आपल्याला सदासर्वदा वाटत राहते की आपल्यासारखे आपणच.आपण अगदी अद्वितीय आहोत.पुरी दुनिया धुंडून काढली तरी आपल्यासारखं दुसरं सॅम्पल सापडणार नाही.आपण एकमेव आहोत.अपने जैसा कोई नही.अपुन बोले तो एकदम युनिक.अपनी स्टाइलही कुछ हटके है.आपण जे काम करतो....वो किसी और के बस की बात नही.हमसे है जमाना हम जमाने से नही...'आम्हाला वगळा-गतप्रभ झणी होतील तारांगणे'
वगैरे वगैरे...आपण नसलो तर आपल्या मित्रांना साधी ट्रीप अरेंज करता येत नाही. आपल्या घरात आपल्याशिवाय कुणाचंही पान हालत नाही.चार दिवस घराबाहेर असलो की लेकाचे फोन करून करून हैराण करतात...याचं कसं करू?त्याचं कसं करू?अमकं कुठे ठेवलं?तमकं दिसत नाही.मी म्हणतो, कुणीही कुणावर एवढं अवलंबून रहावंच कशाला?....मग एक दिवस असा येतो.... कशासाठी?पोटासाठी!खंडाळ्याच्या घाटासाठी! म्हणत आपले मित्र वाट फुटेल तिकडे,दानापाणी सापडेल त्या दिशेनं पांगतात.
नंतर काही काळ मित्राचा वाढदिवस-मित्राच्या बायकोचा जनमदिन-नववर्ष-मॅरेज अॅनव्हरसरी-मुलामुलींचे हॅपी बर्थडे अशाप्रसंगी शुभेच्छा देणं-घेणं होतं.त्यात हळुहळू खंड पडतो.आणि कालांतराने मुलामुलींची नावंही आठवत नाहीत.पुढे पुढे सगळ्यांचं सगळं व्यवस्थित होतं.समजा उद्या आपण ह्या जगात नसलो तरी आपल्यावाचून कुणाचं काहीही अडणार नाही.अगदी आपल्याच बायको-पोरांचंसुद्धा!ही भावना कलेजा खाऊन टाकते.मागे उरतो तो भालचंद्र भुतकरांचा शेर मनात रेंगाळताना-
हा विचारच जीवघेणा बोचतो आहे
का कुणाचे अडत नाही आपल्यावाचुन?
कल क्या होगा पता नही और किराना महिनेभरका...अशी आपली उधारी...कशा कशाचा विमा काढता? कशाचीच काही गॅरंटी देता येत नाही...तरी आपण आजन्म सोबत राहू म्हणून वचनं देतो.सौ बार जनम लेंगे...सौ बार फना होंगे...लेकिन हम-तुम ना जुदा होंगे...वगैरे घटकाभर मन रमवणा-या सिनेमात ठीक वाटतं...गंगा मैया मे जब तक के पानी रहे मेरे सजना तेरी जिंदगानी रहे...तेव्हा असेलही गंगेत मुबलक पाणी,पण आज ना गंगा शुद्ध राहिली ना जिंदगानी! मात्र सात जन्माचा पिच्छा पुरवणारे आपले रोमॅन्टिक कसमे-वादे तस्सेच नौजवान राहिले.अफुची नशा चढवत राहिले. नात्यांच्या खरे-खोटेपणाचा धडा भालचंद्राला देत राहिले-
जन्मभर देईन सोबत हे कुणा सांगू नये
एवढा खोटेपणा नात्यामधे आणू नये.
माल लगाव...माल लेवचा जमाना आहे दादा!साधी पानपट्टी टाकायची तर चमचम चमचम झक्कास लायटिंग लावा.भलेही पुडीत-पानात-ख-र्यात-घोट्यात सडेल सुपारी का द्याना.खाणारे चवीनं चघळतात.चुना मारके जिभेला चटका लागला पाहिजे,बास! असाच मेकअप आपल्या रोजच्या जगण्या-वागण्याला, बोलण्या-चालण्याला करावा लागतो.आपणच आपल्या करिअरचे सेल्समन बनतो.आणि स्वतःला बिनदिक्कत विकत बसतो.ह्या आपल्या दुभंगलेल्या व्यक्तिमत्वातील इंटेरियर डेकोरेशनला भुतकरांनी 'जोरका धक्का धीरे से' दिला-
सर्व झाले जरी खिळखिळे आतुनी
छान आहे किती मांडणी आपली.
सातारा जिल्ह्यातल्या कोरेगावचे असलेले भालचंद्र भुतकर पुण्याला साॅफ्टवेअर इंजिनियर आहेत.ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान-तत्वज्ञान ह्या चौपदरी हायवेने प्रवास करणारी माणसं पुढच्या अनेक मुक्कामांवर नास्तिक होताना दिसतात.आदिभौतिकाच्या केन्द्रबिंदुवर असलेल्या 'ती'लाच सवाल करतात-'तुझ मे रब दिखता है...यारा मै क्या करूँ?आणि मग अशा द्वैतातून सुचलेल्या शेराचे नाजुक कदम एकीकडे अलवारपणे जमिनीवर पडत असतात तर दुसरीकडे त्याचा साजरा मुखडा आकाशातल्या स्वर्गाचे चुंबन घेत असतो-
तुझे गीत वारा जिथे गात नाही
असे गाव माझ्या नकाशात नाही.
__________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि. २ जानेवारी,२o१६◆
_____________________________________________
No comments:
Post a Comment