Friday, July 31, 2015

फाटक्या चपलेत आई चालली


आठ दहा वर्षापूर्वीची गोष्ट असावी.भारतातील महानगरांमधून इंटरनेटचा ब-यापैकी प्रसार होऊ लागला होता.फेसबुक, ट्विटरचा जन्म झाला नव्हता.तेव्हा गणेश धामोडकर नावाचा एक युवक नागपुरात आयुर्वेदाच्या पदवीचे शिक्षण घेत होता. त्याला कविता आवडायच्या.'काव्यधारा' शीर्षकाचा एक ब्लाॅग त्याने नेटवर सुरू केला.त्याला आवडलेल्या कविता त्या ब्लाॅगवर तो पोस्ट करायचा.ह्या नव्या माध्यमाच्या आकर्षणात्मक कुतुहलातून त्याची अन् माझी ओळख झाली. बालवयात त्याला वाचनाची आवड लागावी म्हणून त्याचे बाबा धडपडत होते. बुलडाणा जिल्ह्यातल्या नांदु-या जवळ असलेल्या मानेगावसारख्या खेड्यात वाचनीय पुस्तकं उपलब्ध होत नव्हती. बोलीभाषेत सांगायचे म्हणजे त्यासाठी सतरा घराचे उंबरठे झिजवावे लागत होते. पण अशी पायपीट करण्यात बाबांना आनंद होता.पुढे तो कविता-गझला लिहू लागला.आणि त्याच्या शेरात उमटला गावाकडच्या जगण्यातल्या वास्तवाचा समजुतदार स्वीकार -

बापाच्या डोक्यावरती शेणामातीचे डाले
संकोचुन  मीही रुमाल नाकाला लावत नाही.

मानेगाव ते नागपूर ह्या प्रवासात त्याला झालेले जीवनदर्शन त्याच्या गझलमधून प्रकटू लागले.माणसाची भूक चाळवणारा पंच पक्वांनाचा वास उपाशी पोटाला अस्वस्थ करतो.त्या वासामागे  अन्नावरची वासना खेचल्या जाते.परंतु अन्न आणि भूक  ह्यांच्या मधात ही काचेची भिंत कुणी घातली कुणास ठाऊक.पण ह्या काचेच्या भिंतीने माणसांवर उपकारच केले-

काचेच्या पाठीमागे ही पक्वान्नांची गर्दी
हे बरे वास घमघमता वा-यावर धावत नाही.

कुठेतरी मी वाचलं होतं...कुठल्याशा मोठ्या शहरात एक कवी रहायचा.कविता करायचा.गाणी रचायचा.बायकोच्या आदेशानुसार भाजी आणायला सकाळी बाजारात जायचा.रस्त्यात वर्तमानपत्राचे कार्यालय लागायचे.आधी तिथे जायचा.लिहून आणलेली कविता संपादकाला द्यायचा.मानधन वसूल करायचा.बाजारात जायचा.मानधनाच्या पैशातून भाजी घ्यायचा.घरी येताना जुन्या हिन्दी सिनेमातलं गाणं गुणगुणायचा.'दुनिया मे ऐसा कहाँ सबका नसीब है...'

खरं आहे रे कविराजा...गणेश धामोडकरांचा आवडता महाकवी गालिब...कर्जबाजारीपणातच खपला रे बाबा.थोडाफार उरलासुरला धामोडकरच्या कीबोर्डातून उतरला-

घेउनी थैली रिकामी परतलो
शेर ना माझी रुबाई चालली.

असं म्हटलं जातं की मुलं वाढत्या वयानुसार मॅच्युअर्ड होत जातात.तर मुली जन्मतःच मॅच्युअर्ड असतात.
प्रत्येकाला आपापली आई मनोभावे तीर्थरूप असते.आवडती असते.आणि प्रियही असते.अष्टपैलू हा शब्दसुद्धा तोकडा पडावा अशा अनेकविध भूमिका स्त्रीला तिच्या जिंदगीत निभवाव्या लागतात.कधी तिला आई व्हावं लागतं.कधी तिला सखी व्हावं लागतं.खरं तर स्त्रीला तिच्या आयुष्यात पुरुष हवा असतो ते तिला आई व्हायचं असतं म्हणून.

तू कधी मायही माझी, माझी तू कधी प्रियाही
तू फक्त ठोकळ्यामध्ये शब्दांच्या मावत नाही.

कवितेत शब्दांचे ठोकळे होऊ न देणं हेच सच्च्या कवीचं काम.वापरून वापरून नाणी जशी गुळगळीत होऊन जातात.नर्मदेतल्या गोट्यासारखी.तसं शब्दांचं होता कामा नये. तरच त्यांच्या लालित्याचे कंगोरे भावनांना तीव्रतेने अभिव्यक्त करू धजतात.तेव्हाच कवितेचे हत्यार आधी लिहिणा-याला आणि नंतर वाचणा-याला जखमी करते.हा घाव कधीच भरत नाही.त्याच्या पायाला जोडा चावत राहत राहतो...आणि पाॅलिश केलेल्या बुटाची लेस बांधणा-या संवेदनशील मनाला आईच्या फाटक्या चपलेची याद राहते-

बांधतो आहे बुटाचे बंद मी
फाटक्या चपलेत आई चालली.

आज गणेश ब्रह्मपुरीला स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर आहे.त्याला आई-बाबा केवळ कविते पुरते नकोत. ते कायम मुलाबाळात रहावेत म्हणून त्यांना तो आपल्या जवळ घेऊन आला.कोणत्याही उच्च दर्जाच्या कवितेपेक्षा ही गोष्ट मला लाखपटीने श्रेष्ठ वाटते.
___________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि. १ ऑगस्ट, २o१५◆
___________________________________________

No comments:

Post a Comment