Friday, October 9, 2015

कागदाचे 'कार्ड' हे 'आधार' झाले माणसाचे.



माय सणासुदीला तळण काढायची.तळणाच्या वासानं जिथं मोठ्या माणसाची आस्वादाची इच्छा तीव्र होते तिथं बालकाची इच्छा तीव्रतम होणे अगदी स्वाभाविक.बालपणी मायला मी गरम गरम भजे-वडे मागायचो.माय म्हणायची,आंधी देवाले निवद दाखू दे.तेदलोक उष्ट क-याले चालत नाही.आजी मध्यस्थी करायची.मायला सांगायची,लहान लेकराहून देव मोठा आहे का?लागलं तं तुया देवाचा निवद अलग काढून ठुय पन पोराले दे.आजी गेली.मग माय आजी झाली.आजी झालेली माय माझ्या बायकोला हाच धडा द्यायची.माय गेली.आता आजी झालेली माझी बायको सुनबाईला हाच धडा देते.लहान मुलासारखं निरागस,निर्व्याज,सरळ,ऋजु व्हायला सांगणारा येशु ख्रिस्त आणि 'लहान लेकराहून देव मोठा आहे का?'हा धडा देणारी निरक्षर  आजी मला तेवढीच श्रेष्ठ वाटते.अरविंद पोहरकरांचा शेर वाचला अन् मला ही देवाची व्याख्या आठवली-

दर्शनाला मंदिराची पायरी मी चढत नाही
मी सकाळी लेकराचा चेहरा पाहून घेताे!

लेकराला देवाच्या प्रतिमेत रूपांतरीत करणारे अनेक शेर मोठमोठ्या शायरांनी लिहिले आहेत.पण 'मंदिराची पायरी' न चढणारा अरविंदाचा अंदाज काही औरच आहे.

आणखी अशीच एक शिकवण अरविंदाच्या शेरात आलीय.बहुतांश सरकारी कामकाज हे सर्टिफिकेट आणि आयडी प्रुफवर चालते.मग हे पुरावे खरे-खोटे कसेही बनवले असतील तरी चालतील.मागणी तसा पुरवठा हा धंद्याचा नियम असल्याने ख-यासारखे हुबेहुब खोटे दस्ताऐवज बनविणा-यांची बनवाबनवी तेजीत असते.कधी कधी सुंदर पाॅलिश करून खोटे इतके चमकदार पेश केलेले असते की खरे त्यापुढे फिक्के पडते.माणसाच्या जिवंत अस्तित्वाला सिद्ध करणा-या मृत कागदांच्या चोरबाजारातली ही तकलीफ अरविंदाने आधारकार्डाच्या आधुनिक प्रतिमेने मस्त उजागर केली आहे-

माणसाला माणसाची सापडेना खूण आता
कागदाचे 'कार्ड' हे 'आधार' झाले माणसाचे.

चार भिंतीच्या आत तुम्ही कसे आहात,ह्याला जगाच्या दृष्टीनं कवडीचं महत्व नाही.चारभिंतीच्या बाहेर जगासमोर जाताना तुम्ही स्वतःला कसे प्रक्षेपित करता,त्यातून स्वतःची इमेज कशी निर्माण करता यावरून जग तुमची किंमत करते.त्यामुळे जगाला पाहिजे तशी एक साॅलिड इमेज प्रोजेक्ट करण्याची चढाओढ लागलेली असते.फ्रिज मध्ये ठेवलेले सकाळचे वरण संध्याकाळी फोडणी देऊन खाणारे दुस-या दिवशी चारचौघात त्या तडक्याची एवढी तारीफ करतात की वाटावे जगातला सर्वात सुखी माणूस हाच!
ह्या वास्तवाची  सूचक पद्धतीने मांडणी करणारा अरविंदाचा हा शेर-

उगा जातोय हात बाहेर मी  धुवाया;
उपाशी झोपतो जगाला नको कळाया.

अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी तालुक्यातले नेर पिंगळाई हे अरविंद पोहरकरांचे मूळ गाव.सध्या देऊळगाव राजा येथे आय.टी.आय मध्ये निदेशक ह्या पदावर कार्यरत असलेल्या पोहरकरांचा पोटापाण्याचा विषय इलेक्ट्राॅनिक्स असला तरी त्यांच्या हृदयाला मराठीची आवड आहे.1995 मध्ये प्रसिद्ध झालेला 'इंडिया टुडे' हा  प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार लाभलेला त्यांचा कवितासंग्रह.अनेक वर्तमानपत्रातून स्तंभलेखन करणारा हा कवी जीवनवादी आहे. 'हर फिक्र को धुए मे उडाता चला गया' हे सांगणारा त्यांचा हा शेर-

गळया भोवती नेहमी फास आहे
तरी जिंदगीची मजा खास आहे.
_______________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि. १० ऑक्टोबर,२o१५◆
________________________________________________

No comments:

Post a Comment