Friday, May 29, 2015

वारियाचा वेग मोजू ; पंख लेऊ एकदा!


एक काळ असा होता की महिलांनी लिहिलेल्या कविता म्हणजे बहुतांशी पाना-फुलांच्या कविता असायच्या.आज मात्र चित्र पार बदलून गेलंय.अवतीभवती घडणा-या घटनांची काव्यात्मक प्रतिक्रिया कवयित्रींच्या कवितांमधून हल्ली सहजपणे उमटताना दिसते.
रस्यावर गर्दीच्या ठिकाणी विपरित घडताना जाणारे-येणारे 'जाऊद्या कशाला कोणाच्या भानगडीत पडता'असा विचार करून निघून जातात.प्रतिकार करण्याऐवजी काही हौशी मंडळी खिशातून आपला मोबाइल काढून तो 'प्रसंग' शूट करीत असतात.अशा गोष्टींकडे आपण डोळेझाक करू नये म्हणून टीव्हीच्या पडद्यावरून तीच क्लीप वारंवार आपल्या डोळ्यांवर आदळत असते...आणि मग योगिता पाटील यांची भावना त्यांच्या शेरातून उमटते-

बर्फाळ जाहले का जे रक्त वाहणारे;
अन्याय पाहुनीही का हात बांधलेला?

योगिता पाटील चोपड्याला शिक्षणशास्त्राचे अध्यापन करतात.हेच का मूल्य शिक्षण जे आपण विद्यार्थ्यांना देतो?हाच विद्यार्थी उद्या नागरिक म्हणून समाजात वावरणार आहे.त्यावेळी तो कोणती नैतिक मूल्ये घेऊन जगण्याच्या संघर्षात उतरेल? असे अनेक प्रश्न अध्यापिका म्हणून त्यांना नक्कीच पडत असणार.ह्या मानसिक आंदोलनातूनच त्यांना गझलचे शेर स्फुरत असावेत.

माणसाचं जगणं यंत्रवत होत चाललेलं आहे.चाबी भरलेल्या खेळण्यासारखा तो सकाळी ऊठतो.दिवसभर धाव धाव धावतो.बॅटरी डिसचार्ज झालेल्या मोबाईल सारखा रात्री अंथरुणात निपचित पडतो.उंदिरांच्या शर्यतीसारखं हे आजकालचं जगणं पाहिलं की 'जगायची पण सक्ती आहे /मरायची पण सक्ती आहे' ह्या मर्ढेकरांच्या ओळींची प्रचिती येते.
ह्या यांत्रिक जगण्याची वेदना योगिताच्या एका शेरात तिखट होऊन येते. आणि वाचकाच्या मनात तिची कळ उमटवते-

तोच रस्ता,तोच मीही,तीच आहे जिंदगी
घास दु:खाचा चवीला वाढलेला आजही.

सक्तमजुरी झालेल्या कैद्यासारखं हे जगणं असलं; तरी प्रत्येक संवेदनशील मनाला मुक्तीचा ध्यास असतोच असतो.कधी त्याला वाटतं,ह्यातून आपली सुटका नाही.तर कधी वाटतं,मोकळ्या आकाशात उंच भरारी घेण्याचं स्वप्न पाहणं हा शुद्ध वेडेपणा आहे.पण आस सुटत नाही.उम्मीद पे दुनिया कायम है म्हणतात ते काही खोटं नाही.नाही तर आतापर्यंत जगबुडी नसती का झाली?मन स्वतःलाच बजावतं,चला ऊठा,लावा एकदा छातीला माती.करा हिम्मत.वेगात वाहणा-या बेबंद वा-याचं माप काढायचं आपल्याला-

बांधू कसे तयाला वृत्तात अक्षरांच्या;
बेबंद वाहणारा तो मुक्तछंद वारा!

हे काम असं एखाद्यावेळी अशक्य वाटेलही.पण ब्रेव्हो,थांबायचं नाही. लगा एकबार और... मास्टर स्ट्रोक-

मुक्तवेड्या पाखरांची झेप घेऊ एकदा;
वारियाचा वेग मोजू;पंख लेऊ एकदा!
____________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि.३o मे, २o१५◆
-----------------------------------------------------------------


No comments:

Post a Comment