Friday, September 25, 2015

कुठली शाळा? कुठले दप्तर?


बालपणाचं कौतुक करणा-या खूप सा-या कविता आहेत.'रम्य ते बालपण' वगैरे वगैरे असं सुंदर वर्णन त्यात असतं. पण प्रत्येकाच्या वाट्याला  असं काव्यात्मक रम्य बालपण येतंच असं नाही.ज्या वयात हातात पाटी-पुस्तक असायला हवे त्या वयात कोवळ्या हातात घमिले,फावडे,हातोडा,कॅटली,विळा,खुरपे,कु-हाड.....वगैरे पाहिले की कुण्याही संवेदनशील शिक्षकाचं मन कळवळतं...अकोल्याच्या अमोल शिरसाटचं तसंच झालं-

रानफुले शिकतात उन्हातच
कुठली शाळा? कुठले दप्तर?
 
समाजात एकीकडे असे चित्र आहे तर दुसरीकडे वह्या पुस्तकांचं  ओझं मुलांच्या पाठीला सहन होइनासं झालं.स्कुल बॅगमध्ये मोबाईल घुसला.पाॅकेट मनीच्या नावाखाली शंभर रुपये मागितले तर पाचशे देणारे माॅम-डॅड आले.डॅडला त्याचं ऑफिस आहे.बिझिनेस मिटिंग्ज आहेत.टेबल डिलिंग पार्ट्या आहेत.माॅमला तिचा क्लब आहे.जमलं तर तथाकथित सोशल वर्क आहे.उरलेल्या वेळात  हाय प्रोफाइल लाइफ स्टाइलच्या टी.व्ही सिरियल्स आहेत.स्टोरीत आलेल्या ट्विस्टवर डिस्कशन आहे.मोबाइलवर मैत्रीणींशी तासन्तास गप्पा आहेत.असं सगळं सगळं आहे.फक्त मुलांशी बोलायला वेळ नाही.त्याचं भावविश्व समजून घ्यायला टाइम नाही.त्याचं प्रोग्रेसबुक पहायला फुरसत नाही.मम्मी-पप्पांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा-आकांक्षा-स्वप्नं पूर्ण करण्याचं मुलांना टारगेट दिलेलं.मुलांना मानसिक भूक असते.ती भागवल्या गेली नाही तर ते मनाने कमजोर राहतात हे पालकांच्या गावीही नाही.अमोलनं हे नेमकं हेरलं-

वाढले प्रेमाविना त्यांचे कुपोषण
लेकरांना दे जरासा वेळ मित्रा.

अमित,रूपेशप्रमाणे अमोलही अकोल्याच्या माझ्या श्री शिवाजी महाविद्यालयाचा विद्यार्थी.वडील बी.आर.शिरसाट.तळमळीच्या समाजकार्यातून राजकारणात नाव कमावलेलं मोठं व्यक्तिमत्व.अकोला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. बी.ए.झाल्यावर अमोलनं यु.पी.एस.सी.ची तयारी करावी म्हणून वडिलांनी त्याला दिल्लीला पाठवलं.पण नियतीच्या मनात वेगळंच काही होतं.एका जीवघेण्या आजारात वडील गेले.आईनं खंबीरपणे मुलांसह घर सावरलं. स्वतःच्या संस्थेची प्रत्यक्ष देखरेख करण्यासाठी  अमोलनं बी.एड.केलं.त्याला आय.ए.एस करण्याचं वडिलांचं स्वप्नं अर्ध्यावरच तुटलं.थोडेफार तपशील बदलले तर तुमच्या-माझ्या आयुष्यात अशीच उलथापालथ होत असते.म्हणून तर त्याचा हा शेर सर्वांचा होतो-

वास्तव जेव्हा व्याजासाठी ठाण मांडते
घर स्वप्नांचे विकण्यावाचुन उपाय नाही.

माणसाच्या अवतीभवती नात्यागोत्याची,दोस्त-मित्रांची,आल्या-गेल्याची कितीही वर्दळ असली, तरी त्याचं एकटेपण दूर होत नाही.चल अकेला चल अकेला म्हणत त्याला चालत रहावं लागतं.आहो तसे आपल्याला समजून घेईल असे मैत्र संपूर्ण विश्वात दुर्मिळ.तेव्हा त्यालाच स्वतःचा सखा-सखी व्हावं लागतं-

कुणास कळते हृदयाची कळ?
अपुले आपण असतो केवळ!
_________________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि. २६ सप्टेंबर, २o१५◆
__________________________________________________

No comments:

Post a Comment