Friday, December 25, 2015

साल नवे,पण...




नवीन कॅलेंडर विकत घेतलं की नाही?आमच्याकडे तर चांगल्या मोठ्या आकारातलं कॅलेंडर आणतात बुवा.ऑफिसात असतातना तेवढ्या आकाराचं.हाॅल मधल्या भिंतीवर लावलं की बिना चष्म्याचं वाचून घ्या.लाल रंगाच्या अंकानी दाखवलेल्या सुट्या चटकन डोळ्यात भरतात.सेकंड-फोर्थ सॅटरडेला जोडून येणा-या तर अती लाडाच्या.मध्ये एक -दोन सी.एल टाकल्या तर पूर्ण आठवडा मिळेल.त्या सुटीत फॅमिलीला घेऊन कुठंतरी बाहेर जाऊ.दिवस उगवला की घाण्याच्या बैलासारखं सालं रोज तेच वर्तुळ.तोच बाॅस.तीच अॅक्टिंग.तेच वरवरचे हाय-हॅलो.तेच कृत्रिम नमस्कार.तेच खोटं खोटं विश करणं.जाम कंटाळा येतो यार ह्या डुप्लिकेट जगण्याचा.उसणं अवसान आणून आपण मारे स्वतःला समजावण्यासाठी म्हणतो- 'याले भिऊ त्याले भिऊ तं सरकारचा वायदा कायनं दिऊ?' पण करता काय?ह्यातून सुटका नाही.यही तो दुनियादारी है दोस्त!ह्या आपल्या तोतया आयुष्याच्या दुख-या नसेवर संतोष कुळकर्णींनी नेमकं बोट ठेवलं-

आवडो वा नावडो माझ्या मनाला
मी मने सांभाळतो माझ्या परीने.

हिन्दी सिनेमाला आपण एवढी नावं ठेवतो.पण त्यातली गाणी काय कहर असतात यार.रोज सकाळी उगवत्या मुडला मॅच होणारी एखादी छानसी लकेर सुचली की ती दिवसभर च्युइंगम सारखं चघळायला-गुणगुणायला पुरते. रोजमर्राच्या आपाधापीच्या कोर्टात ती आपल्या तर्फे वकिली करत राहते.न मिळणारा न्याय मागत राहते.त्यातलीच ही दोन गाणी.पहिलं-'मैने हँसने का वादा किया था कभी इस लिए अब सदा मुस्कुराता हूँ मै...गीत गाता हूँ मै....गुनगुनाता हूँ मै...आणि दुसरं- 'तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो? ....क्या गम है जिसको छुपा रहे हो ?'आता बोला!काय बोलणार?आपली बोलती बंद.सतत कोट्या करणारी,ज्योक्स सांगणारी,लतिफे परफाॅर्म करणारी विनोदी माणसं आतल्या दुःखाचा जराभर विसर पडावा म्हणून 'अगर जीना है जमाने मे तो हँसी का कोई बहाना ढूंढो 'अशी निमित्ते शोधत असतात.बळे बळे सातमजली वगैरे हसत राहतात.यालाच ते मनासारखं जगणं-बिगणं म्हणतात- 

जगण्यासाठी मनासारखे 
हासत राहू बळे आणखी.

माणुस हा समाजशील प्राणी आहे.तो आपापले कळप बनवतो.त्या कळपात स्वतःला सुरक्षित फील करतो.आपल्या अस्तित्वावरची आक्रमणं परतून लावण्यासाठी त्याला कळपात सैन्य मिळतं.आजकालच्या चलनी भाषेत तुम्ही कळपाला ग्रुप वगैरे म्हणू शकता.फेसबुक-व्हाॅटस् अॅप-ट्विटर सारखा सोशल मिडिया एवढा पाप्युलर होण्याचं कारणही तेच आहे.अंमली पदार्थाच्या सेवनानंतर मेंदुवरचं नियंत्रण सुटतं.आपल्याला हे शोभणार नाही म्हणून अंतर्मनात दाबून ठेवलेल्या अनेक गोष्टी मग जिभेवर येतात...आनंद-दुःख,राग-लोभ,प्रेम-द्वेष,इर्षा-असुया,हेवे-दावे,वाद-संवाद,वासना-साधना,सक्ती-आसक्ती,उचापती-कुरापती...अशा  अडगळीत पडलेल्या छप्पन चीजा... मैदानात येतात.बिचा-याचं मन मोकळं होऊन जातं.'फुल्ल टाइट' आहे त्याचं काय मनावर घेता,जाऊ द्या! म्हणून आपणही रिलॅक्स होतो.अॅडिक्ट झालं की सोशल साइट्सवरही बरंचसं अस्संच होतं.निरामय समाजरचनेसाठी समुहमनाचा असा निचरा होणं आवश्यक असतं.ऑफिसमध्ये काॅम्प्युटरवर काम करता करता वेलफेअर रिफ्रेशमेंट म्हणून अशी एखादी सोशल खिडकी उघडण्याची सवलत देण्याविषयी मॅनेजमेंट गुरू गंभीरपणे विचार करताहेत.कारण-

दारे,खिडक्या उघडा आता, झाकळते मन
एकांताच्या अंधाराला घाबरते जग.

मूळ अंबाजोगाईचे असलेले संतोष कुळकर्णी उदगीरला व्हेटर्नरी अॅन्ड अॅनिमल सायंसेसच्या काॅलेजला प्राध्यापक आहेत. मनुष्यप्राण्याच्या मनाचे विज्ञानही ते उत्तम जाणतात.'मौनात एकट्याशी'  हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे.मराठी गझलांचे सृजन करताना,अगदी हलक्या हाताने मानवी मनाच्या शल्याची चिकित्सा करणारे ते सर्जनही आहेत.त्यांना ठाऊक आहे की दरवर्षी कॅलेंडर नवं आणलं तरी माणसाची दुखणी जुनीच राहतात.क्राॅनिक.म्हणूनच शुभेच्छांच्या पसायदानाचं बळ माणसाला हवं असतं.जे मनाला प्राणवायु पुरवतं.माया आटत गेली तरी दुष्काळावर मात करण्याची शक्ती देतं.आणि बारूदच्या ढिगा-यावर उभ्या असलेल्या दुनियेला हात जोडून विनवतं-आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा!-

साल नवे, पण जुनी काळजी
आटत जाई तळे आणखी.
____________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि. २६ डिसेंबर,२o१५◆
_____________________________________________

No comments:

Post a Comment