Friday, December 18, 2015

आजही येतो दुधाचा वास पदराला


         

सगळ्या शिक्षणतज्ज्ञांना एकच प्रश्न सतावतो आहे.आपली मुलं मातृभाषेतून कशी शिकतील?मातृभाषेतून शिकताना मुलांना जेवढं चांगलं आकलन होतं तितकं ते जगातल्या कोणत्याच भाषेतून शिकताना होत नाही.दुसरीकडे इंग्रजीतून शिकण्यावाचून सध्या तरी पर्याय नाही असा पालकांचा आग्रह.इंग्रजी येत नसल्यानं  आपल्याला डाॅक्टर,इंजिनियर होता आलं नाही.खो-यानं पैसा कमावता आला नाही.आपल्या सोबतचे पहा कुठच्या कुठं गेले.त्यांनी करोडोंचे  आलिशान फ्लॅटस् काय घेतले अन् लाखोंच्या महागड्या कारा काय घेतल्या.आपल्याच्यानं मोटरसायकल बदलणं झालं नाही.आपलं जे झालं ते झालं पण आपल्या मुलांचं असं होऊ द्यायचं नाही.म्हणून मध्यमवर्गीय मायबाप इर्षेनं अधिकच पेटले. 
जेवढ्या पैशात बापाचं ग्रॅज्युएशन झालं त्याच्या चौपट डोनेशन भरून मुला-मुलींना नर्सरीत घालू लागले.आपली अपूर्ण स्वप्नं पूर्ण करण्याची जबाबदारी कोवळ्या जीवावर लादू लागले.ह्या उमलत्या कळ्यांच्या करपणा-या मनातला आवाज कुणी ऐकला नाही.ऐकू येत असूनही त्याकडे पद्धतशीर दुर्लक्ष करत राहिलो.पेशाने प्राथमिक शिक्षक असलेल्या नीलेश कवडेच्या शेरात त्याचा प्रतिध्वनी उमटला-

वाहतो ओझे अपेक्षांचे किती मी
एकदा वजनात घ्या मोजून दप्तर.

जनगणना आली धरा गुरुजींना.इलेक्शन आले पकडा गुरुजींना.गावाची माहिती पाहिजे?सांगा गुरुजींना.पुस्तके-गणवेश वाटप,शिष्यवृती,वर्गखोल्याचे बांधकाम,अमकी योजना तमकी योजना...एक ना दोन अशी सतरा कामं ज्यांच्याकडून करून घ्यायची त्याचे नाव मास्तर.ह्या सगळ्या कामातून थोडाफार वेळ काढून  शिकवण्याचं पवित्र कार्य सेवा म्हणून जे अल्पशा मानधनावर पार पाडतात त्यांना शिक्षकसेवक म्हणतात.आणि हो... एक महत्वाचं काम तर सांगायचंच राहिलं असं म्हणत आपलं 'अनुभवामृत' नीलेशनं त्याच्या शेरात आपल्यापुढे वाढलं-

राहिले आता कुठे, शिकवायला गुरुजी
रोज खिचडी लागले शिजवायला गुरुजी.

आपला लोकसंख्यावाढीचा दर काय?येणा-या पाच-दहा वर्षात दहावी-बारावीला गेलेल्या मुलांची संख्या किती असेल?निवृत्त होणा-या शिक्षकांची-कर्मचा-यांची संख्या किती असेल?आपल्या उद्योगवाढीचा दर किती?त्यानुसार किती इंजिनियर्स लागतील?तेवढ्या प्रमाणात पाच टक्के कमीअधिक असे पधवीधारक निर्माण झाले तर जाॅबमार्केटमध्ये मागणी-पुरवठ्याचं संतुलन होऊन कोणत्याही पदवीची किंमत नियंत्रित ठेवता येईल.पण गेल्या दहा वर्षात ह्या क्षेत्रात विपरित घडलं.मागणीच्या तुलनेत पदव्यांचा पुरवठा भरमसाठ वाढला.पदव्यांची पत गेली.इंजिनियर्स बँकांच्या-यु पी एस सीच्या परीक्षा देऊ लागले.विज्ञानाचे पदवीधारकही ह्या स्पर्धेत उतरले.काॅमर्स पदवीधारकांचा आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष सुरू झाला.स्पर्धापरीक्षा-एम पी एस सीचा फिव्हर चढू लागला.ती साथ कला शाखेच्या पदव्यांना पछाडू लागली.ह्या वासत्वाच्या नाडीचे स्पंदन नीलेशच्या शब्दात थरथरले-
  
देत नाही भाकरी ताटात पदवी
काय कामाची अशी हातात पदवी.

अकोला हे नीलेश कवडेंचं गाव.अकोट तालुक्यातील राणापूरला ते हल्ली जि.प.शिक्षक म्हणून सेवारत आहेत.नोकरी सोबत मुक्त विद्यापीठातून त्यांनी एम.काॅम.केलं.कोवळ्या वयातील नवी पिढी घडविताना त्यांना आलेले अनुभव त्यांच्या गझलात उमटतात.गंधसंवेदनेचा उत्कट प्रत्यय देणारा त्यांचा हा शेर आपल्या स्मरणात कायम दरवळत राहतो- 

घाम तू पुसतेस हा जेव्हा कधी आई
आजही येतो दुधाचा वास पदराला.
_______________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि. १९ डिसेंबर,२o१५◆
________________________________________________

No comments:

Post a Comment