प्रभावित न होता ह्या भुताला जे आपल्या इशा-यावर नाचवतात तेच कालजयी होतात. इंद्रजीत उगलेचा शेर तरी दुसरं काय सांगतो भाऊ -
मी काय केले, काय नाही.. हे स्वत: मी जाणतो
मी काय होतो, काय झालो.. हे मला सांगू नका.
आपण स्वतःला जेवढं जवळून आणि आत- बाहेरून ओळखतो.तेवढं कुणीच ओळखू शकत नाही.ना आपले माय - बाप, ना आपली बायको- मुलं.दोस्त - मित्र तर बोलून चालून तसेही 'खाया -पियाचे यार अन् निऊन टाक्याले दोन -चार 'असेच असतात.आपल्या स्वभावाची टोकं आपण कितीही बोथट करण्याचा प्रयत्न केला तरी ती आपल्या प्रेमीजनांना टोचल्याशिवाय राहत नाहीत.स्व-भाव हा आपला स्थायी भाव असल्यानं आपण स्वतःला बदलू शकत नाही आणि सभोवतालचं जग तर वारा पाहून पाठ फिरवणारं असतं.उभ्या जगाला कुणाशीच काही देणं-घेणं नसतं.आणि आपल्यातला 'मी' म्हणतो-अशा जगाला बांधा आडवं...गेलं लेकाचं उडत!..मार दे ठोकर...असाच काहीसा भावार्थ घेऊन येणारा इंद्रजीतचा हा शेर-
जवळ माझ्या कुणी टिकत नाही
मी कुणालाच परवडत नाही.
एक गोष्ट साली आपल्या मनासारखी व्हायला तयार नाही.साहित्य-चित्रकला--अभिनय-नृत्य-काॅम्प्युटर- आपल्याला ज्यात इंटरेस्ट असतो ते शिकता येत नाही.जबरदस्ती जे अभ्यासावं लागतं ते जाम बोअर होतं.आपल्याला जी आवडते तिला बॅन्क बॅलन्स आवडते.जिला आपण आवडतो तिची उपजात आपल्याला चालत नाही.करावं तर काय करावं माणसानं?राग धरावा तर कुणाकुणाचा आणि कशाकशाचा? 'तेरे जहान में ऐसा नहीं कि प्यार न हो...जहाँ उम्मीद हो इस की वहाँ नहीं मिलता....' दुनियादारी निभवायची तर आपला हेका आपल्याला सोडावाच लागतो.मनाला न पटणारी समझदारी बाहेरच्या जगाला दाखवावी लागते.दुसरं करता काय?-
राग आला तर गिळावा लागतो
'मी'पणा चावून खावा लागतो.
इंद्रजीत उगले बीडचा.बी.एस्सी.थर्ड इअरला शिकणारा.दोन-तीन वर्षांपूर्वी मुक्तछंदात कविता लिहायला त्यानं सुरुवात केली. त्याच्या काव्यलेखनानं एक छानसं वळण घेतलं...गझलचं.
आता कुठे जरा जरा तांबडं फुटू लागलं...प्रवास सुरू झाला... काव्यदिंडी गझलपूरला निघाली....न थकता अजून खूप चालायचं आहे.बरंच काही समजून घ्यायचं आहे.वाटेतले मानव-दानव अनुभवत आपण आपल्याच नादात चालत राहायचं...दर कोस... दर मुक्काम...देवाची आळंदी...चोरांची आळंदी....विठुरायाचं पंढरपूर...एकदाचं कळसाचं दर्शन झालं की झालं...आणखी काय हवं?-
विठूचा नाद देही अन मनाची माळ असतांना
मला काही नको हे एवढे आभाळ असतांना
_____________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि. १६ जानेवारी,२o१६◆
_____________________________________________
No comments:
Post a Comment