Friday, September 18, 2015

पौर्णिमेचा चंद्र हा झाकून ठेवा


'आपल्या देशातली शेती हा पावसाच्या हातातला जुगार आहे.'असं शाळेतल्या निबंधात आम्ही  लिहित होतो.दोन आण्यात दहा रूपये मिळतील ह्या आशेने वरली मटका लावणारे मायबाप-भाऊबंद-यारदोस्त आम्ही अनुभवलेत.वरलीचा आकडा एका दाण्यानं  तर वावरातलं पीक एका पाण्यानं जाते.अनुभवाचा निचोड असणारी ही म्हण लोकभाषेत येता येता काळ्या मातीला जीव लावणा-या शेकडो पिढ्या मातीत गेल्या.पण कशातच काही बदल झाला नाही.हजारदा नक्षत्रं तशीच कोरडी गेली. आभाळातनं पाणी पडलं नाही.डोळ्यातलं पाणी खंडलं नाही.आपण पेरलं काय अन् उगवलं काय?-

पावसाने पेरले अश्रू पुन्हा शेतात या
आत्महत्या उगवुनी येतील ..भीती वाटते.

 विश्वास रघुनाथ कुळकर्णींच्या शेरातल्या ह्या भीतीचा काळोख आपल्या अवतीभवती गच्च जाळं  विणत चाललाय...आता उजाडेल...मग उजाडेल अशा वेड्या आशेवर आपण अमावस्येच्या काळ्या रात्रीचे प्रहरोनप्रहर काढत चाललोय...पण काही केल्या...भय इथले संपत नाही...
कधी नव्हे तो यंदा मिरूग वेळेवर बरसला.मनाची मरगळ पार धुवून निघाली.काय वाट्टेल ते कबाडे करून,उसणं पासणं करून,व्याजबट्ट्यानं पैसे काढून,घरातलं किडुकमिडुक काय असेल ते विकटिक करून मोठ्या हरिखानं वावर पेरलं.अन आस लावून बसलो...औंदा दलिंद्री दूर होणार...पण कसलं काय अन फाटक्यात पाय.कोण्या सटवीच्या घरी दडून बसला कुणास ठाऊक...कमीजास्त महिना-दीड महिना झाला...पावसानं तोंड दाखवलं नाही...दुबार पेरणीची आफत आली.आषाढीची वारी आम्ही कधी चुकू दिली नाही.पंढरीच्या पाडुरंगा,तूच वाट दाखव रे बाप्पा-

बियाणे हवे रे पुन्हा पेरणीला
विठू सांग आता विकू काय नक्की?


नुकतीच उगवून आलेली हिरवीगार इवलाली पिकं वा-यावर डोलताना पाहण्यासारखं दुसरं नेत्रसुख नाही.ही ओढ माणसं-बायांना वावरात ओढून आणते.त्यांना ढोरमेहेनतीसाठी प्रवृत्त करते.ह्या मोसमात गावात करमत नाही.माय म्हणायची बाबू,"ह्या वक्ती गावातली लक्षीमी वावरात नांदायले येते".वाया गेलेल्या तरुण पोरासारखं गेलेलं पाऊसपाणी परतलं नाही. पिकं पिवळी पडू लागली.कुपोषणानं मरणासन्न झालेल्या तान्ह्या लेकराकडे बघवत नाही.तसा जीव तुटतो.ढोरांना खायला चारा नाही.पोरांना प्यायला पाणी नाही.ह्या सुल्तानी बुजगावण्यांना काय मीठ-मिरची लावून चाटायचं?-

शेतात पीक नाही..बुजगावणे कशाला
निष्पाप पाखरांना धमकावणे कशाला ?

अशावेळी आकाशातल्या पूर्णचंद्रात भाकरीचा भास  होणं अगदी स्वाभाविक आहे.भाकरीच्या चंद्राची ही प्रतिमा वैश्विक आहे.ती जगभरातल्या कवितेत सापडते. मूळ बार्शीचे,हल्ली मुक्काम कोल्हापूरात.जीवन विम्याच्या  नोकरीत असलेल्या विश्वास कुळकर्णींनीच्या शेरात उतरलेली चंद्रकला मात्र अप्रतिम आहे-

पौर्णिमेचा चंद्र हा झाकून ठेवा
लेकरांना भाकरीची याद येते!
_______________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि. १९ सप्टेंबर, २o१५◆
________________________________________________

No comments:

Post a Comment