Friday, April 17, 2015

उराशी वीज कडकडते.......!



आपल्या मनासारखी एखादी 'परी' आपल्याला भेटते.अगदी सिनेमाच्या चंदेरी दुनियेतली मिस 'चमको' नसली, तरी ब-यापैकी
'बरी' वाटावी इतकी सुंदर तर ती नक्कीच असते.नाही तरी सौंदर्य हे पाहणा-याच्या नजरेतच असतं असं म्हणतात ते काही खोटं नाही. 'मस्तानीला' पाहायला 'बाजीरावजीं'चीच नजर लागते राव! आतापर्यंत आपण ज्या सुगंधाच्या शोधात फुलपाखरासारखे  बागेच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत नुसते इकडून तिकडे भिरभिरत होतो, ते फूल एकदाचं सापडतं! पण-
कधी कधी आपली काय साॅलीड  गोची होते यार!
'तू मला खूप आवडतेस' हे त्या फुलराणीला सांगायचं कसं ? एरवी फाड फाड बोलणारी आपली जीभ इथंच का अडखळू लागते-

अचानक जीभ ही अडते,तुला मी हे कसे सांगू!
मला तू खूप आवडते तुला मी हे कसे सांगू!

तरुणाईची ही सुरेख पंचाइत शब्दांच्या चिमटीत नेमकी पकडली परतवाड्याचे आमचे गझलकार मित्र अनिल पाटील यांनी.

'त्या' मनमोहक सुगंधाची बातच न्यारी-

तुझ्या गंधाळल्या देही फुलांचा वास दरवळतो
मनाला भूल ही पडते तुला मी हे कसे सांगू!

फुलणा-या देहाची भूल मनाला पाडणा-या गंध- प्रतिमेचा खुमार ओसरतही नाही तर निळ्या आणि काळ्या रंग-प्रतिमांनी खुललेली रंगबहार  डोळेच खुडून नेते-

निळ्या साडीत असतांना जरा सावध असावे तू
निळे आभाळ गडगडते तुला मी हे कसे सांगू!

तुझ्या मेघापरी काळ्या जरा सांभाळ केसांना
उराशी वीज कडकडते तुला मी हे कसे सांगू!

मला पटकन 'इक रात'चित्रपटातल्या गाण्याची ओळ आठवली-
'जुल्फे काली करने को बदली को जलाया होगा'!

अनिल पाटील यांच्या ह्या 'रंगपंचमी' ने वाचकांवर गारूड केले आहे.
१९९६ ते २०११ या कालखंडात  अनिल पाटील ह्यांचे  ‘यातिक’ ‘गाफील’ ‘मातेरं’ ‘चंद्र नभी गझलेचा’ असे चार संग्रह प्रकाशित झालेत.मराठी गझलप्रेमींच्या हृदयात  'अनिल पाटील' हे नाव कायम रुतून बसले आहे,ते ह्या गझलने.कारण 'कसे सांगू?' म्हणता म्हणता ती बरेच काही
'नाजुक-साजुक' सांगून जाते-

तुझ्या नाजूक देहाचा जरासा तोल जातो अन
हृदय माझेच धडपडते तुला मी हे कसे सांगू!

- श्रीकृष्ण राऊत
___________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि.१८ एप्रिल, २o१५◆
-----------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment