Friday, December 11, 2015

तो फटाका शेवटी फुसका निघाला



सतत तीन वर्षे झाली पाऊस वेळेवर येत नाही.नको असतो तेव्हा धो धो बरसतो.हातातोंडाशी आलेला घास मातीत घालतो.खाना खराब करतो.आधीचं  कर्ज फेडल्याशिवाय बँका उभं करायला तयार नाहीत.सावकाराचं अव्वाच्या सव्वा व्याजही भरलं असतं पण त्यांनीही दरवाजे बंद केलेत.कॅलेंडर कुणासाठी थांबत नाही.दसरा गेला आता दिवाळी येणार. या वर्षी राखी बांधायला बहिणीच्या गावी जाणं  काही जुळलं नाही.आता भाऊबीजेला तिला घ्यायला जावंच लागणार.जगाची रीतभात आहे ती.वर्षातून दोनदा तरी लेकीबाईची चोळी-बांगडी केली पाहिजे.आपली अडचण नित्याचीच आहे.तिकडे बहीण लग्न होऊन सासरी गेली तरी तिचा जीव माहेरातच अडकलेला असतो.बाबा आता थकलेत.त्यांच्यानं कामधंदा होत नाही.एकट्या भावाच्या जीवावर सात तोंडं खाणारी.रोज संध्याकाळी बहीण तुळशीपुढे दिवा लावते.हात जोडते.मनातल्या मनात देवाला साकडं घालते.औंदा तरी माझ्या भावाची शेती पिकू दे.घर धनधान्यानं भरू दे.या वेळी त्याला चांगली भारी साडी घेऊ दे.पण आभाळातला देव पाहिजे तेव्हा पाऊस धाडत नाही.आणि पूजा फाटेच्या शेरातून बहिणीनं विचारलेला प्रश्न तुमच्या-माझ्या गळ्यात हुंदका होऊन दाटतो-

साडी मजला देतांना तू रडला का रे?
वस्तू कुठली घरची भाऊराया विकली? 

मृत्यूनंतरचं जग कोणं पाहिलं?स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात.मेलेला माणूस कधी परत येत नाही. स्वर्गातल्या सुखाबद्दल कधी बोलल्याचं कुणी सांगत नाही.जिवंतपणी माणसाला कुत्रं विचारत नाही.मेल्यावर त्याचे काय ओवळे-सोहळे. आंघोळ-अत्तर,कोरा कपडा,तिरडी-फुलं,रक्षा विसर्जन,पिंडदान,दसवं,तेरवी,गोडजेवण,लेकीबाईंची रडकी बोळवण,मासिक पानं,वार्षिक श्राद्ध... बापरे बाप!जन्मभर गाडगे बाबा बेंबीच्या देठापासून ठणकावून सांगत राहिले.आम्ही ऐकत राहिलो.गाडगेबाबा गेले.आम्ही त्यांचा देव केला.त्यांच्या फोटोला टिक्का लावला,हार घातला अन् हात जोडले की झालं आमचं काम!बाकी आम्ही होतो तसेच राहिलो.बोटभरही सुधारलो नाही.कधी भावकीसाठी,कधी गावकीसाठी गावजेवणं करत राहिलो.कर्जबाजारी होत राहिलो.गंभीरपणे वाचला तर पूजाचा शेरही तोच संदेश घेऊन आलाय-

वारण्याआधीच बापाला हवे ते प्रेम द्या,
तेरवी पाळू नका अन् पंगती वाढू नका. 

करंदीकर म्हणत 'माझ्या मना बन दगड'.ते आपल्या मनानं खरोखर मनावर घेतलं की काय? हळुहळू आपण संवेदनाशून्य होत चाललो.कशाचं काही वाटेनासं झालंय.एखाद्या स्लो पाॅयझन सारखं आपण अवतीभवतीचं भयाण वास्तव पचवत चाललोय.मनाचा टणक काळा खडक झाला.हृदयाचं लाकूड झालं.तेही साधंसुधं नाही.तेलिया बाभळीचं.जल्लद लावलेल्या 
कु-हाडीचा घाव सहजपणे उसळवणारं.टस की मस न होणारं.लाकडाचं एकच काम- आलं प्रेत की जाळ त्याला.कोणाचा कोण ?कोणता माणूस मेला? आपल्याला त्याचं काय देणं घेणं-

प्रेत कुठले कोणता माणूस मेला
लाकडाला हे कुठे माहीत असते.

पूजा फाटे मूळ नागपूरची.फाइन आर्टस् ची पदवी धारक.पुण्याच्या नामांकित अॅड एजन्सीत नोकरी करते.ग्राफिक डिझाइन करता करता माणसांचे वस्तूत रुपांतर होताना पाहते.ह्या अग्रेसिव्ह मार्केटिंगच्या 'कोलाहलाचे मौन' आपल्या शब्दातून मुखर करण्याचा प्रयत्न करते.जीवनमूल्यांच्या पडझडीत माणसाच्या घसरलेल्या किंमतीचे लेबल त्याच्यावर चिटकवते-

ज्यास बाजारात किंमत फार होती,
तो फटाका शेवटी फुसका निघाला.
____________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि. १२ डिसेंबर,२o१५◆
_____________________________________________

No comments:

Post a Comment