Friday, March 13, 2015

वाहून दैन्य जावे आता बरस असा तू ...




श्रीराम गिरी मराठवाड्यातल्या बीडचे.गेल्या अनेक वर्षांपासून    मराठवाड्याला पाऊस सारखी हुलकावणी देतो.प्राथमिक शिक्षक असलेल्या श्रीराम गिरींनी वरुणदेवाचा आर्त धावा केला-

‘वाहून दैन्य जावे आता बरस असा तू;
देऊ नको घना रे हे थेंब-थेंब पाणी.’

असा प्रार्थनात्मक सुंदर शेर लिहिणार्‍या
श्रीराम गिरींच्या गझलांच्या अभिव्यक्तीचा स्वर मंद्रसप्तकातला आहे. त्यांची गझल कधीही चढ्या स्वरात बोलत नाही. खूप भोगल्या-सोसल्यावर समजुतदार झालेल्या माणसाच्या बोलण्यात जो धीरगंभीरतेचा स्पर्श असतो;जो श्रीराम गिरी ह्या व्यक्तीच्या बोलण्यात आहे,तोच त्यांच्या गझला वाचतानाही आपल्याला ऐकू येतो. व्यक्ती आणि अभिव्यक्ती मधलं असं अद्बैत अपवादानंच आढळतं.
नुकताच त्यांचा 'विसरून रंग सारे' हा गझलसंग्रह प्रकाशित झाला.
‘हिरे आणि इतर गझला’ पासून ‘विसरून रंग सारे’ ह्या  गझलसंग्रहापर्यंत त्यांची वाटचाल सजगपणे न्याहाळली तर श्रीराम गिरींच्या काव्य जाणीवेचा सर्जक विकास स्वागतशील वाचकाला जाणवावा. पण अल्पसंतुष्ट होण्याचा त्यांचा स्वभाव नाही,ह्या पडावाबद्दल त्यांना वाटतं-

‘अजून कोठे पुरा उमललो, अजून कोठे फुलास दरवळ
हवा मला वेळ अजून थोडा, मनात दुनिये तुझ्या बसाया’

कलेच्या सर्जनशीलतेतील न्यूनाची ही रुखरुख जोवर प्रत्येक कवी-कलावंताला आहे तोवर आजतागायत झालेल्या निर्मितीहून आणखी चांगल्या सृजनाची अपेक्षा त्या कवी-कलावंताकडून करायला काहीच हरकत नसते.
गझलेची संहिता ज्या भाषा-माध्यमातून सिद्घ होते त्या भाषा-माध्यमाचे प्रगल्भ आणि सम्यक आत्मभान त्या गझलकार-कवीला कोणत्या प्रतीचे आहे हीच गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची मानली पाहिजे.शब्दांची ‘रत्ने’ किंवा प्रसंगी ‘शस्त्रे’ होण्यासाठी जे ‘यत्न’ करावे लागतात. ते करण्यासाठी ‘आह को चाहिए इक उम्र असर होने तक’ इतका धीर धरावा लागतो.
हिरव्या रंगाच्या सत्तेचाळीस छटा आहेत असं जी.एं.नी एका ठिकाणी लिहिलयं;ते भाषेच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतं. शब्दांच्याही अनेकविध अर्थच्छटा कळायला आणि त्यांचे नेमके उपयोजन जुळायला ‘थोडा वेळ’ तर लागणारच. तरच ‘दुनियेच्या मनात’ आपलं बिर्‍हाड थाटता येईल.

कसा दोष देऊ तुम्हा निंदकांनो;
तुम्ही काम केले खरे अंजनाचे.'

कवी म्हणून ह्या भूमिकेशी श्रीराम गिरी जोपर्यंत एकनिष्ठ आहेत. तोपर्यंत त्यांच्या ‘काव्यदृष्टी’ची काळजी करण्याचे कारण नाही. तोवर ‘दूरदृष्टी’चे ते धनी आहेत. कवीला आपण उगीच ‘द्रष्टा’ म्हणत नाही. अल्पकाळ चमकणार्‍या कोणत्याही ‘मोतीबिंदुंची’ लालुच त्याला नडू नये एवढंच.
आजच्या मराठी गझलच्या कक्षा कमालीच्या रुंद होत चालल्या आहेत. मानवी जीवनानुभवाच्या व्यापक पैलूंना त्या कवेत घेत आहेत. ग्रामीण-शहरी-महानगरी-जागतिकीकरण-विद्रोही-राजकीय अशा बहुआयामी जाणीवांची तगमग मराठी गझलेतून अभिव्यक्त होत आहे.अनुकरण आणि प्रभावाच्या पार जाणारी स्वत:ची भाषा, स्वत:चा सूर तिला सापडत आहे. श्रीराम गिरी अशाच मराठी गझलदिंडीचे निष्ठावंत वारकरी आहेत.
● श्रीकृष्ण राऊत

_______________________________
●फुलोरा●दै.सामना दि. 14 मार्च 2015●
__________________________________________________

No comments:

Post a Comment