प्रतीक्षा पावसाळ्याची जिवाला डागण्या देते;
ढगांना काय चाटावे...मनाचा मोर मेल्यावर!
ह्या शेरावर भाष्य करण्याची काहीच गरज नाही.भाषेच्या भानगडीत न पडता ह्या शेराला आतल्या आत अनुभवावं इतका तो थेट भिडणारा आहे.संवेदनाची लाही लाही करणारा आहे.शायर आहे रविप्रकाश.कागदोपत्री असलेलं त्याचं पूर्ण नाव रवी प्रकाश चापके. वडिलांच्या नावाला आपल्यासोबत कायम जोडून मराठी गझलेत एक शायर उगवला त्याचं पेन नेम रविप्रकाश.'पेन नेम' हा शब्द मी मुद्दाम घातला.रवी आणि त्याची पत्नी सरिता दोघेही पुसदला इंग्रजीचे सहाय्यक प्राध्यापक आहेत.म्हणून 'पेन नेम'!ह्या दोघांनी मराठी गझलच्या जीवाला जीव लावला.
रवी माझा पत्ता शोधत पहिल्यांदा माझ्याकडे आला.तेव्हा तो पोरसवदा काॅलेजकुमार होता.त्यानं त्या काळी लिहिलेल्या मोडक्या-तोडक्या गझलांची वही दाखवायला तो आला होता.मी जरा कडक शब्दातच त्याच्याशी बोललो होतो.वृत्त-काफिया-रदीफ इत्यादी संबंधीचा प्राथमिक धडा त्याला दिला होता.गझल लिहिणं म्हणजे तीन महिन्यात हायब्रिडचं पीक घेण्या इतकं सोपं नाही.अशा अर्थाचं काही तरी मी त्याला सुनावलं होतं.चांगली गझल लिहिता आली तरच तुम्हाला पुन्हा भेटीन.असा आपला जबाब नोंदवून ते पोरगं निघून गेलं.पाच-सात वर्षे झाली पुन्हा भेटलं नाही.एक उगवता अंकुर आपण खुडून टाकल्याची अपराधी भावना माझ्या मनाला टोचत राहिली.ह्या घटनेलाही आता वीस-बावीस वर्षे झाली.
नंतर जेव्हा रवी भेटला तेव्हा तो 'रविप्रकाश' झाला होता आणि त्याने त्याचा शब्द खरा केला होता.
आता समुद्र सुद्धा लागेल थरथराया
रस्त्यावरी उतरली माझी तहान आहे!
अगस्थी होऊन त्याला आता अनुभवांचा समुद्र प्राशन करायचा होता.
अशी तयारी ठेवणं म्हणजे आगेशी खेळणं आहे.हे त्याला पक्कं माहित आहे.पण आपण स्वतःहून निवडलेला हा मार्ग आहे.'मै बरबादियोका जश्न मनाता चला गया...हर फिक्र को धुएँ मे उडाता चला गया' अशी सगळी वाटचाल.म्हणूनच तर-
आजन्म खेळलो मी मस्तीत विस्तवाशी
लाचार लाकडांना मज जाळता न आले!
एकमेकांशी संवादी राहणं हा माणसाचा प्राणवायू.कधीतरी असं होतं की एखाद्याशी आपलं जमत नाही.राग आला की आपण त्याच्याशी कट्टी करतो.आणि एखाद्या मिसाइलसारखं आपलं मौन त्याच्या दिशेनं आपण फेकून मारतो-
क्रोधास हाय केव्हा फेकून मौन मारू..
आम्हा नजाकतीने का भांडता न आले?
उगीच आपलं आदळ आपट करण्यापेक्षा असं नजाकतीनं भांडणाची त-हा शिकवणारी मराठी गझल म्हणेन
'भांडा सौख्य भरे!'
____________________________________________
◆ गझलाई ● फुलोरा ● दै.सामना दि.६ जून, २o१५◆
-----------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment