Friday, October 16, 2015

कोवळ्या हाती दिला खंजीर आता



पंधरावर्षांपूर्वी आपण ही कल्पनाही करू शकत नव्हतो की पिण्याचं पाणी आपल्याला दहा रुपये लिटरनं विकत घ्यावं लागेल.आज आपण सहजपणे म्हणतो...बस स्टॅडवरून-रेल्वे स्टेशनवरून बिसलरी विकत घेशील रे बाबा...तहान लागण्याची वाट पाहू नको...छोट्याशा खेड्यातले बस स्टाॅप असो की झोपड्या-खोपड्यातले हाटेल्स असो बिसलरी आपल्या सेवेत हजर असते.
...'श्वासांइतके मोल जळाचे जीवन ह्याचे नाव' असं सकाळी सकाळी रेडिओवरून आपल्या कानात ओतलं जातं.पण त्यातलं मनात किती झिरपतं?त्यातली थेंबभरही ओल आपल्या दैनंदिन जीवनात कुठं दिसत नाही.एक साधी गोष्ट आहे आपल्यासमोर पाण्याचा प्याला आला की आपण त्यातलं अर्ध पाणी पितो, अर्ध तसंच ठेवतो.ते उष्टं म्हणून फेकून दिल्या जातं.ह्या अर्ध्या प्याल्याला आपण पाणी पिण्याच्या वेळांनी आणि त्यानंतर असं करणा-या लोकांच्या संख्येनी गुणलं तर दिवसाकाठी आपण कोट्यावधी लिटर पाणी वाया घालवतो.मरणा-याच्या तोंडात टाकायला जेव्हा चार थेंबही घरात नसतील अशी वेळ येईपर्यंत आपण असेच जलनिरक्षर राहणार आहोत का?ज्या गावात भरणंभर पाण्यासाठी बाया-माणसांना मरमर करावं लागतं त्याच गावाच्या शेजारी बिसलरीचा कारखाना असल्याचं विसंगत वास्तव आपण भोगत आहोत...सर्वार्थानं गोड लागतो म्हणून  उसाचे जास्त लाड पुरवणारं पाणी म्हणतं, इतर पिकं जळली तर जळू दे...वाळली तर वाळू दे...अभिषेक उदावंतचा शेर ह्याच वास्तवाला तुमच्या-माझ्या संवेदनेत प्रवाहित करतो -

गावाकडचे शेत वाळले
शहरासाठी तलाव झाला.

खेड्या-पाड्यातल्या कुडामातीच्या झोपड्यांना सुरुवातीला  
अॅन्टेने फुटले आता डिश उगवल्या.टी.व्ही चे मल्टी नॅशनल चॅनेल्स,हिन्दी-मराठी सिनेमे रात्रंदिवस डोळ्यांवर येऊन बदंबदं आदळू लागले.त्यातून दिसणारी चमक-धमक हळूहळू आपल्या जगण्यात शिरू लागली.आपलं बोलणं-चालणं व्यापू लागली.मेणबत्त्या विझवणारा हॅपी बर्थ डे आणि एकतीस डिसेंबरची ओली पार्टी हे आपले सणवार झाले.आणि आपल्या अर्थशास्त्रातील चैनीच्या गरजांनी पक्षांतर करून त्या आवश्यक गरजांच्या सत्ताधारी पार्टीत आल्या.'वापरा आणि फेकून द्या' ची स्वस्त चिनीमालाची बाजारपेठ गजबजली.ह्यालाच आपण जागतिकीकरण वगैरे म्हणू लागलो.अभिषेकच्या शेराने त्याला छान तिरकस छेद दिला-

भाकरीची सोय नाही खायची
झोपडीला पाहिजे झुंबर घरी.

सात पिढ्या आरामात बसून खाऊ शकतील एवढी माया पाच वर्षात जमवता येते.असा आत्यंतिक नफ्याचा व्यवसाय म्हणजे राजकारण,हे नवे साधन आपल्या हाती लागले.भावा-भावातून,भावा-बहिणीतून,काका-पुतण्यातून विस्तव जात नाही.बाहेरून सगळं आलबेल दिसत असलं तरी आतून कुरमत कुरमत काहीतरी सतत जळत असतं.इर्षेनं सगळ्या नात्यागोत्याचा,प्रेमसंबंधाचा काला करून खाल्ला.कधी जाहीर तर कधी छुपा बहिष्कार गावातल्या घरांना वाळीत टाकतो आहे. अशात अभिषेकच्या शेराने घेतलेला पक्ष-

चिमणे तुझ्या पिलांना दाणा कुठे मिळेना
सारे फवारलेले गावात राजकारण

कवितेचा कट्टा आणि गझलचा अड्डा म्हणून अकोल्याच्या आमच्या शिवाजी काॅलेजच्या कॅन्टीनची ख्याती होती.तिथल्या दैनंदिन बैठकीत अमित वाघ,रूपेश देशमुख,अमोल शिरसाटची चौकडी पूर्ण करणारा चवथा भिडू म्हणजे अभिषेक उदावंत.नाट्य आणि चित्रकला हे त्याच्या आवडीचे विषय.अकोल्याच्या कोर्टात सध्या कारकून म्हणून नोकरी करताना बाल गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण पाहून अस्वस्थ होतो.आणि आपल्या शेरात त्याची 'गंभीर' दखल घेतो-

प्रश्न झाला एवढा गंभीर आता
कोवळ्या हाती दिला खंजीर आता
_______________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि. १७ ऑक्टोबर,२o१५◆
_______________________________________________

No comments:

Post a Comment