Friday, July 24, 2015

जन्म मग वाटेल वारीसारखा



निशब्द देव हे त्याचे कविनाम. तो आहे नव्या दमाचा गझलकार. देवेन्द्र गाडेकर हे त्याचं कागदोपत्री असलेलं नाव.विदर्भातलं यवतमाळ हे त्याचं मूळ गाव. अभियांत्रिकीचं शिक्षण घेण्यासाठी अमरावतीला आला.मराठी गझलची गंगोत्री असलेल्या अमरावतीची पवित्र माती त्याच्या पायाला लागली.नोकरीच्या निमित्ताने पुण्यनगरीत आलेल्या त्याच्या मनोभूमीत गझल अंकुरली.त्याला त्याच्या मालकीची 'जमीन' सापडली. त्यातून उगवलेले हे काही शेर -

विठ्ठलासारखा हो कधी तर ढगा
रंग का ओढतो कापसासारखा ?

काळा आणि पांढरा हे दोन शब्द वरील शेरात प्रत्यक्ष उपस्थित नाहीत.पण ते ध्वनीत होतात.रंगप्रतिमांचे अगदी तंतोतंत जमून आलेले संसूचन ह्या शेराला अभिजात काव्याची उंची प्रदान करते. पावसाची वाट पाहणाऱ्या कुणब्यांच्या आतुर डोळ्यातली आर्तता  वाचकाच्या संवेदनशील मनाला अस्वस्थ करते.

सन्माननीय व्यक्तीच्या आगमनाच्या वेळी आपल्या जागेवर उभं राहण्याचा शिष्टाचार आहे.आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी आपण त्याला सामोरं जातो. इथे तर हजारो मैल पायी चालत आलेले आवडीचे भक्त. अठ्ठावीस युगापासून त्यांच्या स्वागतासाठी पंढरीचा राजा कमरेवर हात ठेऊन उभा आहे -

मी गेल्यावर विठ्ठल सुद्धा उभा राहतो,
कुणी कुणाचा किती करावा आदर म्हणतो ?

क्रोध आणि अभिमान ह्या दोन्ही शत्रुंना पायाखाली तुडवायचे,आपला वर्ण,आपली जात विसरून एकमेकांना लोटांगण घालायचे.विठ्ठलनामाच्या गजरात ताल धरायचा.माणसाला झालेला आनंद त्याला जगातल्या कोणत्याही भाषेत व्यक्त करता येत नाही.तेव्हा त्याच्या कामी येते देहबोली.आनंदाचे डोही आनंदाचे तरंग उमटू लागले की चालता चालता नाचायचे.नाचत नाचत चालायचे.प्रत्येक जीवाच्या ठिकाणी देवाचा अंश आहे ही अद्वैताची भावना प्रगाढ करण्याचा हा अभ्यास वारीत रात्रंदिवस नकळत चालतो... आणि मग समतेच्या आकाशाखाली प्रत्येक देह देवाचे मंदिर होतो -

द्वेष,मत्सर,क्रोध सारे दूर करुया,
आपल्या देहास पंढरपूर करूया .

मृगाचा पहिला पाऊस पडला की एकीकडे वारकऱ्याची पेरणीची लगबग सुरू होते तर दुसरीकडे त्याच्या मनाला वारीची ओढ लागते. निरोप  घेऊन वारा येतो.सासुरवाशीणीला माहेराहून बोलावणे आलेले असते. वर्षभर मनात जतन केलेली संसाराची सुखदुःखे माउलीला सांगायची असतात. तिच्या पायावर वहायची असतात. अविरत चाललेली जगण्याची लढाई जिंकण्यासाठी नवी शक्ती देणारी ही भक्ती आहे. त्यासाठी भवतापाने गांजलेल्या भाविक जीवाला माउलीच्या भेटीची आस लागलेली असते.'दुःख माझे देव झाले शब्द झाले प्रार्थना /आरती जी गात आहे तीच माझी वेदना' असे भजन गात गात आयुष्याची दिंडी पुढच्या मुक्कामाला जवळ करीत असते -

विठ्ठ्ला इतकेच दु:खाला जपा,
जन्म मग वाटेल वारीसारखा.
______________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि.२५ जुलै, २o१५◆
______________________________________________

No comments:

Post a Comment