Friday, March 20, 2015

गझले तुझ्यात माझा अश्रू जिवंत होतो!



आज गुढी पाडवा. तमाम मराठी गझलप्रेमींना मराठी नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. प्रभु रामचंद्रांचा चौदा वर्षांचा वनवास संपला.लंका जिंकून परतल्यावर याच दिवशी त्यांनी अयोध्येत प्रवेश केला, अशी एक कथा रूढ आहे.
प्रत्येक काळात भारतीय कवींना रामकथेचे उत्कट आकर्षण वाटत राहिले आहे.बंगालच्या रवींद्रनाथ टागोरांच्या निबंधापासून बोरीवलीच्या सुधीर मुळीकांच्या शेरापर्यंत रामायणातील उर्मिला विविधरूपात अभिव्यक्त होत राहते-

राम लक्ष्मण जानकीला पाहिले की
उर्मिलेचा मोकळा संसार दिसतो!

ह्या शेरातला 'मोकळा' हे विशेषण वाचकांच्या हृदयात खोलवर जिव्हारी लागते. अवतीभवती दररोज घडणारं  'रामायण' प्रत्येकाला अस्वस्थ करतं. त्यातला 'वनवास' कटता कटत नाही. प्रत्येक कथेच्या प्राक्तनात 'वाल्मिकी' असतोच असे नाही.आणि मग सुधीरच्या शेरातला 'रामबाण' काळजातून आरपार जातो-

आम्ही सगळे वनवासी पण;
सगळ्यांचे रामायण नसते.

आजपासूनच वसंत ऋतुचेही आगमन झाले.पानगळीचा काळ एकदाचा संपला.कोवळी चैत्रपालवी हवेवर डोलू लागली.वसंतोत्सवाला साद घालताना कविमन बोलू लागतं...'कुहू कुहू गाती कोयलिया को फूलो का गहना दूँ'!अशा मोसमात सुधीर मुळीक यांच्या शेराची अदा तर काही औरच.त्याचा पीळ तर नुसता कहर! आणि म्हणूनच हृदयाचा कप्पा कायम अलवार गंधित करणारा-

काय फुलांना सांगू माझ्या पानगळीचा दरवळ;
मी ओघळलो तर डोळ्यातुन अत्तर येऊ शकते!

असा एखादा अफलातून शेर वाचला की त्याला दाद देण्यासाठी
आपण मनातल्या मनात शब्द गोळा करू लागतो.वाक्याची जुळवाजुळव करू बघतो.पण भिडलेल्या शेराच्या तोला-मोलाचं काही सुचत नाही.अशावेळी त्याच कवीचा एखादा शेर आपल्या मदतीला धावून येतो आणि आपण त्या जामीनावर सुटल्याचा आनंद भोगतो.सुधीरची गझल अशी -

दृष्ट कवितेनेच काढावी तिची मी;
खूप कष्टाने असा शृंगार दिसतो.

सुधीरचा मुक्तछंदही तेवढाच सहज आहे. ममतासोबतची त्याच्या कवितांची जुगलबंदी ऑर्कुटवर गाजली.'विळखा : एक बंध' ह्या संग्रहात तिचा मोहक काव्यगुच्छ झाला. उत्तरोत्तर अधिक परिपक्व होत जाणारी त्याची गझल असा एखादा पेचदार सवाल पेश करते की वाचक स्तिमित होऊन जातो-

लिहिले अभंग ज्याने, का तोच संत होतो ?
गझले तुझ्यात माझा, अश्रू जिवंत होतो !

काळाला जिंकू पाहणा-या अशा शेरावर दिल-ओ-जान कुर्बान करताना आपल्या नेणीवेत संत तुकाराम आणि महाकवी गालिब एकाचवेळी प्रकट व्हावेत!

● श्रीकृष्ण राऊत
_______________________________
●फुलोरा●दै.सामना दि. 21मार्च 2015●
__________________________________________________

No comments:

Post a Comment