सरपंच आणि गझलकार हे काॅम्बिनेशन तुम्हाला कसं वाटत?छान वाटतंना? मला तर बुवा अगदी झक्कास वाटतं.उदाहरण द्यायचं म्हटलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नानिवडेकर ग्रामपंचायतीचे सरपंच असलेल्या मधुसुदन नानिवडेकर यांच्याकडे मी चटकन बोट दाखवेल.
खूप वर्षांपूर्वी 'भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी' असा एक धडा आमच्या अभ्यासक्रमात होता.आम्ही अभ्यासला.त्याच्यावरची प्रश्नोत्तरं पाठ केली.परीक्षेत लिहिली.पास झालो.पुढे गेलो.मागचं सगळं विसरून गेलो. विविध पेशात काम करणारांनी साहित्यनिर्मिती केली तर समाजाच्या बहुअंगी स्तरात बोलल्या जाणा-या भाषेतील अनघड शब्दांनी मूळ भाषा अधिक समृद्ध होत असते.हे त्या धड्याचं तत्त्व.ह्याचा प्रत्यय मला आला तो नानिवडेकरांच्या मराठी गझला वाचताना.अत्यंत रूक्ष समजल्या जाणा-या प्रशासकीय भाषेचा चपखल उपयोग त्यांच्या गझलात आढळतो.मानवीसंबंधातली उत्कटता संपल्यावरही आपण केवळ उपचार म्हणून काही नात्यांना ओढत असतो.ढकलत असतो.अनिच्छेने पुढे रेटत असतो.ही टोचणी नानिवडेकरांनी आपल्या शेरात मांडली-
प्रेम डबघाइला येत आहे तरी
चालवू या महामंडळासारखे.
एका अर्थाने म्हटलं तर ही प्रेमाची गोष्ट आहे.आणि दुस-या बाजुने पाहिलं तर हे व्यवस्थेचं वास्तव आहे.
आजकालच्या अत्यंत धावपळीच्या जगात प्रेम करायला 'टेक युवर ओन टाइम' इतका वेळ आहे कुणाजवळ? घाईघाईत जेवताना जसा मासळीचा काटा घशात अडकून जीव गेल्याच्या घटना अधुनमधून घडतात,अगदी तसाच घड्याळाचा काटा एखाद्या अपवेळी धारदार कट्यारीसारखा खपकन काळजात घुसतो.अशा त-हेवाइक प्रेमाची एक जीवघेणी त-हा नानिवडेकरांच्या शेरात फार सुंदर त-हेने आपल्याला सामोरी येते.आणि हा तर आपलाच अनुभव त्यांनी शब्दात मांडला असं वाटतं-
घड्याळात पाहिले तिने अन् समजून गेलो
निघावयाला नानिवडेकर हरकत नाही.
'माहितीचा अधिकार' हे अलीकडे फार मोठ्या प्रमाणात गाजावाजा होत असलेल्या एका कायद्याचे नाव.शृंगारिक शेरामध्ये कमालीची सूचकता आणण्यासाठी 'माहितीचा अधिकार' ही अभिनव प्रतिमा सरपंच असलेल्या गझलकारालाच सुचू शकते.त्याचा हा उत्तम नमुना-
माहितीचा दे मला अधिकार थोडा
ये गडे लाजू नको आता जराही.
रोजच्या सूर्योदयाबरोबर चरितार्थाकरिता सुरू होणारी धावपळ कुणाला चुकली आहे?संध्याकाळी थकला-भागला जीव निवा-याच्या ओढीने घर जवळ करत असतो.पण घर म्हणजे केवळ चार भिंती आणि वर छप्पर एवढंच असतं का?असं असतं तर पायाला चाकं बांधून जगभर भटकणारी माणसं रात्री खुंट्यावर परतणा-या जित्राबासारखी घरी परतली नसती.पण हळुहळू घरटी विस्कटू लागली.'प्रायव्हसी आणि ओन स्पेस'च्या अतिरेकी भूकंपानं घरांच्या भिंती पायातून हादरू लागल्या.ही पडझड नानिवडेकरांचा शेर वाचणा-याच्या अंगावर कोसळते.आणि वाचकाचा जीव ढिगा-यातल्या मलब्याखाली गुदमरू लागतो-
गिलाव्याविना भिंत आहे उभी ही
घराला म्हणे ती कसे सावरू?
________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि.२३ मे, २o१५◆
------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment