कवितेचा जन्म होतो तरी कसा ?कशी स्फुरत असेल कविता? ओळीमागून ओळी कशा उतरत असतील?अभिव्यक्तीची ही निकड अगदी प्राणवायुइतकी अपरिहार्य असते का?हे सर्व प्रश्न वाचकासारखेच कवीलाही पडतात. आपआपल्यापरीने प्रत्येक कवी त्याची उत्तरेही शोधत राहतो.निर्मितीची प्रक्रिया मानसिक स्तरावर अत्यंत गुंतागुंतीची असते हे मान्य.परंतु मानवी जीवनातल्या भाव-भावनांच्या न सुटणा-या गाठी उकलण्याचा सतत प्रयत्न करणे हेच तर कवीचे तकदीर.
माणसांच्या जगण्या-वागण्यातल्या संगती-विसंगतीचा शोध तो घेत राहतो.वाचकांचाही मनात असंच काहीसं चाललेलं असतं.त्याला कवीसारखं ते सांगता येत नाही एवढंच.ही घालमेल प्रशांत पोरे यांनाही स्वसंमोहित करते आणि त्यांना शेर सुचवून जाते-
जेव्हा आतुन धुमसत असते
नक्की कविता उमलत असते.
कवी त्याच्या स्वतःच्या आणि इतरांच्याही जगण्या-भोगण्याचा साक्षीदार असतो.कधी स्वतःला केन्द्रस्थानी ठेवून तो जग न्याहाळतो.तर कधी दुनियेच्या दृष्टीने स्वतःकडे बघतो.कधी आरोपी म्हणून स्वतःची सफाई पेश करतो.तर कधी न्यायाधीश होऊन स्वतःलाच शिक्षा सुनावत राहतो.त्याला हे पक्के ठाऊक असते की आपली वकिली आपल्याइतकी चांगली कुणालाच करता येणार नाही.आणि आपल्या इतकी कठोर सजा सुनावणारा निकाल दुस-या कुणालाच देता येणार नाही.चिरीमिरी देऊन पुढची तारीख मिळवणे ह्या कोर्टात तर आजन्म शक्य नाही.'बीत गई सो बात गयी' म्हणून आपण भुतकाळाशी फारकत घेतली पाहिजे.आणि ज्या भविष्याचा अंत कुण्याच ज्योतिषाच्या बापालाही लागला नाही.त्याच्या चिंतेत हातात असलेला वर्तमानाचा क्षण नासविण्याचा मूर्खपणा करायचा तरी कशाला?
जरा मोकळेपणानं गुणगुणायला सुरुवात करा...आगे भी जाने न तू...पीछे भी जाने न तू...जो भी है... बस यही इक पल है...
प्रशांत पोरेंनी हे आपल्या शैलीत सांगितलं-
मजेत होतो, मजेत आहे, मजेत राहू
भोग तसाही कधी कुणाला टळतो आहे?
तळहातावरील धनरेषा किती स्पष्ट आहे?ती कशी कशी वळत,कुठे उंच जाते.मूठ बांधल्यावर ती मुठीतच राहते की नाही वगैरे गगैरे गोष्टीत डोकं खपवत एकाचजागीम बसून रहायचं.हातपाय हालवायचे नाहीत.असेल माझा हरी तर देईन पलंगावरी म्हणणा-या ऐतखाऊंना समृद्धीचे वरदान देण्याएवढा भोळा आहे का हो देव?असा कुणाचाही फुकट उद्धार तो करत नाही.मनगटात असलेल्या ताकदीवर ज्याची श्रद्धा त्याला मदत करायला तो धावून येईल आणि प्रशांतचा 'आतला आवाज' बोलेल-
कुठलाच देव आता बहुधा नसेल भोळा
भगवंत मनगटाचा मजला प्रसन्न व्हावा.
सांगली जिल्ह्यातले खानापूर हे प्रशांत पोरेंचे मूळ गाव.त्यांनी बी.काॅम.केलं.नोकरी करता करता एम्.बी.ए.केलं.सध्या पुण्यात टोयॅटो कंपनीत सेल्समॅनेजर म्हणून काम करतात.'प्रिया' शीर्षकाचा एक कवितासंग्रह त्यांच्या नावावर आहे.त्यांच्या काव्यलेखनाची गाडी हल्ली मराठी गझलच्या महामार्गावर नियंत्रित प्रवासाचा आनंद घेत आहे.कधी कधी वाटेत भेटणारी फुलं त्यांना सुगंधी प्रश्न विचारतात.ते निरुत्तर होतात आणि आपण म्हणतो लाजबाब-
वेश्यागृहात व्हावा, की मंदिरात व्हावा
कुठल्या फुलास असतो, मृत्यो तुझा सुगावा?
____________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि. ३ ऑक्टोबर,२o१५◆
_____________________________________________
No comments:
Post a Comment