Saturday, February 28, 2015

दोघातली कहाणी दोघात राहुदे



साहिर साहेबांनी हिन्दी चित्रपटासाठी अनेक अजरामर गाणी लिहिली.त्यातलं एक लॅन्ड मार्क एव्हरग्रीन गाणं -

'अभी ना जाओ छोड़कर, के दिल अभी भरा नहीं'

हजारो वेळा ऐकलं तरी मन भरत नाही.आणि प्रत्येकवेळी बेटं माणसाला आरपार खल्लास करतं.असं हे जीवघेणं गाणं आहे.आणि याहूनही लईभारी असा एक शेर आहे उ.रा.गिरींचा -

थोडयाच तू क्षणांची दातार देवयानी;
थोडा अजून प्यासा माझ्यातला ययाती!

चिरतरूण राहण्याची माणसाची इच्छा कशी लार्जर दॅन लाइफ असते हे ययातीच्या कथेने जगाला सांगितले.त्याची उपभोगाची 'प्यास' काही केल्या शमत नाही.आपले वृद्घत्व आपल्या तरूण मुलाला देऊन त्याचे तारूण्य स्वतः घेणारा हा ययाती राजा!
पृथ्वीतलावरच्या प्रत्येक माणसाच्या हृदयात लपून बसलेला.

'प्यास' कोणतीही असो, शेवटच्या श्वासापर्यंत ती
माणसाचा पिच्छा काही सोडत नाही. हेच बयान केले ग़ालिबसाहेबांनी  त्यांच्या वेगळ्या 'अंदाजात'-

'गो हाथ को जुम्बिश नहीं, आँखों में तो दम है
रहने दो अभी साग़र-ओ-मीना मेरे आगे'

क्षीण झालेला माझा हात आता उचलू शकणार नाही,पण माझी  नजर अजूनही शाबूत आहेत.हे मद्यपात्र-ही सुराही माझ्या समोर  राहू तर द्या! डोळेभरून मला पाहू तर द्या!

तरुणाईचं एक लक्षण सांगितलं जातं - 'वो जवानी जवानी नही जिसकी कोई कहानी न हो'...आणि कहानी म्हटली की मग नायक आला,नायिका आली.और फिर कहानी में ट्विस्ट तो बनताही है!...कसमे-वादे,भेटी-गाठी,रूठना-मनाना,रूसवे-फुगवे,हॅन्डसेट आणि कान दोन्ही गरम होईपर्यंत तासंतास मोबाइलवर बोलणं,रात्री उशिरापर्यंत जागणं...हे सगळं येतं...ते पाहूनच तर फिराक साहेबांनी जवानीची व्याख्या केली-

'रात भी नींद भी कहानी भी
हाय, क्या चीज है जवानी भी'

पण सगळ्या कहाण्यांचा शेवट सुखांत होत नाही.बहुतांश कहाण्या-
'अध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी'
अशाच असतात.
उ.रा.गिरींच्या एका गझलेत अशीच एक दिलजली कहाणी मनाला चटका लाऊन जाते-

दोघातली कहाणी दोघात राहुदे;
मिटवून चांदण्यांचा अध्याय ठेवुदे.

'चांदण्यांचा' हा 'अध्याय' इतका सहजासहजी मिटवून ठेवता येतो का?
_______________________________
●फुलोरा●दै.सामना दि.28 फेब्रु.2015●
__________________________________________________

No comments:

Post a Comment