आज राम नवमी.इकडे गावात,शहरात,मंदिरात रामजन्माच्या उत्सवाचा आनंद उत्साहाने उचंबळतोय.तिकडे सृष्टीला वसंताची चाहूल लागली. 'ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनियाँ' म्हणत बालपावलांच्या गतीनं उन्हाची हळद हळुहळू गडद होऊ लागली आहे.अवकाळी पावसानं,गारपिटीनं आंब्याच्या मोहोराची माती झाली.पण निसर्गचक्राला थांबणं ठाऊक नाही.त्या आंब्याच्या डहाळीवर कोकिळ येऊन बसेल.आपल्या प्रियेला आर्त साद घालेल 'कुहू कुहू'! नर कोकिळाच्या काळ्या तपकरी पंखावर ठिपक्या ठिपक्यांची सुरेख रांगोळी प्रकृतीनं रेखाटली. हजारो वर्षापासून तो नर पंचमस्वरात प्रेमगीत आळवतोय.प्रियेचा पुकारा करतोय.तो मधाळ स्वर कानातून थेट आपल्या हृदयात उतरतो.शांत जलाशयात खडा टाकतो.अगणित तरंग उमटवतो.त्यातलं एक वलय सतीश दराडेंच्या शेरात ध्वनीत होतं-
जीव आंब्याची डहाळी होत जातो
काय गाते कोकिळा माहीत नाही
'जीव आंब्याची डहाळी होणे' ही प्रतिमा संवेदनशील मनाला जाणवण्याची गोष्ट आहे.तिच्या प्रतीत होण्याचं विश्लेषण शब्दात करता येणं अशक्य.ते तुम्हाला केवळ 'फिल' करता येईल.महसूस करता येईल.गझलच्या शेरातल्या-कवितेतल्या अशा प्रतिमा समजावून सांगताना तुम्हाला दुसरी कविताच लिहावी लागते.तरी ते संपूर्ण व्यक्त होईल असे वाटत नाही.आणि ह्या एकमेव कारणामुळेच तर आपण एखाद्या 'प्रिय' खिडकीजवळ रेंगाळावे तसे त्या ओळींपाशी वारंवार घुटमळतो.नराऐवजी मादी कोकिळा गात असल्याचा काव्यसंकेत कालचक्रात केव्हातरी रूढ झाला.आजतागायत तो कवींना खुणावत आलेला आहे.
वसंताला घेऊन येणारा आणखी असाच एक भावतरल शेर सतीशच्या गझलेत जीवनाचा उत्सव साजरा करताना भेटतो-
दे एकदा वसंता हाती प्रभार माझ्या
वाटे फुलाफुलांवर मी स्वाक्ष-या कराव्या
खरं तर 'प्रभार' हा कार्यालयीन कामकाजातला रूक्ष शब्द.पण त्याचे सोयर 'स्वाक्ष-या' शब्दाशी जुळल्यावर कसा काव्यात्म होतो;याची उत्कट प्रचिती वाचकाला यावी.आणि पुन्हा एकदा
'फुलाफुलांवर स्वाक्ष-या करण्या'ची प्रतिमा आपण निखळपणे तीव्र जाणीवेने अनुभवावी.
प्रत्येकवेळी आपल्याला पाहिजे तसे पत्ते पडतातच असे नाही.कधी कधी वसंताच्या सांगाव्यातून 'नकार' ही येतो.येऊद्या!आपण आपली जिद्द सोडायची नाही.काही झालं तरी हार मानायची नाही-
वसंताच्या नकाराचे जरी येतात सांगावे
तरी खडकावरी आम्ही फुलांची कोरतो नावे
'खडकावर फुलांची नावं कोरणारी'ही जिद्द 'ओल्ड मॅन अॅन्ड द सी' मधल्या म्हाता-याची चिरतरुण उमेद आहे.
सतीशला त्याचा स्वतःचा 'वसंत' सापडला आहे.मागच्या वर्षी 'श्वासांच्या समीधा' हा त्याचा गझलसंग्रह उदयदादा लाड ह्यांनी प्रकाशित केला.युवा गझलकार म्हणून त्याला यू.आर.एल फौंडेशनचा 'गझल उन्मेष'पुरस्कारही दिला.सतीश मूळ
मराठवाड्यातला.'मास्तरकी'करण्यासाठी व-हाडात आला.इथे त्याची गझल उमलली.बहरली.आता त्याची गझल प्रादेशिकतेचे सीमोल्लंघन करून अवघ्या महाराष्ट्राची झाली.
-श्रीकृष्ण राऊत
___________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि.२८ मार्च २o१५◆
___________________________________________
No comments:
Post a Comment