Friday, April 10, 2015

शेवटी होणार माती बस जराशा 'मी'पणाने!



अमित वाघ तसा मूळ धुळ्याचा.म्हटलं तर हे खानदेशी बेणं.आयुष्याच्या एका वळणानं त्याला व-हाडात आणलं.तो अकोल्याच्या श्री शिवाजी काॅलेजचा म्हणजे माझ्या काॅलेजचा माजी विद्यार्थी.माझ्या मोठ्या मुलाचा-संकेतचा हा वर्गमित्र.तेव्हाच्या आमच्या गझल मुक्तविद्यापीठाच्या अनेक विद्यार्थ्यांपैकी हा एक.त्या काळी काॅलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये चार ओळीच्या कवितांची जबर क्रेझ होती.अमित एक दिवस त्याची चार-चार ओळींच्या कवितांची डायरी घेऊन आला.त्या वाचून आम्ही त्याचा 'प्रेमपाखरू' शीर्षकाचा संग्रह 2003 साली मोठ्या कौतुकानं प्रकाशित केला. तेव्हा मी लिहिलं होतं 'तारूण्याला भावनांचे पंख लाभले की कवितेचं आकाश कवेत येऊ लागतं आणि 'प्रेमपाखरू'शब्दांच्या फांदीवर येऊन बसतं.फांदीला झोका देतं.अमितला चारोळ्या सुचवतं.कधी झोका उंच जातो.गझलला स्पर्शून येतो.झोका असाच उंच जाऊ दे.तुझी भरारी डोळे भरून पाहू दे!'
नंतर ब-याच वर्षांनी 2012 मध्ये अमित वाघ आणि रूपेश देशमुख ह्या दोघांनी मिळून 'गझलस्पंदन' हा गझलसंग्रह प्रकाशित केला.पुण्याच्या सुरेश भट गझलमंचावरून त्यानं अनेकदा  सादर केलेल्या गझलांना रसिकांनी भरभरून दाद दिली.ह्या सर्वांवर शिक्कामोर्तब केलं मुंबईच्या यू.आर.एल फाउंडेशनने.त्यांचा या वर्षीचा युवा गझलकारासाठी असलेला 'गझल उन्मेष' पुरस्कार अमितला येत्या 15 एप्रिलच्या सुरेश भट जयंतीला पुण्यात प्रदान करण्यात येईल.त्याचे मनापासून अभिनंदन करताना माझ्या मनात रेंगाळत असलेल्या त्याच्या अनेक शेरांनी गर्दी केली.त्यात अगदी अग्रभागी उभा असलेला हा शेर-

"बदलू कसे स्वतःचे गर्भात लिंग आई?"
निष्पाप अर्भकाचा साधा सवाल होता!

सद्य परिस्थितीत मुलीच्या घटणा-या जन्मदरावर केलेलं हे टोकदार भाष्य आहे.साहित्याची निर्मिती ज्या कालखंडात होते;त्या कालखंडाच्या भल्या-बु-या लोकप्रवृत्तींचे प्रतिबिंब त्या साहित्यात अपरिहार्यपणे उमटत असते.आणि ह्या अर्थानं ते साहित्य म्हणजे त्या संबंधित कालखंडाचा सांस्कृतिक इतिहासच असतो.

'कवीचा अहंकार फार मोठा असतो म्हणतात' ही ओळ कविवर्य
नारायण सुर्वे ह्यांची.कवितेतून मर्ढेकरांशी बातचित करताना  कवि-कलावंताच्या दुख-या नसेवर सुर्व्यांनी नेमके बोट ठेवले आहे.'बोलविता धनी वेगळाचि'म्हणून तुकोबांनी आपल्या अभंगाच्या निर्मितीचे श्रेय विठ्ठलाला का दिले असेल ह्याचे उत्तर अमितच्या ह्या शेरात सापडते-

आसमंती पोचली असली तुझी कीर्ती जरीही,
शेवटी होणार माती बस जराशा 'मी'पणाने!

पाय ठेवून वर चढण्यासाठी प्रत्येकवेळी नवनव्या दगडांचा पायरी म्हणून वापर करावा.आपला मतलब साधला की त्या दगडाला लाथ मारावी.ह्या 'बिझिनेस सिक्रेट'ला त्या दगडाच्या दुखावलेल्या आत्म्यानं दिलेला शाप भोवतो.त्या चढेल पायांना पायउतार व्हायला वेळ लागत नाही.आणि मग त्याच्या कलेसह त्याचं मातेरं होतं.हे आपल्या वाडवडिलांनी त्यांच्या अनुभवातून बजावून सांगितलेलं असतं.पण लक्षात कोण घेतो?दगड-मातीचा हा खेळ आपल्या अवती-भवती निरंतर चालत असतो.कधी आपण दगड असतो.कधी आपली माती होते.पण हा खेळ वाया जात नाही.तो आपल्याला सतत टोचत जातो.अंतर्मुख करत जातो.जाता जाता सांगून जातो-

शब्द माझा कोवळा तर अर्थ भाल्या सारखा;
वाल्मिकी अद्यापही माझ्यात वाल्या सारखा!

- श्रीकृष्ण राऊत
___________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि.११  एप्रिल, २o१५◆
-----------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment