Friday, September 4, 2015

तुझा अबोला मला कळावा,एक फोन कर.



जेव्हा भाषेचा शोध लागलेला नव्हता त्या आदिम काळातही काही विशिष्ट उच्चार आणि हातवा-यांच्या द्वारे स्त्री- पुरुष संवाद होत असेल.आणि कधीकाळी विसंवादही.आनंद व्यक्त करणारं नाचणं जसं आपल्या गुणसूत्रात हजारो वर्षे वाहत आलं तसंच रुसणं-फुगणं-समजूत काढणं-फुक्कटचा भाव खाणं वगैरेसुद्धा.
नाही पटलं,आपल्या मनासारखं नाही झालं तर केवळ लहान मुलंच कट्टी करतात असं नाही.वयानं चांगली वाढून वाया गेलेली मोठमोठी माणसंही बोलणं टाकतात.कट्टी करतात.कुठलीच माचिस न वापरता एकमेकांचा जीव जाळतात.हातात असलेले आयुष्याचे अनमोल क्षण मातीत घालतात.उपरती झाल्यावर पुन्हा एकदा गट्टी करतात.ह्या मानवी नाट्याला साजेसं नेपथ्य देणारा हा रूपेश देशमुखचा शेर-

नकोस बोलू एक शब्दही फक्त रिंग दे
तुझा अबोला मला कळावा,एक फोन कर.

कधी कधी आयुष्यात असे प्रसंग येतात,जे आपली परीक्षा पाहतात. आपण ज्याला सुख- सुख म्हणतो ते अगदी हातभर अंतरावर उभं असतं.हस्तांदोलन करण्यासाठी उत्सुक असतं.पहिल्यांदा आपण हात पुढे करावा म्हणून ते वाट पाहत असतं.मौनातल्या आंतरखुणांनी आपल्याला काहीबाही सुचवत असतं.आणि नेहमीसारखं आपलं तर काहीच ठरत नाही.फक्त एक पाऊल पुढे टाकायचं असतं.पण डोकं जोखीम उचलायला तयार नसतं.'ये भोग भी एक तपस्या है...तुम त्याग के मारे क्या जानो?'असा नाजुक टोमणा मारत एक 'चित्रलेखा' दारावर टिकटिक करीत राहते. पाप-पुण्य,नीती-अनीतीच्या संस्कारांचं घर इकडे आपल्याला पाय उचलू देत नाही.तिकडे दाराबाहेरचा मादक संसार सारखी साद घालत राहतो.आणि आपण नुसते तळ्यात-मळ्यात...हा निर्णायक क्षण रूपेश देशमुखांनी अलगद टिपला-

कधी संयमी,कधी अनावर आपण दोघे;
हो- नाहीच्या उंबरठयावर आपण दोघे.

आयुष्याची गती अशी असते की कोणताच क्षण तुमच्या निर्णयासाठी थांबत नाही.हा असा प्लॅटफाॅर्म आहे ज्यावर गाडी एकदाच येते.इंजिन एकदाच शिट्टी वाजवते.गार्ड एकदाच हिरवी झेंडी देतो.धावत जाऊन गाडीत चढायचं असलं तर चढा...नाही तर तुमची मर्जी...नंतरची गाडी असलीच तर पुढच्या जन्मी...नंतर 'यूँही कोई मिल गया था सरे राह चलते चलते'...अशी गाज देणारा आठवणींचा महासागर आपल्या भोवताली...नाकातोंडात पाणीच पाणी... आसवांच्या चवीसारखं खारट-

कसे तरावे,कुठे बुडावे समजत नाही;
कधी भोवरा,कधी किनारा तुझी आठवण.

अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर तालुक्यातील भामोद हे रूपेशचं गाव.रेळे हे त्याचं मूळ आडनाव.मराठी गझलच्या साम्राज्यात देशमुखांचं एक वतन आहे.रूपेश  हा तिथला वतनदार गझलकार.अकोल्याच्या माझ्या श्री शिवाजी महाविद्यालयाचा हा माजी विद्यार्थी आणि गझल विद्यापीठाचा आजी शिष्य.सध्या तो वर्धा जिल्ह्यातल्या रोहण्याला इंग्रजीचा सहाय्यक प्राध्यापक आहे.'तेरी बातो मे किमाम की खुशबू है' म्हणणा-या गुलजारसाहेबांचा रूपेश कमालीचा दिवाना आहे ह्याची ग्वाही देणारा त्याचा हा शेर-

असे सुगंधी तुझे बोलणे
जणू फुलांचा श्वास बोलतो.
____________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि. ५ सप्टेंबर, २o१५◆
____________________________________________

No comments:

Post a Comment