'

◆दर शनिवारी दै.सामनाच्या 'फुलोरा'पुरवणीत प्रसिद्ध झालेले सदर ◆

Thursday, March 12, 2015

दु:खाचे फुलपाखरूउद्या जागतिक महिला दिन... त्याचे औचित्य साधून ‘गझलाई’मध्ये सादर आहेत एका महिला गझलकाराचे काही फुलवंती शेर! राधा भावे हे त्यांचं नाव. पणजी हे त्यांचं सध्याचं गाव.
राधा भावे... गोवा राज्य वस्तुसंग्रहालयाच्या संचालक पदावर त्या विराजमान आहेत. ‘उमलताना...’ (२००९) आणि ‘तुला भेटून येताना...’ (२०१५) ही त्यांच्या कवितासंग्रहांची शीर्षकं पाहिली तरी आपल्याला जाणवतं की, जगणं सुंदर करण्याची किमया लेऊन आलेलं कोवळं मन त्यांना लाभलंय... आणि त्यांनी ते तेवढ्याच अलवारपणे जपलंय. ह्या मनाला काय नाही करता येत?

दु:खालाही चिमटीमध्ये धरता येते
आणिक त्याचे फुलपाखरू करता येते!

एवढा भावतरल नितांत सुंदर शेर माझ्या तरी वाचण्यात नाही. दु:ख वाट्याला आलं नाही असा माणूसच जगात नाही. दुनिया में हम आये हैं तो जीना ही पडेगा... जीवन है अगर जहर तो पीना ही पडेगा’ गाणारी ‘मदर इंडिया’ अशावेळी मला हमखास धीर देते. दु:खाचं हेच ‘जहर’ राधाबाईंनी ‘फुलपाखरू’ ह्या प्रतिमेनं काय सौंदर्यशाली केलंय!
आयुष्यातल्या दु:खाचं हे शिवधनुष्य उचलण्यासाठी आणि त्यावर गझलची प्रत्यंचा चढवण्यासाठी लागणारं सामर्थ्य मॉलमध्ये थोडंच विकत मिळतं? त्यासाठी आपलं माहेरही तेवढंच ऐश्वर्यसंपन्न असावं लागतं. फुलांच्या माहेरी रंग-गंधाची खानदानी श्रीमंती लाभणार्‍या भाग्यवंतांना मग प्रत्येक पाकळीची कहाणी कळते-

माहेर मी फुलांचे, मी रंग-गंध त्यांचा
मी ऐकते कहाणी हर एक पाकळीची

प्रत्येक ‘पाकळी’ची कहाणी ऐकता-ऐकता ‘फुलांचे’ छुपे हेतू ओळखण्याएवढा समजूतदारपणाही आपसुकच येतो-

हुंगलेला गंध तू अन् स्पर्शलेल्या पाकळ्या
मी छुपे हेतू फुलांचे ओळखाया लागलं

आपल्या ‘फुलाला’ मनात लपवायचं आणि ते जगाला कळणार नाही याची काळजी घ्यायची हे सोपं नसतं. आपल्या आवडीच्या पैठणीच्या पदरात निखारा बांधण्यासारखंच असतं ते! आपल्या वाट्याला जळणं आलं तरी त्या ‘फुलझाडाला’ बहरत ठेवायचं ते व्रत असतं-

मनात ठेवले तुला कुणास ना कळू दिले
जळू दिले स्वत:स अन् तुलाच मोहरू दिले!

ह्या अग्निपरीक्षेत जगाच्या ‘विजा’ झेलाव्या लागतात. दुनियेच्या वादळाशी लढाई करावी लागते... आणि अवतीभवती तर हा असा फुलांचा गराडा... मन कधी कधी पार भांबावून जातं-

विजा झेलते, खेळते वादळाशी
फुलांच्या गराड्यात भांबावते मी

इकडची दुनिया तिकडे झाली आणि जगबुडी झाली तरी ‘त्याच्या’ मनातल्या ‘आपल्याला’ कसं वजा करता येईल? फुलापासून गंधाला कधी विलग करता येतं का?

कसे वजा करायचे तुझ्या मनातल्या मला,
कसा बरे फुलातला गंध वेगळा करू?

● श्रीकृष्ण राऊत

_______________________________
●फुलोरा●दै.सामना दि. 07 मार्च 2015●
__________________________________________________

No comments:

Post a Comment