Saturday, February 28, 2015

लिहू फुलावर की


सहा ऋतुंना ओळित गुंफुन कसे पाठवू तुझ्याकडे ?
लिहू फुलावर  की त्या आधी देठावरती गझल करू?

असा सुगंधी प्रश्न ज्या मनाला पडतो त्या मनस्वीनीचे नाव आहे ममता सिंधुताई सपकाळ.हजारो 'अनाथांची यशोदा' असलेल्या ख्यातनाम समाजसेविका सिंधुताईंची कन्या अशी तिची आजची ओळख आहे.पण उद्या मात्र तिचा परिचय नक्की निराळा असेल. तिच्या गझलाच तिला स्वतःची वेगळी पहचान देतील.
            पुण्याच्या रंगतसंगत प्रतिष्ठानचा 'भाऊसाहेब पाटणकर' पुरस्कार नुकताच ममताला जाहीर झाला.तिच्या कविता- गझला मी गेल्या चार वर्षापासून ऑर्कुट-फेसबुकवर वाचतो आहे.सुधीर मुळीक सोबत ऑर्कुटच्या 'काव्यांजली' समुहावर  चाललेल्या काव्य-संवादातून सिद्ध झालेला  पासष्ट कवितांचा संग्रह 'विळखा : एक बंध' सहकवयित्री म्हणून तिच्या खात्यात जमा आहे.आणि तोच तिच्या गझललेखनापूर्वीचा  रियाझ आहे.
             स्त्री-पुरुष प्रेमामधली देहबोली ममताच्या गझलेतली अभिसारिका नाकारत नाही.अतिशय समरसतेने ती प्रेमाचं सदेह रूप स्वीकारते.त्या शारीर अनुभूतीला धीटपणे मांडते.स्त्री गझलकारांच्या अभिव्यक्तीत एवढा धीटपणा अपवादानेच आढळतो.ममताच्या गझलेतल्या प्रेयसीला 'झोपाळ्यावाचून' झुलावंसं वाटलं तर ती म्हणेल-

झुलावे असे जर कधी वाटले;
मिठी दे तुझी, त्या झुल्यावर नको!

'तो ' घरी आल्यावर सुटलेला 'दरवळ' शेजारच्या भिंती हुंगतील  म्हणून काळजी घ्यावी लागते-

मी बंद करू का दरवाजा खिडक्या?
तू आल्यानंतर घर दरवळणारच!

कारण अशा प्रेमळ एकांतात काही 'खुळ्या मागण्या' उमलू लागतात-

जरा गाल दे...ओठ दे ना जरा;
खुळ्या मागण्या या...खुल्यावर नको!

कधी कधी ही अभिव्यक्ती वरीलप्रमाणे अगदी नितळपणे थेट भिडते.तिच्या भाषेला काव्यरूप धारण करताना प्रतिमाही नकोशा वाटतात.आणि या अर्थाने हे शेर अ-प्रतिम होतात.तर कधी कधी प्रतिमांच्या आडोशाने हे विभ्रम सूचकतेने व्यक्त होतात-

झाड-वेल-फूल-पाकळी अशा नेहमीच्याच प्रतिमा आपले नवे उन्मेष लेऊन अवतरतात आणि आपल्या मुखातून सहज उद्गार उमटतो-
वा! क्या बात है!-

मिटून डोळे उजेड लपता अंधाराच्या आड एकदा..
किती अनावर झाले होते वेलीसोबत झाड एकदा.

फुलाचे नाव तू ओठांस द्यावे;
खुडावी पाकळीने पाकळी मी!

ह्या स्वर्गातून जमिनीवर उतरताना 'ती' तिच्या घरातली प्रत्येक वस्तू आवरते सावरते.पण काही केल्या एक 'चीज'सापडत नाही-

माझी हरेक वस्तू माझ्या घरी परंतू;
काळीज ठेवले मी त्याच्या खिशात आहे!

जीवनसंघर्षात कुठला तरी अटीतटीचा सामना  'तिच्या' आवडीच्या माणसाने जिंकल्यावर त्याचं कौतुक करण्याची 'हिची' जगावेगळी त-हा-

जिंकल्यावर तू कधी कौतूक केले मी;
फक्त नजरेने तुला ओवाळले आहे!

कधी 'जीने की तमन्ना' मनात नाचत असते तर कधी 'मरने का इरादा' हृदयाला शाॅक देत राहतो.अशावेळी जीव देण्यासाठी 'तिनं'  कोणतं  स्थळ निवडावं?-

मला वाटले जीव द्यावा जरी
तुझ्या काळजाचे तळे पाहिजे!

प्रेमा तुझा रंग कसा?
हा प्रश्न नाटककार-कवींना कायम सतावतो.आणि त्याचे उत्तर प्रत्येक युगात कुणी कितीही त-हेने शोधले तरी ह्या प्रश्नाचे समाधान होणार नाही;कारण प्रेम ही 'नूर की बुंद है...सदियोंसे बहा करती है'! ह्या दिव्य प्रकाशाचे दोन-चार कवडसे शब्दांच्या मुठीत धरण्याची ही असोशी आपल्याला पुनःप्रत्ययाचा उत्कट सहानुभव देते-

मला चोरून बघण्याचा नको ना आव आणू तू..
तुला मी पाहिले आहे मला निरखून बघताना!

तुझ्या वागण्याच्या किती ह्या तऱ्हा रे..
तरावे कितीदा बुडावे कितीदा!

माझ्याच मौनाची नको भाषांतरे..
आता तुझा अनुवाद केला पाहिजे.

ही मनभावन संवेदना आपल्या व्यक्तिमत्वाला अंतर्बाह्य व्यापते.आणि मग आपण,प्रेम आणि गझल ही त्रिवेणी  एकरूप होऊन शब्दांतून प्रवाहित होते -

मी वेगळे काही तुझ्यावर का लिहावे सांग ना?
तू कोणत्या गझलेमधे नाहीस मिस-यासारखा!

एकाहून एक सरस असे आणखी अनेक शेर लिहिण्यासाठी ममताला
मनभर शुभेच्छा!
काळीजभर आशीर्वाद!
_________________________________
●फुलोरा● दै.सामना दि.21 फेब्रु.2015●
______________________________________________


No comments:

Post a Comment