तुळशीदास खराटे हे त्या व्यक्तीचे व्यवहारातले नाव.पण 'खराटे काका' नावाची वल्ली म्हणून गझलप्रेमींमध्ये त्यांची खरी ओळख.इहलोकीचे गाव पुसद.पण हा गझलग्रहाचा रहिवासी!बोलणं-चालणं-वागणं-जगणं असा चहू अंगानं मुलुखावेगळा माणूस.साधारणतः वीस-बावीस वर्षांपूर्वी ह्या गझलफकिरानं माझ्या भावविश्वात प्रवेश केला.गझल आणि मद्य ह्या दोन सवतीचा हा जिंदादिल दादला!ह्या दोन सवतीपैकी कोण अधिक आवडीची हे त्यांना स्वतःलाही सांगता येणं कठीण.नोकरी-घर-बायको-पोरं अशा चौकटीतलं आमचं नाकासमोर पाहून जगणं. फुरसतीच्या क्षणी विरंगुळा म्हणून चोरून धाव काढल्यासारखी एखाद-दुसरी गझल-कविता लिहिणं.म्हणजे जवळपास सगळ्याच गोष्टीचा विमा उतरवून सुरक्षेचे कवच परिधान करून लढाईत उतरलेले आम्ही एका पारड्यात आणि हा सडाफटिंग अवलिया दुस-या पारड्यात.तरी हाच गझलदिवाणा लयभारी भरणार!
असं म्हणतात,स्वर्गातून पृथ्वीतलावर पाठविलेले शापित गंधर्व असेच असतात.चिरेबंदी वाड्याच्या दगडी भिंतीतल्या इवल्याशा फटीत पिंपळानं मूळ धरावं तसं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अफलातून जगतात."सांग तुझा अर्थ काय ?" असा सवाल प्रत्यक्ष जगण्यालाच विचारतात.आणि श्वास तुटता तुटता मरणाची व्याख्या मांडतात -
जुगार मी खेळू लागलो हयातीचा
तुटू नको श्वासा दिल्लगी बरी नाही!
पण अखेर मृत्युनं 'दिल्लगी' केलीच.आणि त्यानं 'खराटे काकांना' आमच्या भावविश्वातून अलगद टिपलं.असा माणूस जातो तेव्हा तो आपल्या काळजाचा एक तुकडा कापून नेतो-
मेला तरी जळेना;
जगला कसा कळेना!
त्याने घातलेले हे चिरंतन कोडे मागे राहिलेल्यांना सुटता सुटत नाही.ऐन उमेदीच्या काळात हे झाड गझलनं झपाटलं.मूळचे कारंज्याचे असलेले पण नंतर पुसदला स्थायी झालेले उर्दूचे शायर मुसव्विर कारंजवी हे खराटे काकाचे उस्ताद!सुरुवातीला त्यांच्याकडे उर्दू गझलचे धडे काकांनी गिरवले.उर्दूतही काही गझला त्यांनी लिहिल्या आणि नंतर मराठीत.
पण त्यांच्या नि:संगवृत्तीने त्यातल्या ब-याचशा काळाच्या उदरात गडप झाल्या.रवी चापके ह्या आमच्या युवा गझलकार मित्राने खराटे काकांना, अगदी दत्तक घेतलेल्या लहानमुलासारखे लाडा-कौतुकाने अखेरपर्यंत सांभाळले. खराटेकाकांचे अनेक शेर रवीला मुखोद्गत आहेत.जगण्या-मरण्याचा संघर्ष उजागर करणारा त्यातलाच हा एक-
माझे मरण असावे जगण्यापरीस भारी;
प्रत्येक श्वास माझा मज मागतो उधारी.
मराठी गझलवरील नितांत प्रेम व्यक्त करत त्यांची अंतिम इच्छा सांगणारा त्यांचा हा शेर-
मी रोज रोज माझ्या मरणास काय मागू?
मेल्यावरी जगावी माझी गझल मराठी!
'खळपुरुष'बाहेर असेल तर त्याची 'व्यंकटी' सांडेलही.पण तो आपल्याच आत असेल तर त्याचं काय करावं?-
शाश्वत चिरंतनाचे गाऊ कशास गाणे?
आयुष्य भेटले मज खलनायकाप्रमाणे!
- श्रीकृष्ण राऊत
___________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि.४ एप्रिल, २o१५◆
-----------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment