Friday, September 11, 2015

पानांना कळले नाही




'सुख पाहता जवापाडे दुःख पर्वताएवढे' हे आपल्या सुखदुःखाचे  मोजमाप.दुःखाची रात्र मुंगीच्या पावलांनी चालणारी...काही केल्या कटता कटत नाही.कटली बुवा एकदाची असं म्हणत पहाटेचा गार वारा त्वचेला स्पर्शसुख देऊ लागतो...पक्षी उजेडाची गाणी गाऊ लागतात...सातघोड्यांच्या रथात बसून काळ दौडत राहतो... हत्तीच्या दगडी पावलांनी एक उदास जड संध्याकाळ आपल्या अंगणात उतरते...आज स्कीन टाइट वाटणारं सुख दोन-चार दिवसात वाढत्या अंगाचं ढिल्लम ढाल्लम होतं.चारचौघाप्रमाणे सुखी माणसाच्या सद-याचा शोध घेणारा शुभानन चिंचकर आत आत कुठेतरी उसवतो-

हाच असे काय सुखाचा सदरा
काल घट्ट होता अन ढगळ आज.

संपणारा हरेक दिवस तुमच्या-माझ्या आयुष्याचा एक तुकडा तोडून आपल्या सोबत घेऊन जातो... काळाच्या ह्या अविश्रांत वाटेवर आपण शोधत राहतो...सापडतो का कुठेतरी एक धागा सुखाचा...
कधीकाळी चुकूनमाकून टीचभर सुत गवसल्यासारखे वाटतेही आपल्याला...त्या सुतावरून सुखाचा स्वर्ग गाठण्याचाआपण  प्रयास करतो.हा दोरा अगदीच निरुपयोगी नसतो.'अरूण' हे टोपण नाव असलेल्या शुभाननच्या तो कामी पडतो-

जोड ठिगळे, घाल टाके, कर रफू तू
'अरुण' हे आयुष्य रेडीमेड नाही.

निसर्गानं माणसाला साडे तीन हाताचा देह दिला.त्यात त्याच्या मुठीएवढं हृदय दिलं.वीतभर पोट दिलं.हाताला काम मिळावं म्हणून  आयुष्यभराची पायपीट दिली.पोटामागे धावत एका गावातून दुस-या गावात माणसाचं स्थलांतर चाललेलं असतं.जिथे पोट भरेल ते आपलं गाव.मुक्काम पोस्ट म्हणून  त्याच गावचा आपला पत्ता.पण पत्ता कायम राहत नाही.कधी वाटतं,गावात काही पडलेलं नाही.चला शहरात जाऊ.शहरात आलं की वाटतं,आपलं गावच बरं होतं.काय करावं?काय नको?काही कळत नाही.कसंतरी पोटभरलं तरी हृदय बेटं अस्वस्थच. चिंचकरांचं मूळ घर सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातील म्हसवडचं.म्हसवड ते सासवड व्हाया जुन्नर असा प्रवास करता करता होणारी घालमेल शुभाननच्या शेरात आली-

शहर सोडू... कसे मी करू
काय करणार गावी पुन्हा...

काही माणसं आपलं बोलणं,चालणं...जगणं,भोगणं...हासणं,सोसणं...जुटणं,तुटणं...जळणं,गळणं अगदी धुमधडाक्यात ढोल-ताश्यांच्या तालावर,बॅन्ड बाजाच्या बोलावर साजरं करतात.शेजा-या-पाजा-यांचं...दोस्त-मित्रांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतात.कोणीतरी पाहणारे असले,टाळ्या वाजवून साथ देणारे असले तरच नाचण्यात अर्थ.जंगलात जाऊन टाहो फोडला तर कोण सांत्वनाला येईल? आसवं पुसायला कुणीतरी सुगंधी रुमाल देणारं नसेल तर रडण्या-बोंबलण्यात काय मतलब?समाजशील असलेल्या मनुष्य प्राण्याची सुख-दुःखं कशी लोकाभिमुख असली पाहिजेत यार!
याच्या अगदी उलट दुस-या टोकावर अंतर्मुख असणारे लोक असतात.सहनशक्ती हीच त्यांची सगळ्यात मोठी शक्ती असते.जीवनाच्या सखोल पाण्यात ते स्वतःला इतक्या सहजपणे बुडवतात की पाण्यावर साधा तरंगही उमटू नये.मग बुडबुड्याची बात तर दूरच-

पानांना कळले नाही, ना मातीला जाणवले
प्राजक्तव्यथा ही माझी ओघळली अलगद आहे.
_____________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि. १२ सप्टेंबर, २o१५◆
_____________________________________________

No comments:

Post a Comment