तीव्र सामाजिक जाणीव आणि प्रखर राजकीय उपहास आपल्या गझलांच्या शेरांमधून मांडणारे दुष्यंत कुमार हे हिन्दीचे ख्यातनाम गझलकार आहेत.आपल्या बुलंद अभिव्यक्तीचा 'पत्थर' व्यवस्थेच्या 'आकाशात' 'तबीयतीने' भिरकावून त्याला विद्रोहाचे 'सुराख' पाडणारा हा शायर!'साये मे धूप' ह्या त्यांच्या संग्रहात केवळ बावन्न गझला आहेत.गायनसुलभ आशय त्यांच्या गझलात नसल्याने,त्यांची अपवादात्मक एखाद-दुसरी गझल गायकांच्या गळ्यातून उमटली.पण ह्या शायराला अपार लोकमान्यता मिळाली;ती केवळ त्यांच्या थेट भिडणा-या अर्थात्मक गुणवत्तेमुळे!
माणूस म्हटला की तो चोवीस तास एकच विचार,एकच भाव घेऊन जगत नसतो.त्यालाही मन असतं.घर-संसार असतो.त्याच्याही काही नाजुक भावना असतात.हे आपण चक्क विसरूनच जातो.सामाजिक बांधिलकीनं त्याला असं करकचून आवळतो की मानवी जीवनाची अनेक अंग अपंग होऊन जावीत.दुष्यंत कुमारांच्या बाबतीत मात्र असं होत नाही.त्यांच्या विद्रोहाला एक नाजुकशी किनार आहे.त्यांचं माणूसपण परिपूर्ण करणारी.
तू किसी रेल-सी गुज़रती है
मैं किसी पुल-सा थरथराता हूँ
एक जंगल है तेरी आँखों में
मैं जहाँ राह भूल जाता हूँ
दुष्यंत कुमार यांचे हे दोन प्रसिद्ध शेर गझलप्रेमींमध्ये बहुचर्चित आहेत. 'धडक-फडक'आवाजाने 'लोहेकी सडक' हादरून सोडणारी रेल्वेची अजस्त्र नादप्रतिमा एकीकडे तर 'तिच्या' दागिन्यांची नाजुक किणिकिण शब्दातून ऐकवणारा नादमयी 'खणखणीत' आविष्कार दुसरीकडे-
तेरे गहनों सी खनखनाती थी
बाजरे की फ़सल रही होगी
कधी बाजरीच्या उभ्या पिकाला छेडत वाहणा-या वा-याची सळसळ आपल्या श्रृतींना जाणवावी असा 'तिचा' साज नादावताना त्यांना ऐकू येतो. तर कधी तिने तिचा सर्वशृंगार आंदोलित केला तर कहर होतो-
तूने ये हरसिंगार हिलाकर बुरा किया
पांवों की सब जमीन को फूलों से ढंक लिया
- तमाम धरतीवर फुलांचा गालिचा अंथरणारा हा शेर
वाचणा-यालाही सुगंधित करतो.माझे ऐकाल तर 'ती' अशी फुलवंती आहे की तिच्या केवळ गालावरच गुलाबी झाक नाही तर ती आहे-नखशिखांत एक मूर्तिमंत गुलाब-
हुज़ूर! आरिज़ो-ओ-रुख़सार क्या तमाम बदन
मेरी सुनो तो मुजस्सिम गुलाब हो जाए
सजून धजून आपल्यासमोर ऊभ्या झालेल्या अशा प्राकृतिक सौंदर्याला डोळेभरून आपण कितीही न्याहाळलं तरी त्या रुपानं आपलं मन थोडंच भरणार?-
तुमको निहारता हूँ सुबह से ऋतम्बरा
अब शाम हो रही है मगर मन नहीं भरा
-श्रीकृष्ण राऊत
____________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि.१६ मे, २o१५◆
------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment